॥ श्लोक ॥
किरीटिनं कुंडलिनं चतुर्भुजं पीतांबरं वक्षसि लक्षितं श्रिया ॥ अध्यर्हणीयासनमास्थितं परं वृतं चतुःषोडशपंचशक्तिभिः ॥१६॥
॥ टीका ॥
मागुतेनी तो कैसा भगवंत ॥ निजभाग्यें विधातां देखत ॥ माथां मुकुट रत्नखचित ॥ सुमनीं संयुक्त कबरीबंध पैं ॥४२॥
चतुर्भुज घनसांवळा ॥ मकरकुंडलें कौस्तुभ गळां ॥ वैजयंती वक्षःस्थळा ॥ आपाद वनमाळा रुळत ॥४३॥
विजृशरण आली हरीसी ॥ अस्ता जाणें खुंटलें तीसी ॥ तैसा पीतांबर कासेसी ॥ दिव्यतेजेंसी तळपतसे ॥४४॥
नाभीं आवर्तला आनंद ॥ परमानंदें वाढलें दोंद ॥ सर्वांगें सच्चिदानंद ॥ स्वानंदकंद शोभतसे ॥२४५॥
पाहतां हरीचीं करतळें ॥ संध्याराग लाजिन्नला पळे ॥ अधर आरक्तपोवळें ॥ सुकुमार रातोत्पळें तैसें चरण ॥४६॥
चरणीं तोडर गर्जती देखा ॥ ध्वजवज्रांकुशऊर्ध्वरेखा ॥ पाहतां पायींच्या सामुद्रिकां ॥ सनकादिका आनंद बहु ॥४७॥
पडतां पायींच्या पायवण्यासी ॥ शंकर वोढवी मस्तकासी ॥ तेणें शिवत्व आलें त्यासी ॥ अद्यापि शिरीं वाहतसे ॥४८॥
त्याचिये वक्षःस्थळीं वामा ॥ वामांगीं बैसलीसे रमा ॥ तिच्या भाग्याची थोर सीमा ॥ नवर्णवें महिमा श्रुतिशास्त्रां ॥४९॥
रमा बैसताचि अर्धांगीं ॥ तिच्या निजशक्ति अनेगी ॥ उभ्या तिष्ठती निजविभागीं ॥ आज्ञाविनियोगीं अधिकार त्या ॥२५०॥
श्रेष्ठ सिद्धासनीं आरोहण ॥ रमासमवेत रमारमण ॥ तेथें सृष्टीचें कार्यकारण ॥ ब्रह्मा आपण स्वयें देखे ॥५१॥
करावया सृष्टिसर्जन ॥ ब्रह्मा पुढें देखे नारायण ॥ सृष्टीचें कार्यकारण ॥ आपुलें आपण निजशक्ति दावी ॥५२॥
चारी पांच आणि सोळा ॥ ऐसा पंचविसांचा मेळा ॥ आज्ञाधारक हरिजवळा ॥ विधाता डोळां स्वयें देखे ॥५३॥
त्यांची शक्ति कोण कोण ॥ कोण कार्य कोण कारण ॥ कैसें कैसें त्यांचें लक्षण ॥ नामाभिधान तें ऐका ॥५४॥
प्रकृति पुरुष महदहंकार ॥ हा चतुःशक्तींचा प्रकार ॥ पंचशक्तींचाहि विचार ॥ जाण साचार महाभूतें ॥२५५॥
ज्ञानकर्मेंद्रियांचें लक्षण ॥ अकरावें गणिजे पैं मन ॥ पंचतन्मात्रा विषय जाण ॥ यापरी संपूर्ण षोडशशक्ती ॥५६॥
या पंचविसांच्या पोटीं ॥ ब्रह्मांडेसीं उठिजे सृष्टी ॥ त्याहि माजीं त्रिगुणत्रिपुटी ॥ अतर्क्य दृष्टी विधाता देखे ॥५७॥