भगवच्छिक्षितमहं करवाणि यतंद्रितः ॥ नेहमानः प्रजासर्ग बद्धयेयंयदनुग्रहात् ॥२९॥
॥ टीका ॥
भगवंता तूं ऐसें ह्मणसी ॥ म्यां सृजूं सांगितलें सृष्टीसी ॥ तें करूं काय भ्यालासी ॥ यालागीं पुससी तत्त्वज्ञान ॥४२॥
किंवा सृष्टि सृजूं उद्वेगला ॥ यालागीं गुह्यज्ञान पुसोंलागला ॥ ह्मणसी आज्ञाउल्लंघू केला ॥ येणें नसांडिला सृष्टिक्रम पैं ॥४३॥
तुवां सृष्टि सृजूं सांगीतली ॥ तें अनालस्यें मी रचियेली ॥ परी निर्विघ्न पाहिजे निपजला ॥ यालागीं वांचिली ज्ञानकृपा तुझी ॥४४॥
कीं देवा तूं ऐसें मानिसी ॥ सृष्टि करीन ते ह्मणसी ॥ आणि पुनः पुन्हा कां पुससी ॥ गुह्यज्ञानासी अत्यादर ॥३४५॥
तुझें पावोनी गुह्यज्ञान ॥ सृष्टी रचीन मी निर्विघ्न ॥ नपावतां तुझें ज्ञान पूर्ण ॥ मानाभिमान मज बाधी ॥४६॥
तूं जवळी असतां नारायण ॥ बाधूं नशके मानाभिमान ॥ सृष्टि सृजता तुज विसरेन ॥ तेव्हां मानाभिमान बाधी कीं ॥४७॥
ह्मणसी कां होईल विस्मरण ॥ अतर्क्य तुझे मायाविंदान ॥ तें वाढवील देहाभिमान ॥ तुझी आठवण नुरवुनी पैं ॥४८॥
जैसी दीपासी काजळी ॥ तैसी तुझी माया तुजजवळी ॥ देहाभिमानें सदां सकळी ॥ मजही झांकोळी विषयासक्ती ॥४९॥
जे विषयाची अतिआसक्ती ॥ तेचि मायेची दृढप्राप्ती ॥ ते समूळ निरसे विषयासक्ती ॥ ऐसी ज्ञानस्थिती उपदेशी ॥३५०॥
काजळी आली दीपापासी ॥ तेंचि आलेपन दीपप्रकाशीं ॥ तेंवी त्वन्माया तुजपासीं ॥ बांधी जगासी विषयासक्तीं ॥५१॥
आतांचि मी स्वयें आपण ॥ झालों होतों जडमूढदीन ॥ तुवां उपदेशिलें तपसाधन ॥ तेव्हां तुझें दर्शन मज जाहलें ॥५२॥
‘ तपतप ’ ह्मणतांही मजपासीं ॥ त्या तुज न देखें मी हृषीकेशी ॥ अभिमानें भुलविलीं ऐसीं ॥ तुज हृदयस्थासी नदेखती ॥५३॥
ऐसा बाधक देहाभिमान ॥ तो मायायोगें सबळ पूर्ण ॥ ते मायेचें होय निर्दाळण ॥ तैसें गुह्यज्ञान मज सांगें ॥५४॥
कर्माकर्मीं तुझें स्मरण ॥ असावें गा समसमान ॥ करितां सृष्टिसर्जन ॥ नबाधी अभिमानतेंचि सांगे ॥३५५॥