चतुःश्लोकी भागवत - श्लोक ५

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
सआदिदेवो जगतां परो गुरुः स्वधिष्ण्यमास्थाय सिसृक्षयेक्षत ॥ तां नाध्यगच्छदृशमत्रसंगतां प्रपंचनिर्माणविधिर्यथा भवेत् ॥५॥

॥ टीका ॥
इंद्रादिदेवां पूज्य तत्त्वतां ॥ यालागीं आदिदेव विधाता ॥ प्रजापतींचाही पिता ॥ परमगुरुता पाहे तूं ॥५८॥
गायत्रीमंत्र उपदेशिता ॥ हाचि झाला परंपरता ॥ यालागीं परमगुरुता ॥ जाणता तत्वतां ब्रह्मयासी ॥५९॥
ऐसा परमगुरु ज्ञाननिधी ॥ तोहि कल्पाचिये आदीं ॥ होऊनि ठेला मूढबुद्धी ॥ सृष्टिसर्जनविधी स्मरेना तया ॥६०॥
एवं नाभिकमळीं कमलासन ॥ बैसला केवळ अज्ञान ॥ तंव हृदयीं झाली आठवण ॥ मी येथें कोण कैंचा पां ॥६१॥
मज कैंचें हें कमलासन ॥ येथें याचें मूळ तें कवण ॥ तें पाहावया आपण ॥ जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥
सहस्रवरुषें बुडी देतां ॥ कमळमूळ नयेचि हाता ॥ तेथें निरबुजला ये वरुता ॥ बैसे मागुता कमळासनीं ॥६३॥
विधाता विचारी चारी खाणी ॥ चौर्‍यांसीलक्ष जीवयोनी ॥ या चराचराची मांडणी ॥ सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥
सुर नर आणि पन्नग ॥ उत्तममध्यमअधमभाग ॥ कैसेनी सृजावें म्यां जग ॥ पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥
ऐसी सृष्टा चिंता करी ॥ निश्चळ बैसे कमळावरी ॥ पंचभूतें हीं कवणेपरी ॥ देहीं देह धारी होतील ॥६६॥
ऐसी तो चिंताकरी ॥ चित्त उगें नराहे क्षणभरी ॥ मी कोण मजभीतरीं ॥ हें मनीं निर्धारीं कळेना ॥६७॥
नकळतां माझें मीपण ॥ केवीं प्रपंच होय निर्माण ॥ ऐसें चिंतोनी अतिगहन ॥ चतुरानन अनुतापी होत ॥६८॥
कृपा करी गा अच्युता ॥ धांवें पावे गा भगवंता ॥ या एकार्णवाआंतोता ॥ होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥
मी अतिशयें तुझें दीन ॥ मजवरी कृपा करी संपुर्ण ॥ निजभावें अनन्यशरण ॥ मनीं लोटांगण घालितसे पैं ॥७०॥
ऐसी ब्रह्मयाची ती चिंता ॥ तत्काळ कळली भगवंता ॥ तो अंतर्यामी जाणता ॥ करताकरविता तो एक ॥७१॥
जंव हरी हृदयीं कृपा नकरी ॥ तंव अनुताप नुपजे शरीरीं ॥ त्याची पूर्ण कृपा ज्यावरी ॥ तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥
विवेकाविण वैराग्य उठी ॥ तें अपायीं घाली कडेकपाटीं ॥ कीं वैराग्याविण विवेक उठी ॥ तो जन्मला पोटीं नपुंसक ॥७३॥
विवेकाविण वैराग्य आंधळें ॥ वैराग्याविण विवेक पांगुळें ॥ हें एकएका अवेगळें ॥ झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥
जैं कृष्णकृपा पूर्ण घडे ॥ तैं विवेकवैराग्य समपाडें ॥ हृदयीं वाढती वाडेंकोडें ॥ तैं ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥
वैराग्यावीण जे स्थिती ॥ त्यातें गिळी विषयशक्ती ॥ विवेकहीन वैराग्यस्थिती ॥ ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥
जैं कृष्णकृपा पूर्ण आकळे ॥ तैं विवेक वैराग्य एके वेळे ॥ जैं हृदयीं वाढेप्रांजळें ॥ तैं परब्रह्म लोळे दोंदावळी ॥७७॥
तेणें श्रीनारायणें आपण ॥ ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण । कमळासनीं बैसोनि जाण ॥ झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥
त्यासी द्यावी आपुली भेटी ॥ कृपा उपजली हरीचे पोटीं ॥ नवह्ती चित्तशुद्धि गोमटी ॥ ह्मणुनी हरि रूपीं दृष्टी रिघेना ॥७९॥
जरी ह्मणाल बहुत दूरी ॥ इंद्रियां तो व्यापारी ॥ निजज्ञानें नांदे श्रीहरि ॥ घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥
इंद्रियव्यापार ज्ञानें होती ॥ तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं ॥ यालागीं हृदयस्थाची प्राप्ती ॥ प्राणी न पावती विषयांधजे ॥८१॥
ते विषयासक्ती ज्याची उडे ॥ त्या नांव चित्तशुद्धि जोडे ॥ तैं हृदयीं हरि आतुडे ॥ सर्व सांपडे परमात्या मग ॥८२॥
त्या चित्तशुद्धीलागीं जाण ॥ भावें करावें भगवद्भजन ॥ कां गुरुदास्य करितां पूर्ण ॥ परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥
ते घडावया भगवद्भक्ती ॥ तपादिसाधन सुयुक्ती ॥ देव सांगे ब्रह्मयाप्रती ॥ ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP