॥ श्लोक ॥
श्रीभगवानुवाच ॥
त्वयाऽहं तोषितः सम्यग्वेदगर्भसिसृक्षया ॥ चिरंभृतेन तपसा दुस्तोषः कूटयोगिनाम् ॥२०॥
॥ टीका ॥
लहरी लोटली चित्सागरा ॥ आनंदाचा सुटला झरा ॥ सुखमेघ गर्जे गंभीरगिरा ॥ ऐशिया वरा रमाधव बोले ॥२९०॥
परमानंदाची आली भरणी ॥ निजसुखाची उघडली खाणी ॥ तेवीं मृदुमंजुळमधुरवाणी ॥ सारंगपाणी बोलतसे ॥९१॥
तो स्वमुखें ह्मणे ब्रह्मयासी ॥ सृष्टिसर्जनसामर्थ्यासी ॥ तप केलें माझेआज्ञेसीं ॥ तेणें मी संतोषी बहुत झालों ॥९२॥
जेवीं कां निजबाळ तान्हें ॥ नाचोलागे मातेच्यानी वचनें ॥ तें देखोनियां पां नाचणें ॥ सुखावे मनें माउली जैशी ॥९३॥
तेंवी ‘ तप ’ माझें वचन ॥ ऐकोनी केलें अनुष्ठान ॥ तेणें अनुष्ठानें मी आपण ॥ जाणिजे संपूर्ण संतोषलों ॥९४॥
जो मी तुझेनी तपे संतोषलों ॥ प्रत्यक्ष तुजसा भेटलों ॥ तो मी हृदयस्थ दूर केलों ॥ दुःप्राप्य जाहलों कूटयोगियां ॥२९५॥
जे विषय कल्पूनि चित्तीं ॥ नाना तपें आचरती ॥ त्यांसी नव्हे माझी प्राप्ती ॥ जाण निश्चितीं कूटयोगी ते ॥९६॥
ज्या कनककांता आवडे चित्तीं ॥ ज्यांसी लोकेषेणेची आसक्ती ॥ त्यांसी नव्हे माझी प्राप्ती ॥ ते जाण निश्चितीं कूटयोगी ॥९७॥
जो जग मानी अज्ञान ॥ तेथें मी एकचि सज्ञान ॥ तो कूटयोगी संपूर्ण ॥ कल्पांतींही जाण नपवे मातें ॥९८॥
कूटऐसें देहातें ह्मणती ॥ त्या देहाची ज्या आसक्ती ॥ त्यासी कदा नव्हे माझी प्राप्ती ॥ ते जाण निश्चितीं कूटयोगी ॥९९॥
ऐसी कूटयोगियांची स्थिती ॥ देव सांगतसे प्रजापती ॥ तपें तुष्टला लक्ष्मीपती ॥ होत वरदमूर्ती विधातया ॥३००॥