चतुःश्लोकी भागवत - श्लोक ११ व १२

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
श्यामावदाताः शतपत्रलोचनाः पिशंगवस्त्राः सुरुचः सुपेशसः ॥ सर्वें चतुर्बाहव उन्मिषन्मणिप्रवेकनिष्काभरणाःसुवर्चसः ॥११॥
प्रवालवैडूर्यमृणालवचंसः परिस्फुरत्कुंडलमौलिमालिनः ॥ भ्राजिष्णुभिर्यः परितो विराजते लसद्विमानावलिभिर्महात्मनाम् ॥१२॥  ॥

॥ टीका ॥
हरिभक्त शोभायमान ॥ हरिचरणीं आवडी गहन ॥ नित्य नवीन प्रेमें हरिदर्शन ॥ तेणें हरिसमान स्वयें झाले ॥७७॥
कीटकी भयें ध्यातां भृंगीसी ॥ तद्रूपता बाणली तियेसी ॥ मां जे जीवें भावें भजती हरीसी ॥ ते हरिपासीं स्वयेंचि येती ॥७८॥
भजनें पावले हरिरूपासी ॥ ह्मणोनी झाले वैकुंठवासे ॥ यालागीं त्यांच्या स्वरूपासी ॥ परीक्षितीपाशीं शुक सांगे ॥७९॥
वैकुंठवासी भक्तजन ॥ घनश्याम राजीवलोचन ॥ गंभीरगिरा प्रसन्नवदन ॥ शोभायमान निजतेजें ॥१८०॥
मुकुटकुंडलें मेखला ॥ गळां आपाद रुळे वनमाळा ॥ कासे कसिला सोनसळा ॥ जेवीं मेघमंडळामाजीं वीज ॥८१॥
आजानुबाहु भुजा चारी ॥ बाहु अंगदें अतिसाजिरीं ॥ जडितमुद्रिका बाणल्याकरीं ॥ वीरकंकणावरी मणिमुद्रा ॥८२॥
सांवळी कमलमृणालें ॥ तैसे मस्तकीचे केश कुरले ॥ कुंकुमांकित करचरण तळें ॥ लाजिलीं प्रवाळें अधररंगें ॥८३॥
ललाटीं तिलक पिंवळा ॥ आपादलंब वनमाळा ॥ वैजयंती रुळे गळां ॥ घनसांवळा घवघवीत ॥८४॥
ज्यांची वदतां सुंदरता ॥ तंव ते पावले हरिस्वरूपता ॥ त्याहुनीयां सुंदरत्व आतां ॥ बोले बोलतां सलज्य ॥८५॥
नवल त्यांची सुकुमारता ॥ चंद्रकर खुपती लागतां ॥ सेजेमाजीं निजोंजातां ॥ गगनाची शून्यता सले त्यांसी ॥८६॥
त्यांचिया अंगप्रभा ॥ लाजोनी सूर्य द्वारा पैं उभा ॥ ज्यांचिया निजतेजशोभा ॥ हिरण्यगर्भा प्रकाश असे ॥८७॥
ऐसें सुंदर आणि सुकुमार ॥ निजभजनें भगवत्पर ॥ वैकुंठवासी अपार ॥ हरिकिंकर विमानस्थ ते ॥८८॥
पूर्णचंद्रप्रभेसमान ॥ निजपुण्यें झळके विमान ॥ ऐसे विमानी बैसोनि जाण ॥ हरीसी आपण क्रीडिती स्वयें ॥८९॥
जे शुद्धसत्वेंकरूनी संपन्न ॥ नुल्लंघत पतीचें वचन ॥ जे निर्विकल्प पतिव्रता पूर्ण ॥ तिसी निवासस्थान वैकुंठ ॥१९०॥
जे पतिपुत्रा आणि अतीता ॥ भोजनीं न देखे भिन्नता ॥ जे धनलोभाविण पतिव्रता ॥ ते जाण तत्वतां वैकुंठवासी ॥९१॥
जे पतीतें मानी नारायण ॥ जे कोणाचे न देखें अवगुण ॥ जे निर्मोह पतिव्रता पूर्ण ॥ तिसी निवासस्थान वैकुंठ ॥९२॥
ज्यांसी निवास वैकुंठस्थाना ॥ त्याचि स्त्रियाचें वर्णन ॥ श्रीशुक सांगतसे आपण ॥ सभाग्यपण तयांचेंची ॥९३॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP