श्रीशुकउवाच ॥ संप्रदिश्यैवमजनो जनानां परमेष्ठिनम् ॥ पश्यतस्तस्य तद्रूपमात्मनो न्यरुणद्धरिः ॥३८॥
॥ टीका ॥
जो गुह्यज्ञाचा निजसार ॥ जो आनंदाचा अलंकार ॥ जो योगियांचे परात्पर ॥ तो शुकयोगींद्र स्वयें बोले ॥४९॥
तो स्वानंदे ह्मणे परीक्षिती ॥ भगवंतें आपुली ज्ञानगती ॥ सांगीतली प्रजापती ॥ अन्वयस्थिती निजबोधें ॥७५०॥
सृष्टीची उत्पत्ति स्थिती शांति ॥ ज्ञान विज्ञान अद्वयभक्ती ॥ आपुलें मत यथास्थिती ॥ प्रजापती उपदेशिला ॥५१॥
पितामाता भित्त दोनी ॥ नसोनि जन्मला नाभिस्थानीं ॥ पाहे तूं तो आत्मयोनी ॥ अजन्म जनीं ह्मणती ब्रह्मा ॥५२॥
मोह ममता अहंभावो ॥ नसतां भूत भौतिक पहाहो ॥ तेव्हां सृष्टि स्रजी निःसंदेहो ॥ यालागीं पितामहो ब्रह्मयासी ह्मणती ॥५३॥
नाभीं जन्मला निजपोटीं ॥ त्यासी सृजावया भूतसृष्टी ॥ देउनियां निजात्मपुष्टी ॥ पूज्य परमेष्ठी सर्वांसी केला ॥५४॥
असुरसुरनर आपण ॥ वंदिती स्रष्ट्याचे निजचरण ॥ एवढें देउनी आत्मज्ञान ॥ अहंकृतिपूर्ण प्रतिष्ठिला ब्रह्मा ॥७५५॥
जवळुनी दूर नवचतां ॥ चतुर्मुखा सन्मुख असतां ॥ नारायणाची निजरूपता ॥ पाहतां पाहतां अदृश्य होय ॥५६॥
जे घृताची पुरुषाकृती ॥ थिजोनी आभासली होती ॥ ते विघरोनी मागुती ॥ राहे घृतीं घृतरूपें जेवीं ॥५७॥
तेंवी स्रष्ट्यावरीची कृपा पूर्ण ॥ स्वलीला सगुणनारायाण ॥ तोचि निर्गुणत्वें महाकारण ॥ आपआपण अदृश्य जाहला ॥५८॥
जेवीं जळाचिया गार ॥ क्षणएक भासली साकार ॥ तोचि पाहतां आकार ॥ विरोनियां नीर स्वभावें होय ॥५९॥
तेवीं श्रीनारायणाची मूर्ती ॥ स्वलीला भासली होती ॥ ते निर्गुणाचिये गती ॥ सहजस्थिती अदृश्य झाली ॥७६०॥
ब्रह्म्यापुढुनी नाहीं गेला ॥ तेथेंचि असोनी अदृश्य जाहला ॥ आकार लोपोनी असे उरला ॥ स्वयें संचला निर्गुणत्वें तो ॥६१॥
यापरी देव अंतर्धान ॥ स्वयें पावला नारायण ॥ त्यालागीं ब्रह्मा आपण ॥ सद्भावें पूर्ण नमिता होय ॥६२॥