पत्रिका भागीरथी ३२ वीं
मध्वमुनीश्वरांची कविता
परिसे गंगे त्रिपंथे गे । तुझें दर्शन मी नेघें ॥ध्रु०॥
जयनिये जिवलगे । मुक्तिपद मग नलगे ॥१॥
चित्त गुरुच्या चरणीं रंगे । ऐसी सद्गुरुभक्ती देगे ॥२॥
माझें बोलणें वात्रट । याचा मानूं नको वीट ॥३॥
केला सगराचा उद्धार । राजधर्मात्मा उदार ॥४॥
माझी तुज भीड काय । नव्हे भगीरथराय ॥५॥
येऊन राहों मी तुझे कांठीं । ऐसें पुण्य नाहीं माझे गांठीं ॥६॥
हीन दीन मी भिकारी । मन मळीन विकारी ॥७॥
अंध कुरूप आळसी । त्यासी सांडुनि कोठें पळसी ॥८॥
गंगा येते आळश्यावरी । हें तूं सत्य वचन करी ॥९॥
गंगे तुझें वोझें । न मानितां वचन माझें ॥१०॥
शतयोजनांहीवरी । तुझें स्मरण जो करी ॥११॥
त्यासी नेसी विष्णुलोका । तेथें आम्हांसी काय धोका ॥१२॥
तुझी लागली अवसरी । वाट पाहातोंहे घरीं ॥१३॥
वाट चुकोनिया येसी । पाय झाडीन मुक्तकेसी ॥१४॥
येई पाताळविवरें । करी पावन बिरुद खरें ॥१५॥
तुझ्या उदकें अभिषेक । करीन देवासी आवश्यक ॥१६॥
तहान लागलीहे भारी । पाजी शिवसीतळ वारी ॥१७॥
दशहर्याचा उत्सव । करीन धरूनिया भाव ॥१८॥
भाव जरी आहे चंगा । तरी काठवठींत गंगा ॥१९॥
गुरुभक्ताचिये घरीं । सायुज्यता पाणी भरी ॥२०॥
शुकयोगींद्राचे चरणीं । गंगा प्रयाग त्रिवेणी ॥२१॥
बुद्धि टाकुनिया कुडी । देतों चरणतीर्थीं बुडी ॥२२॥
राजसदननिवासी । न करी कलीचे सासुरवासी ॥२३॥
बाहेर काढुनी जीवन । स्नान करितील सज्जन ॥२४॥
कलश भरूनी उदक । करतील देवासी अभिषेक ॥२५॥
त्यांचे उद्धरी पूर्वज । भेटउनी गरुडध्वज ॥२६॥
नवस नवसावे किती । लावूं नको दिवसगती ॥२७॥
सोसुनिया आटाआटी । धावे मध्वनाथासाठीं ॥२८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP