स्फुट प्रकरणें - अभंग ३ रा
मध्वमुनीश्वरांची कविता
ब्रह्मकपाटाची तुज नाहीं सये । अजुनी कां रे न ये दया माझी ॥१॥
नाशिकत्रिंबकींचा आहें मी ब्राह्मण । यासी अभिमान करूं नको ॥२॥
गौतमानें गंगा नेली जे सागरा । फिरवीन माघारा वोघ तीचा ॥३॥
पाताळींची गंगा आणिन भूमीवरी । तरीच भूमीवरी दास तूझा ॥४॥
तुझी ते प्रतिज्ञा करीन लटकी । प्रार्थीन नेटकी चंडिका ते ॥५॥
माझ्या कूपामधें लोटी सवतीला । ऐसें पार्वतीला सांगेन मी ॥६॥
प्रल्हादाची सत्य केली त्वां प्रतिज्ञा । स्तंभांत सर्वज्ञा प्रगटलासी ॥७॥
आतां खडकींत होसील प्रगट । तरीच उत्कृष्ठ महिमा तुझा ॥८॥
भस्मासुरापुढें सोडिली त्वां शस्त्रें । विकळ झालीं गात्रें तेव्हां तुझीं ॥९॥
काय तूं विष्णूचा होसी उतराई । तुझी चतुराई कळली त्यासी ॥१०॥
अल्प गंगोदक देतां अभिषेका । सांग रे त्रिंबका काय वेचें ॥११॥
तुझें तुज देऊं आम्ही तें न घेऊं । नको कांहीं भिऊं मनामध्यें ॥१२॥
उपमन्यूसी त्वां दिधला क्षीरसिंधू । मजला नीरबिंदु देइनासी ॥१३॥
भुकेल्यासी अन्न तान्हेल्या जीवन । द्यावें हें वचन कवणाचें ॥१४॥
शंभरासी शेळी लक्षासी ते गाय । हाही काय न्याय विसरलासी ॥१५॥
तुज अभिषेक होय जेणें जळें । ऐसें हें मोहचळें तरी देई ॥१६॥
आम्हासी कळलें उत्तम त्वां केलें । परिणामीं गेलें तुझें देवा ॥१७॥
महादेवा देई दूरवरी दृष्टी । नको करूं कष्टी मुनीश्वरा ॥१८॥
शुकयोगींद्राचा आहें मी अंकित । तुजला निश्चिंत राहों नेदी ॥१९॥
तुझे देवपण सगळें गिळीन । टाकीन खिळून मनामध्यें ॥२०॥
आत्मलिंगाचिया करीन स्थापना । ह्मणवीन आपणा देव ऐसें ॥२१॥
जरी खरी भक्ति आहे ते शांभवी । घरींच जान्हवी आहे आह्मां ॥२२॥
देवें ऐकियेली दीनाची विज्ञप्ति । कृपावंत चित्तीं झाला मग ॥२३॥
म्हणे जेथें नित्य होती ब्रह्महत्या । अधर्मासी कृत्या आदरिती ॥२४॥
तेथें गंगादेवी येईल कोण्या गुणें । मागील दुःख दुणें आठविलें ॥२५॥
गौतमासी घडलें गोहत्येचें पाप । तेणें केलें तप बहुत दीस ॥२६॥
तुझ्या पदरीं तों नाहीं पुण्यलेश । नको करूं क्लेश खडकींत ॥२७॥
सेंदुरवाड्यामध्यें जेथें गणपती । तेथें भागीरथी प्रगटेल ॥२८॥
ब्रह्म कमंडलु त्याचें नांव ठेवी । मनांत आठवी पाय माझे ॥२९॥
स्नान करूनिया भाव धरी एक । करी अभिषेक मोरयासी ॥३०॥
ऐसें म्हणुनी माझें केलें समाधान । दाविलें निधान वाटेमध्यें ॥३१॥
या रे जन हो नका जाऊं दिगंतासी । भावें भगवंतासी शरण रिघा ॥३२॥
जयाचिया पायीं प्रगटली गंगा । तया पांडुरंगा पूजा तुम्ही ॥३३॥
मध्वनाथ येथें यात्रा भरितो नवी । भेटली जान्हवी जन्ममाता ॥३४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP