श्रीकृष्णाचीं पदें - पदे १२१ ते १३२
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १२१ वें
जीवलग प्राणाचा तूं प्राण ॥ध्रु०॥
शामळ कोमळ रूप तुझें परि चिद्रत्नाची खाण ॥१॥
तुजविण आणिक कांहीं नेणें श्रीहरि तूझी आण ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी होसी सर्व सुजाण ॥३॥
पद १२२ वें
भज मन राजस नंदकिशोर ॥ध्रु०॥
भवभय बाधा वारिल राधावदनसुधांशुचकोर ॥१॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी गोपीमानसचोर ॥२॥
पद १२३ वें
तो हा शेषशाई तो हा शेषशाई ॥ध्रु०॥
कुंजवनीं यमुनेच्या तीरीं चारितो हा गाई ॥१॥
मध्वनाथ म्हणतो हा वैष्णवांचा वरदायी ॥२॥
पद १२४ वें
देवा वनमाळी कान्हो देवा वनमाळी ॥ध्रु०॥
अखंडित माझी वाणी गावो तुझी नामावळी ॥१॥
मध्वनाथ म्हणे माझ्या अनिवारा गाई वळी ॥२॥
पद १२५ वें
तारी मज सजणा दीन अनाथ मी काय करूं ॥ध्रु०॥
हा भवसागर दुस्तर दुर्भर । सांग दयानिधि केवि तरूं ॥१॥
मध्वमुनीश्वर सेवक तूझा । यासि कधीं तूं नको विसरुं ॥२॥
पद १२६ वें
कृपाघना तुज कां नये करुणा । शुकसनकादिक वंदिती चरणा ॥ध्रु०॥
उत्कंठा मनीं पाय पहाया । लागली निशिदिनीं जगदोद्धरणा ॥१॥
अंतरांचें गुज जाणसी सर्वही । कृपा करिसी अघसंहरणा ॥२॥
ध्यान भजन मी कांहींच नेणें । दास म्हणवितों पतितोद्धरणा ॥३॥
मध्वमुनीचें अंतर जाणुनी । चरण दावी हरि भवभयहरणा ॥४॥
पद १२७ वें
जाणों हरिचे पाय । आम्ही जाणों हरिचे पाय ॥ध्रु०॥
नियम न जाणों यमहि न जाणों । नेणों अन्य उपाय ॥१॥
परिस देउनी सोनें घेणें । जळो त्याचा व्यवसाय ॥२॥
कृष्णाचें पद सोडुनि आम्ही । मुक्ति वरूं हाय हाय ॥३॥
पद १२८ वें
यासी कां रे विसरसी शेवटीं मनुजारे ॥ध्रु०॥
गोकुळांत प्रगटला ॥ नंद गोपासाठीं ॥१॥
कल्पद्रुमातळीं खेळे ॥ कालिंदीचेकांठीं ॥२॥
निरालंब होता उभा ॥ टेकुनिया काठी ॥३॥
परब्रह्म व्यापक हा ॥ धांवे गाईंपाठीं ॥४॥
एकवट करूनिया ॥ दही काला वांटी ॥५॥
मध्वनाथ नित्यतृप्त ॥ उष्टे हात चाटी ॥६॥
पद १२९ वें
गोविंदरामा दयानिधे । गोपाला रामा ॥ध्रु०॥
विकसितैंदीवरदललोचन ॥ कलिमलमोचन पावननामा ॥१॥
गोवर्धनोद्धर दीनजनोद्धर ॥ मदनमनोहर मेघश्यामा ॥२॥
मध्वमुनीश्वरवरदपरात्पर ॥ ब्रह्म सदोदित निजसुखधामा ॥३॥
पद १३० वें
गोकुळिंचा गुणि गुंडा । गे बाई ॥ध्रु०॥
लटपट पेच मुखावरि शोभती । गणपतिऐसी शुंडा ॥१॥
रुक्मिणीच्या कुंकावांचुनी । लिप्त नसे हळकुंडा ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । संतजनाचा हुंडा ॥३॥
पद १३१ वें
अगबाई हाच माझ्या पोशाचा दानयान । यानें लुटिल्या चावलाच्या गोनयान गो ॥गवारी गो॥ध्रु०॥
यानें अघासुर बकासुर मारल्यान । यानें बळी पाताळीं नेऊन घातल्यान ॥ यानें कंसाची गर्दन तोरल्यान गो ॥गवारी गो॥१॥
समुद्रासिनी भाक दिली गोरयान । यानें बळविले गोरयाचे ढोरयान ॥ प्रल्हादासिनी अग्नींत तारल्यान गो ॥गोवरी गो॥२॥
द्रौपदीच्यानि धावण्यासी धावल्यान । बहीन म्हणुन संकटीं तारल्यान ॥ अभिमन्यासि केला त्यांनीं मारल्यान गो ॥गोवरी गो॥३॥
यानें रावण कुंभकर्ण मारल्यान । यानें राज्यासि बिभीषण थापल्यान ॥ वाल्या कोळ्यासि गडे यानें तारल्यान गो ॥गोवरी गो॥४॥
दुबळे ब्राह्मण वस्त्रासि नाडल्यान । त्याला सोन्याची नगरी धाडल्यान ॥ मोठें दारिद्र्य त्याचें फेडल्यान गो ॥गोवरी गो॥५॥
बारा सोळा मिळुनि गौळणी । त्यांनीं वेढिला चक्रपाणी ॥ मध्वनाथ धन्य तुझी वाणी गो ॥गोवरी गो॥६॥
पद १३२ वें
श्रीकृष्णा करुणाकरा यदुविरा त्रैलोक्यनाथा हरी । गोविंदा मधुसूदना महिधरा दीनाजना उद्धरी ॥ विश्वात्मा जगदोद्धरा म्हणविसी सर्वांसही जाणसी । माझी कां करुणा न ये अझुनिया निर्वाण कां पाहसी ॥१॥
जन्मापासुनि तूंचि एक स्तविला नेणों दुजा स्वप्निंही । कल्पांतीं मति हे कदापि न ढळो आकाश मोडो मही ॥ तैं मी दास तुझाचि हा म्हणवितों श्रीवासुदेवा हरि । हा माझा कृतनिश्चयो निजमनीं तूं जाणसी अंतरीं ॥२॥
माझा काय मनांत कोप धरिला यालागिं धांवेसिना । किंवा भक्तजनीं तुतें निजमनीं त्या स्थापिलें पूजना ॥ किंवा गोपवधू समग्र मिळुनी वेष्टूनियां घेतलें । त्यांच्या प्रेमरसीं निमग्न असतां मातें तुवां सांडिलें ॥३॥
जों तूं नायकसी स्वभक्तकरुणा धांवोनिया येसि ना । सर्वज्ञा तुजलागिं येइल उणें कोण्हीच बोभाविना ॥ ऐसें तूं न करी मनांत न धरी तूं कोप माझा हरि । वैरी हांसति हे कदापि न करी साष्टांग पायांवरी ॥४॥
संसारीं निजभक्त दुःखित असे हें तों उणें स्वामियां । थोराचा जरि पुत्र म्लान दिसतो ही लाज ज्याची तया ॥ राजानें निज कामिनीस त्यजिलें कोणी न मानी तिला । माझा निश्चय हाचि जाण सखया मी ग्लानि भाकी तुला ॥५॥
आतां हा अपमान जाण सहसा तो साहवेना मला । दुःखाचे लहरीमधें बुडतसें कीं सेवुनी मीं तुला ॥ माझें हें विपरीत सुकृत असें जाणूनि कृपा नये । धिक्कारा अधमा जिवाहुनि मला जें श्लाघ्य तूंतें स्वयें ॥६॥
कोट्याहूनि अधिक दोषि परि मी तूझाचि हो अंकिला । अन्यायी म्हणवोनि दंड करिसी ही लाज तूझी तुला ॥ देवा निष्ठुरता त्यजोनि मजला दे भेटि दामोदरा । सांडी संशय हा प्रसन्नवदना दावी रूपा सुंदरा ॥७॥
दीनानाथ अनाथबंधु म्हणती कारुण्यसिंधू तुला । भक्तांच्या प्रतिपाळका सुखघना सांडूं नको रे मला ॥ वारंवार पुनःपुनः यदुविरा विज्ञापना ही असे । देई ठाव मला स्वपादकमलीं निर्विघ्न जेथें असें ॥८॥
हें करुणाष्टक नित्य पाठ करि जो सधक्त प्रेमादरें । जें वांछी फल पूर्ण दे हरि तया मोक्षादिकें सादरें ॥ संसारार्नव घोर त्यांत बुडतां ही जाण नौका असे । हें निःसंशय मध्वनाथ म्हणतो सर्वां निवेदीतसें ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP