मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ३१ ते ४०

श्रीकृष्णाचीं पदें - पदे ३१ ते ४०

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग ३१ वा
कृष्ण म्हणे वडज्या वेड्या । पेंद्या सुदाम्या वांकड्या ॥१॥
वृंदावन कुंजामाजीं । करूं दहिकाला आजि ॥२॥
ऐसें वाटे माझ्या जीवा । तुम्ही अवघे येथें जेवा ॥३॥
तुमच्या पाहूं द्या सिदोर्‍या । मजसी करूं नका चोर्‍या ॥४॥
शिळी खिचडी दहीं खाऊं । अवघे येकरस राहूं ॥५॥
अवघे येथील येथें सारूं । सिदोरीचें ओझें वारूं ॥६॥
तुम्हीं जिवलग सांगाती । जेऊं येकेचि पंगतीं ॥७॥
जाल्या तृप्तीचें तें सुख । मग अनुभग होईल येक ॥८॥
वरिल्या रानीं गाई चारा । गडी अवघे ते पाचारा ॥९॥
मध्वनाथाचिया बोला । वेडा वडजा मानवला ॥१०॥

अभंग ३२ वा
वडजा कान्होबासी म्हणे । तुझ्या पावलों मी खुणें ॥१॥
गडी बोलावी वाकड्या । येरे राम्या कुलाकड्या ॥२॥
खरखरमुंड्या बेटीचोदा । तुझा कुंहाराचा हुदा ॥३॥
बेठ्या बिसण्या येकबोट्या । निलाजर्‍या लत्तकुट्या ॥४॥
येरे महाद्या जोगड्या । भांग्या नागव्या उघड्या ॥५॥
नार्‍या बतकीच्या लेका । तुझा चुगलखोरांत लेखा ॥६॥
हनुमंत्या सेंपटीच्या । बेट्या उपजत लंगोटिच्या ॥७॥
येरे गरुड्या निंबरआंड्या । तुझा भाऊ निपटगांड्या ॥८॥
येरे बेट्या अंत्या नाग्या । जन्मोजन्मींचा तूं लाग्या ॥९॥
बेट्या महाद्याच्या गण्या । ढेरपोट्या दांतउण्या ॥१०॥
साम्या कारत्या सिंदळ बोड्या । बारजिह्या जगझोड्या ॥११॥
बेट्या सिंगाळीच्या नांद्या । तुला बोलावितो गोंद्या ॥१२॥
यारे यारे यारे । चेपुनी दहींकाला खारे ॥१३॥
कान्हो देतो येकबेक । घेईना तो माझा लेक ॥१४॥
मध्वनाथाचे सेवक । ब्रह्मादिकां करिती रंक ॥१५॥

अभंग ३३ वा
येरे इंद्या बाईलभाड्या । बेंबटमार्‍या भगदळपाड्या ॥१॥
पोटजळ्या मोकळतोंड्या । किती चारसील मेंढ्या ॥२॥
न सोडिसी जितमेल्या । यम्या तुझा झवे हाल्या ॥३॥
बेट्या नीर्‍या हागिरगांड्या । येरे वरुण्या पाणबुड्या ॥४॥
बेट्या पादर्‍या पवन्या । तुला बोलवितो कान्हा ॥५॥
बेट्या कुव्या राक्षसहाड्या । दुनेदाराच्या कुकड्या ॥६॥
येश्या तुझा ढवळा बैल । मसणीं चरतोहे पैल ॥७॥
कान्होबाचे गडी बळी । त्यांसी गोवळ कांपती चळी ॥८॥
इतराचा कोण पाड । संवगड्यांचा चालवी लाड ॥९॥
मध्वनाथाचिया सत्ता । कळिकाळा हाणती लत्ता ॥१०॥

अभंग ३४ वा
रवळ्या तुझ्या पडल्या ठिणग्या । येरे सोम्या पांढरकणग्या ॥१॥
त्रिभुवन मंगळीच्या । बेट्या तिकोण्या टवळीच्या ॥२॥
बेट्या बुध्या हिरवटगंग्या । सिंदळिच्या हेपुसलिंग्या ॥३॥
बेट्या ब्भट्या गुरुगड्या । उगा राहे बडबड्या ॥४॥
चुकुर होऊं नको कान्या । डोळा देईल कान्ह्या ॥५॥
राक्षसभुवनींच्या सन्या । घेरे उडी खुरासन्या ॥६॥
बेट्या तुझी इजत राहो । तुझें डोसकें मारिलें हो ॥७॥
बेटा उरकेत मोथा । बाहेर थोटा अंतरीं खोटा ॥८॥
देवाजीचा अनुग्रह । हात जोडी नवग्रह ॥९॥
मध्वनाथाचा गडी भोळा । त्यानें गोवळ केले गोळा ॥१०॥

पद ३५ वें
गोवळ म्हणती कान्होबासी आलों रे । वाकड्याच्या गोष्टी ऐकुनि भ्यालों रे ॥१॥
चहूंकडे आमच्या गाई फाकल्या रे । देखुनी वडजा दाखवितो वाकल्या रे ॥२॥
अनिवारा आमच्या गाई वोढाळा । वराडीची सवे त्यासि गोपाळा ॥३॥
वाट सांडुनी धावती आडवाटे रे । वळत्या देतां पायीं मोडती कांटे रे ॥४॥
नाहीं पायतण काठी घोंगडें रे । पावसाळ्याचें धडुत न घोंगडें रे ॥५॥
हिवाळा उन्हाळा कसुनी रानीं रे । कधीं न मिळे उत्तम अन्नपाणी रे ॥६॥
पुरे पुरे कान्हो तुझी गडीरे । कधीं न मिळे ताकाची कढी रे ॥७॥
तिखट कांदा भाकर खातो घाटा रे । बाहेर आम्ही मिरवितों ताठा रे ॥८॥
सजगुर्‍याचा भात खातों गोवरा रे । कांजी घालुनि रांधितो मिठोबरा रे ॥९॥
आंबट कण्या आंबिलीसी खातों रे । मिरसेंगाचें मीठ घालुनि लाटितों रे ॥१०॥
गाजराचें लोणचें तोंडीं लावितों रे । बाईलेस बोंडफळ दावितों रे ॥११॥
दिवाळीस खातों तेल खिचडी रे । दसर्‍याच्या दिवशीं पोळी दुचडि रे ॥१२॥
न मिळे दहीं दूध तोप लोणी रे । पोटागीचे घरीं नाहीं कोण्ही रे ॥१३॥
कान्होबासी म्हणती गडी गोपाळ रे । मध्वनाथा केव्हां करिसी सुकाळ रे ॥१४॥

पद ३६ वें
कृष्णा तुझ्या कपिला गाई चांगल्या रे । वोंगळ आमच्या कपाळासी लागल्या रे ॥१॥
गोवळ म्हणती आमच्या गाई भाकडा रे । ऐकुनिया हासताहे वाकड्या रे ॥२॥
तुझे गडी दहीं दूध खाती रे । आम्ही तोंडीं घालुन घेतों माती रे ॥३॥
नये दान करितां उत्तम पात्रीं रे । ऐशा वोंगळ गाई सर्व गात्रीं रे ॥४॥
येक हगरी येक मुतरी लातरी रे । चोरूं या हुंबर ते रात्रीं रे ॥५॥
कसे कान टवका........

पद ३७ वें
कान्हो थंबालले थंबाल आपुल्या गाई । आम्ही आपुलाल्या घलासि जातो भाई ॥ध्रु०॥
कालले मोली गाय याली ॥ तिचा खलुच ले लइ लइ गोल जाला । अघघ्या गवलयाला गवल्याला लइ लइ दिला ॥ मी गलीब ले म्हणून थोला दिला ॥१॥
तुझा बैल ले बैल चुकला मोला ॥ त्याला बघण्याला फिललो सैलावैला ॥ तुझा लागावला लागावला म्हाताला ॥ आता कामले कामले कलतो माझा लौला ॥२॥
तुम्ही थोलले पातलाचे लेकू ॥ तुम्हां मधें मी गलीब आहें एकू ॥ माझी कैचीले तुम्हांस आवय नाहीं ॥ काय थांगू ले काते मोलले पाई ॥३॥
तुम्ही यमुना तीलीं नित कलितां अंघोली ॥ आम्हा म्हणतां ले बा जाय आण शिदोली ॥ माझ्या संग ले बा दुसला नाहीं गली ॥ मी लुसुनी बा जाइन आपुल्या घलीं ॥४॥
तुझ्या कासेस ले पितांबल पिवला ॥ हात जोडितो मध्वनाथ भोला ॥५॥

पद ३८ वें
खेळे चिमणा घेउनि चेंडू चिमणासा दांडू ॥ध्रु०॥
चिमणी घोंगडी चिमणी काठी चिमणा जगजेठी ॥ चिमणा वासरा लागे पाठीं यमुनेच्या तटीं ॥१॥
चिमणी मुरली वाजवि ध्वनि चिमण्या गवळणी ॥ चिमन्या गाडग्यां घेउनि लोणी हिंडती रानीं ॥२॥
चिमणा मुगूट चिमणा टिळा चिमणीशी माळा ॥ चिमणा कौस्तुह शोभे गळां मुलांचा मेळा ॥३॥
चिमणा पितांबर चिमण्या भुजा यादवराजा ॥ चिमण्या मुलांच्या बल्लवझुंजा ॥ पाही कान्हया राजा ॥४॥
चिमणा भंवरा चिमणी जाळी चिमणीशी गोळी ॥ चिमण्या भक्तांची आज्ञा पाळी चिमणा वनमाळी ॥५॥
चिमणा चिमणी घरें फोडी दुधाची गाडी ॥ मध्वनाथ हात जोडी गड्यांचा गडी ॥६॥

पद ३९ वें
झेला झेला चेंडू झेला । झेलिना तो वायां गेला ॥ नरदेहीं घोडी केला । सारी खालें जिवें मेला ॥१॥
येथें कामा न ये नीच । गडी पाहिजे तो उंच ॥ उंच म्हणेल जो उंच । त्यासी ठाव पिंपळ चिंच ॥२॥
घोडीवरी होईल स्वार । त्याचा बहुत पडेल भार ॥ भाराखाले निघेल बूर । पोरें म्हणती घोडीकुर ॥३॥
खेळ खेळूं नको आतां । चेंडू येईल तुमच्या हाता ॥ कळिकाळासी हाणाल लाता । शरण जारे मध्वनाथा ॥४॥

पद ४० वें
मायानदीतीरीं प्रपंच वाळवंट । तेथें आरंब्भिला थाट हुतुतूचा ॥१॥
चंद्रसूर्यादिक नांवें ठेवुनी घेती । यथाभागें होती खेळकेर ॥२॥
स्वर्गफळरूप मांडोनिया फळी । अवघेही जवळी खेळताती ॥३॥
पापपुण्यरानें दोहींकडे वैरी । जाता नये दुरी भय त्याचें ॥४॥
जर्‍ही आपल्या बळें पैलीकडे गेला । जिवंतचि मेला कोण सोडी ॥५॥
हुतुतु खेळतां उदंडचि मेले । ते नाहीं उठविले कोण्ही तर्‍ही ॥६॥
ऐसा गडी कैसा फळी फोडुनी जाय । धन्य त्याची माय प्रसवली ॥७॥
फळी फोडुनिया गेला येक शुक । वरकडही ठक करीताती ॥८॥
सावध होउनिया खेळ सूत तूं रे । येथें कांहीं नुरे बळ तूझें ॥९॥
मध्वनाथीं अवघा हुतुतू लटका । खेळाचा तटका तोडा कोण्ही ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP