मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ४१ ते ५०

श्रीकृष्णाचीं पदें - पदे ४१ ते ५०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ४१ वें
कान्हो हुंबळी रे कान्हो तूं बळी रे । तुझी मुरली ऐकून यमुना तुंबली रे ॥ध्रु०॥
भक्तिरसें वृत्ति जेव्हां तिंबली रे । तेव्हां तुझी मूर्ति हृदयीं बिंबली रे ॥१॥
पिंड ब्रह्मांडाची उघडुनी संबळी रे । देव न पूजी त्याची जननी चुंबळी रे ॥२॥
विषयतृष्णासर्पिण ज्याला झोंबली रे । गरुडध्वजा त्याची माय बोंबली रे ॥३॥
प्रपंचाची अवघी गोडी आंबली रे । मध्वनाथा नलगे जड कांबळी रे ॥४॥

पद ४२ वें
त्यासी कांरे विसरसी शेवटीं मनुजारे ॥ध्रु०॥
गोकुळांत प्रगटला । नंद गोपासाठीं ॥१॥
कल्पद्रुमातळीं खेळे । कालिंदीचे कांठीं ॥२॥
निरालंब तो हा उभा । टेकुनियां काठी ॥३॥
परब्रह्म व्यापक हा । धांवे गाईपाठीं ॥४॥
गोपाळांच्या सोडितोहे । सिदोर्‍यांच्या गांठी ॥५॥
येकवट करुनियां । दहीकाला वांटी ॥६॥
मध्वनाथ नित्य तृप्त । उष्टे हात चाटी ॥७॥

पद ४३ वें ( राग कल्याण )
सावळा गे रमाकांत सनातन । परब्रह्म परात्पर पद्मनाह पुरातन ॥ध्रु॥
कृष्ण विष्णु जनार्दन करीं धरी गोवर्धन । कालियमर्दन निजानंदवर्धन ॥१॥
त्रिविक्रम वामन पतितपावन । पंकजलोचन संकत मोचन ॥२॥
सनकसनंदन ज्यास करिती वंदन । नंदाचा जो नंदन तोडी भवबंधन ॥३॥
करी दुष्ट दैत्यघात त्याची काय सांगूं मात । जोडुनिया दोन्ही हात नाथ करी प्रणिपात ॥४॥

पद ४४ वें
कानड्या कान्हो ठकड्या वौंशीवाल्या ॥ध्रु०॥
येकीला रंजवणें । दुजीला गांजणें । यांही गोष्टी तुझ्या वांट्या आल्या ॥१॥
विरहें व्याकुळ जाल्या । गौळणी वायां गेल्या । धन्य त्या अधरामृत प्याल्या ॥२॥
गुरुसी जाउनि शरण । हृदयीं धरिले चरण । नयनीं ज्ञानांजन ल्याल्या ॥३॥
तनधन विसरल्या । निजमनें अनुसरल्या । नाहीं या लौकिकासी भ्याल्या ॥४॥
मध्वनाथास्वामी । तुझिया दासी आम्हे । जीवनमुक्त तेणें जाल्या ॥५॥

पद ४५ वें
गोविंदा कृष्णा गोपवेषा ॥ध्रु०॥
यात्रिक घालिती घृतअवदाना । तव अभिधाना देउनी प्रेषा ॥१॥
यज्ञेश्वर तो प्रगट तूं होसी । आरूढ होउनियां मेषा ॥२॥
कंस केशी अघबक धेनुक । उद्धरिले ते करितां द्वेषा ॥३॥
गोकुळपाळक गोवळबाळक । न कळे तुझा महिमा शेषा ॥४॥
मध्वमुनीश्वर पुराणपुरुषा । निर्गुणरूपा निर्विशेषा ॥५॥

पद ४६ वें
गोकुळपाळक चाळक बालक नंदाचा ॥ध्रु०॥
श्यामळ कोमळ वोतीव पुतळा केवळ सच्चिदानंदाचा ॥१॥
कुंजवनीं मृदुमंजुल पावा । वाजवी मोहनछंदाचा ॥२॥
मध्वमुनीश्वर साधक म्हणतो । छेदक जो भवबंधाचा ॥३॥

पद ४७ वें
गोपाळा वारी संसारमायाजाळा । गोविंदराया झडकरी निरसी या कळिकाळा ॥ध्रु०॥
कामलोभें भालल्या तुज गोपीबाळा । त्या मुक्त केल्या नेल्या निजधामा वेल्हाळा ॥१॥
वैरभावें स्वरूपीं मेळविलें त्या शिशुपाला । ध्रुवलेकराला अढळपदीं बैसविसी कृपाळा ॥२॥
तां उद्धरिला पापी अजामीळ जातिनिराळा । देखुनि ज्याला यमदूतांचा संघ पळाला ॥३॥
तूं मायबापा म्हणविसी या जगीं लेकुरवाळा । श्रीमध्वनाथा पाजी नामसुधासुरसाला ॥४॥

पद ४८ वें
आणा वो वृंदावना जाउनिया यादवराणा ॥ध्रु०॥
माझा तळमळी जीव त्यास कैसी न ये कींव । ज्याच्या पायां सदाशिव । भावें वंदितोहे जाणा ॥१॥
दुःख आदळतां आंगीं । क्षणक्षणां होतें जागी । मध्वनाथस्वामीलागीं । वोवाळीन पंचप्राणा ॥२॥

पद ४९ वें
काय करूं सये आतां जीव वेडा जाला ॥ध्रु०॥
लौकिकाची लज्जा गेली । ऐसी करणी कृष्णें केली । अधरामतुरस प्याला जीव वेढा जाला ॥१॥
शरीराचें भान नाहीं । ऐसी दशा जाली पाही । मदनमोहन दावा वंशीवाला ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी । तोचि विरहबाधा वारी । तिळभरि नाहीं माझी दया त्याला ॥३॥

पद ५० वें ( राग सोरट )
मोहन हा मतवाला भोंदु ऐचा कोठुनि आला वो ॥ध्रु०॥
कुंजवनीं मज मोहित करुनी अधरामतरस प्याला वो ॥ हृदयग्रंथिस भेदुनि भोगितो धीट मवास हा जाला वो ॥१॥
मध्वमुनीश्वरवरद विनोदी नाहीं कोण्हां भ्याला वो ॥ यमुनातटीं नट वंशीं वटावळीं अघटित करितो ख्याला वो ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP