पद १६१ वें
( वासुदेव )
श्रीहरी वासुदेवा नटवेष साजिरा जी जी । निःसंग आणि रंग निजरंग माजला जी जी ॥ तुझें रूप देखतांचि रतिकांत लाजला जी जी । राम या कृष्णनामें करताल वाजला जी जी ॥ गोविंदा रामा हो गोपाळा रामा जी जी । शिखिपिच्छमुगुटांतें शिरीं भाव दाविला जी जी ॥ निढळीं केशराचा टिळक रेखिला जी जी । पदकजडित कंठीं शोभला जी जी ॥ राम या कृष्ण नामें करताल वाजला जी जी । तव नामें तारिलें हें दान पावलों जी जी ॥ स्तविती वाल्मिकादि हें दान पावलों जी जी । सोरटी सोमनाथ हें दान पावलों जी जी ॥ परळीवैजनाथा हें दान पावलें जी जी । आंवढ्या नागनाथा हें दान पावलें जी जी ॥ कलियुगीं त्रिंबकानें हें दान दिधलें जी जी ॥१॥
पद १६२ वें
माझा म्हसोबा पाटील । पुढें बादशाही थाटील ॥१॥
हातीं घेउनी तलवार । करील दुष्टांचा संहार ॥२॥
देव होईल अश्वस्वार । वधील म्लेंछातें अपार ॥३॥
तेथें निघतील गैबी फौजा । मध्वनाथ पाहील मौजा ॥४॥
अभंग १६३ वा
भला बापा पुंडलीका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
मोठें भावार्थाचें बळ । त्याचें लाधलासी फळ ॥२॥
परब्रह्म द्वारापुढें । उभें केलें घालुनि कोडें ॥३॥
बरा जिंकियेला डाव । दिला निशाणासी धाव ॥४॥
मध्वनाथ म्हणे भाई । माझी सद्गति तुझ्या पाईं ॥५॥
पद १६४ वें
( रंभा )
पहा त्या इंद्राच्या गडे सभेला । पण रंभेनें केला ॥ जिंकुनी आणिन मी शुकदेवाला । गुरु वशिष्ठ बोलिला ॥ रंभे जाय तूं गडे येथुनी । नष्ट तूं कामिनी ॥१॥
भली गेनार अभिमानी । गडे अभिमानी ॥ध्रु०॥
पहा पहा अहल्या गडे पतिव्रता । गौतमऋषीची कांता ॥ इंद्रें धरूनिया गडे मनीं अहंता । भोग दिला तत्त्वतां ॥ कोपें शापिलें गडे मुनीनीं । झाला इंद्र बहुनयनी ॥२॥
पहा पहा परस्त्रियेचे संगतीनें । बुडाले ते कोण कोण ॥ गडे हा लंकेचा रावण ॥ गेला सफई बुडून ॥ लंका जाळूनिया केली धुळधाणी ॥३॥
पहा पहा कीचक गडे बळवंत । मनांत धरितो खंत ॥ द्रौपदी भोगीन मी क्षणांत । ह्या चित्रशाळेंत ॥ भीमानें टाकिला गडे रगडुनी ॥४॥
पहा पहा पार्वतीचें रूप पाहून । ब्रह्मा झाला तल्लीन ॥ केली बोहल्यासी गडे प्रदक्षिणा । आम्हां धीर धरवेना ॥ शंकरनेत्रींचा गडे प्रळयाग्नी । दिलें शिर उडवोनी ॥५॥
पहा पहा परस्त्रियेची संगत । जिवास होईल घात ॥ राम राम स्मरावा तुह्मी मनांत । मध्वनाथ ह्मणे सत्य ॥ सावध होई तूं हरिभजनीं । जाई भवसागर तरूनी ॥६॥
पद १६५ वें
हरिगुण महिमा बोल ॥ध्रु०॥
हरिगुणमहिमा मधुर सुधारस सुख विषयाचें फोल ॥१॥
लौकिकलज्जा सांडुनि अवघी कीर्तनरंगीं डोल ॥२॥
श्रीहरिभजनीं विन्मुख त्याला हा भवसागर खोल ॥३॥
मध्वमुनीश्वर सांगतसे येणें नाहिं तुला मग मोल ॥४॥
पद १६६ वें
हरिचें नाम बोला बरवें । वदनीं प्रातःकाळीं ॥ध्रु०॥
केशव माधव वामन विष्णु । श्रीधर श्रीवनमाळी ॥१॥
गोवर्धनधर मदनमनोहर । दीनजना प्रतिपाळी ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी संकट सर्वहि टाळी ॥३॥
ऐसें जाणुनी कांरे जन हो । पडता मायाजाळीं ॥४॥
अभंग १६७ वा
अवघेंच ब्रह्म गड्या, पाहातां जगीं अवघेंच ॥ध्रु०॥
एकवर्णी सुवर्ण नानावर्णी अलंकार । कोण्ही कायफूल बुगड्या ॥१॥
एकवर्णी तंतू नानावर्णी पट । कोण्ही जोट शेले पगड्या ॥२॥
नानावर्णीं गाईं एकवर्णी दूध । कोण्ही काळ्या गोर्या तांबड्या ॥३॥
मध्वमुनीश्वर सांगतसे तुज । द्या प्रेमामाजि बुड्या ॥४॥
पद १६८ वें
प्राण्या राम भजावा रे । मनींचा गर्व त्यजावा रे ॥ध्रु०॥
दौलत झेंडा तबकें हांडा, खाशील उनउन मांडा । मडक्यामध्यें पाणी तापतें, रडती पोरें रांडा ॥१॥
उंच माडी नेसुन साडी, कानीं बाळी बुगडी । यमरायाचें येईल बोलावणें, निशंक काया उघडो ॥२॥
धोतरजोडा कानीं चौघडा बसाया खासा घोडा । यमरायाचे येतील दूत, पडेल पायीं खोडा ॥३॥
मध्वनाथ म्हणे ऐसें उमजा, वाया जातील अवघ्या गमजा । यमरायाचे येतील दूत म्हणतील पुर जा पुर जा ॥४॥
पद १६९ वें
मोरणी
सोहं मोरणी गडे साजणी मोरणी, गुरुनें दिल्ही होती आंदणीं ॥ध्रु०॥
सप्त धातूंचें धातूंचें कंचन, घेतलें बहुता युक्तीनें । नवरंगाचीं रंगाचीं नवरत्नें बसविलीं कारागीरानें । अस्सल तीं हिरे कीं त्रिगुण सुर्तीवर मोती चुणें । लकेरीवर वर सर्जे दोन, जैसें चंद्राचें चांदणें ॥ उलट वर फांसा फांसा बसवुनी ॥१॥
रत्न माणिक माणिक अद्भुत, लसण्यावर जडली प्रीत । श्वेतकर्पूर कर्पूर जैसा कांत बसविला हिरकणीसहित । शामरंगाचा रंगाचा लोलीत, केवळ रजनीचा सूत । जडला कैसा कैसा वो संगती, मिळणी मिळाली अद्भुत ॥ एकाएकीं कसी केली जडणी ॥२॥
चमकवर नीळ नीळ सद्रेचा, सुनीळ गाभा गगनींचा । आतां बहु जडाव रत्नाचा, प्रकाश अनंत सूर्यांचा । डौल हा कैसा कैसा वो मायेचा, दाखवी मोरणीचा । खवळला काम योग्याचा, लोपला प्रकाश वस्तूचा ॥ पडली झांपडी झांपडी ब्रह्मभुवनीं ॥३॥
ऐशी ही माया माया मोरणी, नवरंगाचें हें पाणी । गुंतले महा महा सिद्धमुनि, अगाध मायेची करणी । गुरुची दया दया गे साजणी, जहालों तटस्थ भुवनीं । पहा पहा उगाच उगाच लोचनीं, मध्वनाथाची ध्वनी ॥ उघड निजवस्तू वस्तू घ्या कोणी ॥४॥
पद १७० वें
तुजभंवता जीव फिरे, विठोबा सांवळीया मसी बोल कीं रे ॥ध्रु०॥
आशा मनशा दुर्धर ही खरी, बहुत श्रमवी परघरीं । पावे आपणाची लाज धरी, दुःख किती वर्णूं तरी ॥ वाटे भवाब्धि दुस्तर खोल कीं रे ॥१॥
तुजला विनवितों हीन दीन खरा, भवभयतारक निवारा । पतितपावन एक ब्रीद धरा, हरि मज दीनातें उद्धरा ॥ पायीं लोटूनि उडविसी किमर्थ कीं रे ॥२॥
माधव आत्मा जरि तुझाच असें तरि मज पामरास कसें हें नसे । माझें स्वकर्म तीळ हें शुद्ध नसे, परि होईल जगांत हांसें ॥ गर्जे तव कीर्तीचा डौल कीं रे ॥३॥