मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ८१ ते ९०

स्फुट पदें - पदे ८१ ते ९०

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग ८१ वा
तोचि जाणा वेदांती । ज्यासि बाणलीहे शांती ॥१॥
ज्याची गेली भवभ्रांती । स्वयें घेतसे विश्रांती ॥२॥
ज्याचे गेले कामक्रोध । तोचि जाणा पूर्णबोध ॥३॥
त्याचा करा तुम्ही शोध । टाकुनि द्वैताचा विरोध ॥४॥
तो जाणा निःसंदेह । ज्याचें चिदानंद गेह ॥५॥
ज्यचें आत्मरूप ध्येय । देहीं असोनि वेदेह ॥६॥
ज्याचें गेलें मीतूंपण । तोचि जाणाचा निर्गुण ॥७॥
त्यासि ब्रह्म परिपूर्ण । मध्वनाथाची हे खूण ॥८॥

पद ८२ वें
परिसा परिस कथा सावधान । जेणें होय तुमचे समाधान ॥ चित्तीं न धरावें दाराधन । हेंचि गोविंदाचें आराधन ॥१॥
हातेंकरुनि टाळी वाजवावी । नामघोषें कथा माजवावी ॥ वृत्ति लौकिकाची लाजवावी । कीर्ति लोकत्रयीं गाजवावी ॥२॥
भक्तिज्ञान वैराग्य विवळावें । निजहृदयांत निवळावें ॥ मध्वनाथालागीं आळवावें । भावबळें देवासि चाळवावें ॥३॥

अभंग ८३ वा
मुक्त मुक्तफळ दोष न ठेवावा । तैसा तो जाणावा योगिराज ॥१॥
सर्वीं सर्वगत गगनवत आहे । अलिप्त तो पाहे पवना ऐसा ॥२॥
वाहातां गंगाजळा कोण दोष ठेवी । तैसा तो गोसावी जीवन्मुक्त ॥३॥
ज्ञानगंगा शोभे जयाचिये माथां । तया विश्वनाथा भजा आतां ॥४॥
मध्वनाथ त्याचें चरणातीर्थ वंदी । तेणें निजानंदें मग्न जाला ॥५॥

अभंग ८४ वा
लवणमुक्ताफळ जीवनाचा विचार । मिलणीचा प्रकार लवणापाशीं ॥१॥
मुक्ताभिमान स्वरुपीं न मुरे । उरी फुटोन झुरे गुणवंत ॥२॥
येणें न्याय द्वैतवादियां न मिळे । अद्वैती तों निवले समाधानें ॥३॥
मध्वनाथीं जीवन्मुक्ति स्थिति बाणे । अनुभवी जाणे विरळा कोण्ही ॥४॥

अभंग ८५ वा
निर्गुण तो तूळ सर्वाठायीं शुद्ध । सगुण जाला अद्ध पटाकारें ॥१॥
ऐसें वेद वर्णी वस्तु गुणातीत । हें नाहीं विदित तार्किकांसी ॥२॥
स्वरूपासी गुण कल्पितां रौरव । निर्गुणीं गौरव महंतासी ॥३॥
सुषुप्तिसमयीं जीव ही निर्गुण । हेही सांगे खूण मध्वनाथ ॥४॥

अभंग ८६ वा
देव व्यापक सर्वाठायीं । तो काय तुझ्या हृदयीं नाहीं ॥१॥
त्याची काय करिसी खंती । सिद्ध स्वरुप आपुलें चिंती ॥२॥
जिंकी मन सावधान । भंगूं नेदी समाधान ॥३॥
भोग प्रारब्धाचा भोगी । शिकवी मध्वनाथ योगी ॥४॥

अभंग ८७ वा
करुं नको तळमळ । चित्त राखावें निर्मळ ॥१॥
होई धर्मपरायण । चिंती लक्ष्मीनारायण ॥२॥
ऐसें भारत - भागवत । पद शोधावें शाश्वत ॥३॥
जोडुनिया दोन्ही हात । नीति सांगे मध्वनाथ ॥४॥

अभंग ८८ वा
हिरेमाणिकाच्या खाणी । मोला चढवितें पाणी ॥१॥
ऐसी जयाची करणी । भाव धरा त्याचे चरणी ॥२॥
केलें सोनेरु पैंजणें । ज्याचे मिरविती लेणें ॥३॥
चंद्र सूर्य क्षणक्षणां । करिती मेरूसि प्रदक्षिणा ॥४॥
मेघ वर्षती शुंडादंड । धान्यें पिकती उदंड ॥५॥
ज्याचे आज्ञेंत वर्ते काळ । ज्याचें अतर्क्य मायाजाळ ॥६॥
म्हणवी त्रैलोक्याचा स्वामी । मध्वनाथाचा अंतर्यामी ॥७॥

अभंग ८९ वा
उदरामध्यें वैश्वानर । आंत जाळीना तिळभर ॥१॥
ऐसा कळासूत्रधारी । खेळ खेळतोहे भारी ॥२॥
डोळ्याआंतील बाहुली । ध्रुवमंडळा न्याहाळी ॥३॥
मन हिंडे त्रिभुवन । ज्यानें पांगुळ केला पवन ॥४॥
जीव जातो स्वर्गा नरका । ऐसें दाखवितो मूर्खीं ॥५॥
खेळ खेळुनि अकर्ता । म्हणवी मध्वनाथ पुरता ॥६॥

अभंग ९० वा
शुक नळिके बद्ध जैसा । मुक्त मोकळा हा तैसा ॥१॥
कैसा विसरला आपणां । नेणे निर्गुणींच्या खुणा ॥२॥
जवळी असतां कंठमणि । गेला धाकें म्हणोनि ॥३॥
गडी बुडाला दाहावा । तो म्या कोठें जी पाहावा ॥४॥
मध्वनाथ म्हणे मंद । केला अविद्येनें अंध ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP