मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १५१ ते १६०

स्फुट पदें - पदे १५१ ते १६०

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग १५१ वा
( वैजयंती )
नमन माझें तुम्हां स्वामी जगदीश्वरा । माझी अवधारावी विनती येक ॥१॥
तुम्हासि जिंकिलें भक्तिचिया गुणें । म्हणोनि न पडे उणें वैष्णवचिं ॥२॥
प्रगट होतां जळीं स्थळीं अथवा काष्ठीं । सत्य वचनासाठीं भक्ताचिया ॥३॥
तुम्ही आपल्याकडे आणुनि घेतां हारी । होतां आज्ञाधारी सेवकाचे ॥४॥
पुराणप्रसिद्धा गोष्टी कोण मानी । करितां वर्तमानीं अभिनव ॥५॥
ज्ञानेशाचा तुह्मी धरुनी अभिमान । आपणासमान केलें त्यासि ॥६॥
प्रतिष्ठानीं केलें अद्भुत कौतुक । देखून वैदिक शरण आले ॥७॥
नामदेवाहातीं उठविली गाय । विसोबाचे पाय पूजीयले ॥८॥
कीर्तन करितां फिरविलें देऊळ । श्रवणीं राऊळ सादर जाले ॥९॥
कूर्मदासावरि दया केली मोठी । सांवत्याच्या पोटीं लपालासि ॥१०॥
दामाजीचा कोण करी पुण्यलेखा । रसीद नेली देखा बेदरासी ॥११॥
रुक्मादेवीवरें घेतली रसीद । कथा हें प्रसिद्ध पंढरपुरीं ॥१२॥
सुळासि पल्लव फुटले कोमळ । रक्षिला प्रेमळ भानुदास ॥१३॥
येकनाथाचें तां फेडियलें ऋण । हरिला भवशीण जनार्दन ॥१४॥
ज्यासवाल्मीकांचें अवतार निर्मळ । कृष्णदास मद्गल मुक्तेश्वर ॥१५॥
जयासि प्रसन्न पूर्ण गजानन । धुंडीजनार्दन मुक्त केला ॥१६॥
आदिपुरुष विठा रेणुकानंदन । तयाचें बंधन तोडियेलें ॥१७॥
दासोपंतावरी पूर्ण केली दया । त्याच्या संप्रदाया चालविलें ॥१८॥
महामुद्गलभटा दावियलें रूप । अयोध्येचा भूप द्वारकेसी ॥१९॥
मेहतानरसिहाची हुंडी स्वीकारिली । जळीं मोट तारिली जसवंताची ॥२०॥
रामदासाचें त्या देखुनि वैराग्य । आपलें तें भाग्य दिल्हें त्यासि ॥२१॥
प्रचीत दाविली जनीं कबिराची । त्याच्या शरीराचीं फुलें केलीं ॥२२॥
रंगरावाच्या दीपमाळे डोलविलें । मुके बोलविले मालोबाचे ॥२३॥
बोराबाचें तप देखुनि उत्कट । जालासि तूं प्रगट त्याचे ठाईं ॥२४॥
विष्णु सर्वोत्तम ज्ञानी तो सुंदर । दास पुरंदर मिरविला ॥२५॥
कीर्तन करितां लळीत केलें गोड । पुरविलें कोड तुकोबाचें ॥२६॥
विषाचं अमृत करुनि तत्काळ । रक्षिली वेल्हाळ मिराबाई ॥२७॥
ऐसे उद्धरिले दास लक्ष कोटी । तुझी आवडी मोठी त्यांचे ठाईं ॥२८॥
माझेविषयीं तुज पडलें संकट । विषयीं लंपट म्हणोनिया ॥२९॥
हीन दीन तरी म्हणवी तुझा दास । न करी उदास पांडुरंगा ॥३०॥
पूर्वीं केलें त्यांसि घालूं नको पाणी । सत्वर येथें आणी भागीरथी ॥३१॥
नास्तीक लोकांचें कोण धरी तोंड । त्यावरि पडो धोडं आकाशाची ॥३२॥
भाविका लोकांचा वाढवी भावार्थ । दाखवी सामर्थ्य कळयुगीं ॥३३॥
मध्वनाथ म्हणे बौध्यरूप टाकी । माझी लज्जा राखी जनामध्यें ॥३४॥
संतनामांची या गुंफोनि वैजयंती । अर्पिली भगवंतीं मुनीश्वरें ॥३५॥

पद १५२ वें
( एकाखडी )
क क क क कळों देरे प्रपंच माईक ॥ क क क क कर्पूरगौर ध्याई तूं एक ॥१॥
ख ख ख ख खरें तुझें स्वरूप ओळख । ख ख ख ख खटपट सांदुनि सेवी चित्सूख ॥२॥
ग ग ग ग गलबल टाकुनि सन्मार्गी वाग । ग ग ग ग  गंभीरपणें गुरुचरणीं लाग ॥३॥
घ घ घ घ घननीळस्वरूपीं रीघ । घ घ घ घ घरघर सोडुनि बाहेरीं रीघ ॥४॥
ङ ङ ङ ङ ङकार हा संसारींचा घेऊनी सार । ङ ङ ङ ङ ङकार हा संसारीं झीज ॥५॥
च च च च चराचर समूळ दुःखाचें । च च च च चतुर्भुज स्वरूप सुखाचें ॥६॥
छ छ छ छ छळुनी कामा करी रे तुच्छ । छ छ छ छ छत्रचामरीं शोभसी स्वच्छ ॥७॥
ज ज ज ज जगदीशस्वरूप समज । ज ज ज ज जपतप करितां भेटेल सहज ॥८॥
झ झ झ झ झणिं बापा विषयीं रीझ । झ झ झ झ झडकारे निजस्वरूपा बूझ ॥९॥
ञ ञ ञ ञ ञावत गेलासी वाया । ञ ञ ञ ञ येउनि लागे सद्गुरुच्या पाया ॥१०॥
ट ट ट ट टकमक पाहासी अंतरीं शेवट । ट ट ट ट टळों देरे दशा वाईट ॥११॥
ठ ठ ठ ठ ठकले बापा उदंड कर्मठ । ठ ठ ठ ठ ठकूं नको बांधोनी मठ ॥१२॥
ड ड ड ड डसला तुज काळ प्रचंड । ड ड ड ड डळमळ करितां गडबड उदंड ॥१३॥
ढ ढ ढ ढ ढळूं नको ढकलीतां दृढ । ढ ढ ढ ढ सखया तुज सांगतों गूढ ॥१४॥
ण ण ण ण नको करूं कोणें वणवण । ण ण ण ण निर्गुण रूपीं कैंचा तूं कोण ॥१५॥
त त त त  तरसिल बापा होतां गुणवंत । त त त त तळमळ गेल्या होसील संत ॥१६॥
थ थ थ थ थकीत होउनि शोधी परमार्थ । थ थ थ थ थकुनी टाकी संसार व्यर्थ ॥१७॥
द द द द दर्शनमात्रें होतो स्वानंद । द द द द दयानिधी भला गोविंद ॥१८॥
ध ध ध ध धरूं नको स्वदेहसंबंध । ध ध ध धन्य होसी सांगतों बोध ॥१९॥
न न न न नम्र होतां होईल सन्मान । न न न न नको करूं बहु तनन ॥२०॥
प प प प अरदारेसी घेतोसी झोंप । प प प प परमेश्वर तुज करील कोप ॥२१॥
फ फ फ फ फटकळ हे सोडुनि दे लाफ । फ फ फ फ फजीतीचा वाजेल डफ ॥२२॥
ब ब ब ब बरवा बापा परमार्थी थांब । ब ब ब ब बळकट होउनि काळासी झोंब ॥२३॥
भ भ भ भ भजनाविरहित चित्ताचा क्षोभ । भ भ भ भ भगवंताचा धरी रे लोभ ॥२४॥
म म म म ममता ही न असतां उत्तम । म म म म मदनांतक सेवी परम ॥२५॥
य य य य यदुवीराचे वंदितां पाय । य य य य यम तुझें करील काय ॥२६॥
र र र र रघुनाथाला भजतां सत्वर । र र र र रतिपति तुझा किंकर ॥२७॥
ल ल ल ल लज्जाविरहित हरिरंगीं डोल । ल ल ल ल लवकर बापा हरिनाम बोल ॥२८॥
व व व व वचन माझें न मानी वाव । व व व व वरपंगाचा नको रे भाव ॥२९॥
श श श श शतकोटीचा करितों उपदेश । श श श श शरयूतीरींचा भजरे जगदीश ॥३०॥
ष ष ष ष षड्दर्शन बोधी निःशेष । ष ष ष ष षडरिपु जिंकील तोचि निर्दोष ॥३१॥
स स स स सद्गुरुचरणीं धरितां विश्वास । स स स स सत्यस्वरूपीं होसी समरस ॥३२॥
ह ह ह ह हळहळ करितां बहुत संदेह । ह ह ह ह हरिगुण गाउनि होई विदेह ॥३३॥
ळ ळ ळ ळ आळस सांडुनि होई निर्मळ । ळ ळ ळ ळ अळवट चिंती हृदयीं गोपाळ ॥३४॥
क्ष क्ष क्ष क्ष क्षणभरी मध्वनाथाला लक्ष । क्ष क्ष क्ष क्ष क्षरातीत होईल मोक्ष ॥३५॥

पद १५३ वें
गयाळा तूं अनुदिनीं भज भगवंत रे ॥ध्रु०॥
सेवी साधुसंत रे । जेणें दुःख अंतरे । ऐसें हरिरूप चिंत रे ॥१॥
मध्वनाथ म्हणे आतां । राहे तूं सचिंत रे ॥ देह नाशिवंत रे । याची काय खंत रे ॥२॥

पद १५४ वें
निजलिस काय गे हो जागी तमाखू खाय गे ॥ध्रु०॥
चंचींत नाहिं तर बटव्यांत पाहि गे । बटव्यांत नाहिं तर गाडग्यांत पाहि गे । गाडग्यांत नाहिं तर फडक्यांत पाहि गे ॥१॥
तमाखू आणून करतेस काय गे । माझ्या कोयींत चुनाच नाहिं गे । रात्रीं मजला झोपचि नाहिं गे ॥२॥
पहांटेस उठून शेतांत जाई गे । बाईसी पदरांत घेऊन येई गे । बाइसी मध्वनाथाला देई गे ॥३॥

पद १५५ वें
घ्या तुम्ही गुर्गुडी गुर्गुडी । प्रपंच धूर हा सोडी ॥ध्रु०॥
नारळ औट हाताचें । आंत जीवन सत्रावीचें ॥१॥
धैर्य तोच मेरू म्हणती । शांति चिलीम शोभे वरती ॥२॥
कामक्रोध तंबाखू । ह्याची जाळुन केली राखू ॥३॥
ज्ञान घालुनि खडा । गुर्गुडी बोलतसे भडभडा ॥४॥
अनुभव लावुन नळी । गुर्गुडी बोले वाणी मंजुळी ॥५॥
ह्या गुर्गुडीच्या छंदें । मध्वनाथ झाला धुंदें ॥६॥

पद १५६ वें
( जोहार )
जोहार मायबाप जोहार । माझें नांव बोध्या महार ॥ दारीं जोहार करितों हकिकत । नका करूं जी हरकत ॥ यांचें नांव देहपूर । हें परगण्या मशहूर ॥ वरी बुजूनी दारवटा । हमेश वाहती दशही वाटा ॥ तेथें भरतो बाजार । बरा नाहीं कारभार ॥ जहाराची घडामोड । नाहीं कवडीची जोड ॥ भांडवलासी घाला मोठा । येतो मुदलासीच तोटा ॥ ऐसें भूतझवीचें गांव । आहे महाजनासी ठाव ॥ येथील जिवबा पाटील भोळा । त्याच्या दिसत नाहीं डोळा ॥ बर्‍या वाईटाचा धणी । येथील मनाजी कुलकर्णी ॥ रोज घेऊन खातो करजा । त्यानें धुळीस मिळविल्या परजा ॥ नाहीं साहेबासी रुजू । मार खाईल तो उजू ॥ धण्याचा मर्दराज होतो । साहेबाचा रिजक खातो ॥ साहेबास हकीकत । सांगाया आलों येथ ॥ आली यमाजीबाजीची फौज । नका करूं जी मौज ॥ वरूनी उतरली शाई । पांढर्‍याची फिरली दाही ॥ जागा जागा सावधान । गांव राखा आबादान ॥ गांव बुडेल रे घडींत । जावें पळोन गढींत ॥ गढीमध्यें देवराय । त्याचे धरावे पाय ॥ तो सकलांचा म्हणवितो मायबाप । मागील गुन्हा करील माफ ॥ जबरदस्त आहे खावंद । त्यासी राखा रजाबंद ॥ नका करू तनाखोरी । बाहेर पडते हे चोरी ॥ मध्वनाथीं धरितां भाव । देईल तुम्हांसी सिरपाव ॥१॥

पद १५७ वें
न ढळे न चळे न जस्ळे न गळे न मळे न कळे कोणा मी ॥१॥
न चढे न पडे न जडे न झडे न दढे न रडे कोणा मी ॥२॥
न सुटे न तुटे न फुटे न उठे न दटे न हटे दोना मी ॥३॥
मुनिवर सुमती स्वपदीं रमती यतिपति विरमती ॐ नामीं ॥४॥
रतिपति खपती पशुपति जपती फणिपति सुपती तो नामा ॥५॥

पद १५८ वें
वारकरी पंढरीचे । मुद्रांकित श्रीहरीचे ॥१॥
तुम्ही हरिदास गायक । तुमचा पंढरीनायक ॥२॥
हरीनाम तुमच्या मुखीं । श्रवणें जग करितां सुखी ॥३॥
नित्य राहातां देवापाशीं । एवढी विनंति सांगा त्यासी ॥४॥
मध्वनाथ तुझें दीन । त्यासी न करी पराधीन ॥५॥

पद १५९ वें
व्यर्थ नरदेहा आलों । भार भूमीवर झालों ॥१॥
देहलंड पितरलंड । तो हा आहे माझा पिंड ॥२॥
केली कुटुंबाची सेवा । मनोभावें श्रीकेशवा ॥३॥
उडिदांत किती काळे । काळ निवडिसी निराळे ॥४॥
मध्वनाथा मायबापा । गणित नाहीं माझ्या पापा ॥५॥

पद १६० वें
नमो कमठरूपधरा हरि मंदरधारका । सच्चित्सुखघन पूर्णा असुरजनविदारका ॥ध्रु०॥
प्रथम नंदिकेशजनित रत्नें हीं सारीं । मग मुनी दुर्वासशाप अब्धी अधिकारी ॥ देव असुर एक होत मंथन बहु भारी । वासुकी हे रज्जुपरी मंदररवीकारिका ॥१॥
दधी समुद्र मंथन हें करितचि ते काळीं । मंदर हा चालिलाची भारें पाताळीं ॥ देव सर्व चकित होत स्तविती वनमाळी । रक्ष रक्ष तारि आतां कुमति सर्वहारिका ॥२॥
कमठ हरी होऊनियां मंथन हें होत । देव सर्व सुखी आणि रत्न ओतप्रोत ॥ जयजय हरि परात्पर कमठरूप परंज्योत । मध्वनाथ ध्यात तुला भवभयनिवारका ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP