मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद ३१ वें

परिशिष्ट पदे - पद ३१ वें

मध्वमुनीश्वरांची कविता


हिमालयाच्या घरिंच्या कारी । हांसती गौरायीला ॥१॥
वरबापासी ठाव नाहीं वरमायीचें शून्य । नणदा नाहींत जावा नाहींत केवढें इचें पुण्य ॥२॥
तामसगरळा ज्याला कंठामध्यें भरलें पीत । आतां रुखवत देखोनि याचें सुखावलें चित्त ॥३॥
मूळ जावोनि आणिल मैना विचित्र ज्याची सेना । मिरवत पशुपति येईल मंडपांत उणें नाहीं शेणा ॥४॥
प्रळयकाळीं त्रिभुवन ज्याचें म्हणवीतें खाद्यें । ऋषिपत्न्या सळितो याला सासरा घालील पाद्यें ॥५॥
मधुपर्कासी गिळूणि येईल ढेंकर विश्वंभरा । दिव्यांबरें गौरवील हिमगिरी चिदंबरा ॥६॥
लग्नघटिका घालुनि म्हणतील देवा सावधान । तेव्हां अकुळी करील कोण्या कुळदेवाचें ध्यान ॥७॥
अंतरपाट निघोन जाई तैंच निष्ठाबाई । शिवस्वरूपीं शक्ति मिळाली ॐ प्रतिष्ठा पाही ॥८॥
सुतउनी सगुण ब्रह्मकंकण बांधिती दोघाजणां । ज्ञानानलीं लाज्याहोमीं गृहस्थ यासी म्हणा ॥९॥
पंचामृतें सिंपील जेव्हां गौरीहर आंबा । तेव्हां भुक्तीमुक्तीसहित अंगणीं नाचेल रंभा ॥१०॥
खेचरी मुद्रा लावूनि बैसे अघोर ऐसा कसा । चंद्रम्याचा अर्ध टिकला भाळीं म्हैसा जैसा ॥११॥
वळवळ करिती व्याळ अंगीं कंठीं हालाहल । मुळींच सळखळ सवतीपुढें इचें न चले बळ ॥१२॥
व्योमकेशा ( न्हाणितील जेव्हां करवोल्या ) । कढत पाणी घालतील जेव्हां करवोल्या । तेव्हां शंकर म्हणेल गंगे अवघ्या करी वोल्या ॥१३॥
अंबिकेची हळदी कैसी लाविल ब्रम्हगिरी । रुसून जाईला रागीट तेव्हां समजेल कन्या परि ॥१४॥
अनंतकोटी ब्रह्मांडासी क्षणामात्रें गिळी । तोच बळकट आमुचा भाई याचा कान पिळी ॥१५॥
जटामुगुटीं गंगा तेथें मुतल जेव्हां बोला । येईल कोपा तेव्हां ईची करील कोण जोपा ॥१६॥
द्याकाराचा प्रसंग पडतां वांटिल कनकबीज । करंटे ते सभाग्य होतील धोतरबडवे द्विज ॥१७॥
कुसुमशराला जाळुनि बसला देईल कोठुनि फळ । नारद सांगूं गेला याला आहे तोंडबळ ॥१८॥
बिजवर नवरा गौराईसी हा कांहीं करिल चेष्टा । तेव्हां याची खोडी सांगूं लिंगाईतश्रेष्ठा ॥१९॥
ते मग याला बांधतील कंठीं बाहु दंडीं । शिवशरणार्थ स्मरणमात्रें जन्ममरण खंडी ॥२०॥
मध्वमुनीश्वर करील देवामध्यें तारतम्य । तृणप्राय लेखील यास वैष्णवमार्गी रम्य ॥२१॥
ढवळ्या बैलावरता बसला शंकर उघडा जोगी । मसणवटीची नरवटी हातीं भिक्षा वैभव भोगी ॥२२॥
घणघणघंटा नीळकंठापुढें वाजती शंख । वाजव्याला पैका न मिळे तो तों बेटा कंक ॥२३॥
रुंडमाळा रुळती कंठीं व्याघ्रांबर वोढी । सुगंध केतकी सांडुनि धरि तो धतुराची गोडी ॥२४॥
नागेशाचा वर्‍हाडी तो भंड जितुका तितुका । नाथपंठी कंथाधारी खांद्यावरता कुतका ॥२५॥
भूतप्रेत पिशाच्याच्या वेताळाच्या फौजा । शाखिनी डाकिनी चौसष्टीं जोगिणी करिती मनींच्या मौजा ॥२६॥
नगरामध्यें नवरा मिरवे छळना ज्याला त्याला । वर्‍हाडणीचीं पोरें भीति म्हणती बागुल आला ॥२७॥
मध्वमुनीश्वरस्वामी दयानिधि सकळा रक्षा करी । विभूत लावुनि भूतेशाचा जापक पंचाक्षरी ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP