मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ६१ ते ७०

श्रीकृष्णाचीं पदें - पदे ६१ ते ७०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ६१ वें
पत्रिका यदुबरें लिहिली गे । मैत्रिकी स्मरुनि ते पहिली गे ॥ वंदुनी निजकरें शिरसा गे । चित्त घालुनि तुम्ही परिसा गे ॥१॥
आत्मा असे व्यापक सर्व ठायीं । हें जाणुनी कां पडतां अपायीं ॥ तुम्हांस आम्हांस वियोग नाहीं । असोनि या काळनदीप्रवाहीं ॥२॥
या गोकुळा टाकुनि कृष्ण गेला । अक्रूरजीनें मथुरेसि नेला ॥होऊनियां निर्दय फार ठेला । कां आमुचा नाश बहूत केला ॥३॥
इत्यादि गोष्टी सकळा निरर्था । आरोपितां नेणुनियां समर्था ॥ हें तत्व त्या सद्गुरुलागिं प्रार्था । निरोपणीं वर्णिल सर्व वार्ता ॥४॥
त्यजूना अहंता नमावें महंता । भजावा महाराज तो दैत्यहंता ॥ तुम्हां काय चिंता । असा पूर्ण सौभाग्यवंता जिवंता ॥५॥
धरा दिव्य धैर्या वरा योगचर्या । करा अंतरीं श्रीहरीची सपर्या ॥ अमर्याद औदार्य गांभीर्य शौर्या । स्मरोनी भजा त्या चिदानंदसूर्या ॥६॥

पद ६२ वें
कानडा दगाबाज ॥ध्रु०॥
रणसोडीनें मोहित केली । सुरत अमदावाद ॥१॥
मथुरेमध्यें पावन केली । कुब्जेची ते बाज ॥२॥
रतिसुखसागरिं बुडतां धरितो । चंद्रावळिचा माज ॥३॥
मध्वमुनीश्वरवरद विनोदी । ठकडा यादवराज ॥४॥

भूपाळी ६३ वीं
उठुनी प्रातःकाळीं म्हणती गोपिका बाळा ॥ आमचा गळा कापुनि जावें होतें गोपाळा ॥ध्रु०॥
तुझिया विरहानळेंकरूनि होतोहे उबाळा ॥ वसंत गेला मथुरे इकडे उद्धव आला उन्हाळा ॥१॥
जळो जळो अमुचें जिणें धिगि धिगि लाजिरवाणें ॥ सेवट गोड न जाला सखया गेलें जीवें प्राणें रे ॥२॥
पापी अक्रुर आला अमुचा जन्मांतरिंचा वैरी रे ॥ भुरळें घालुनि घेउनि गेला परमात्मा तो श्रीहरि रे ॥३॥
भला अक्रूरा त्वां अपुला बोल स्थापिला ॥ आडामध्यें धालुनि बापा कैसा दोर कापिला ॥४॥
अंधकूपामधुनि काढी देवा दीनोद्धारणा रे ॥ मध्वनाथा शरणागता चिंतूं नको मरणा रे ॥५॥

पद ६४ वें
हरिमागें मन लागलें माझें ॥ध्रु०॥
ज्या दिवशीं हरिदर्शन जालें । तैहुनि मानसीं भरलें हासें ॥१॥
कुंजवनीं येक्या घतिकेमध्यें । शतशत फेरे घातले दासें ॥२॥
मुगुट मनोहर कुंडलमंडित । श्रीवत्सांकित हृदयीं विलासे ॥३॥
मध्वमुनीश्वरस्वामीचें ऐसें । वर्णियलें यश वेदव्यासें ॥४॥

पद ६५ वें
सये काय करूं वो आवरी हा गोपाळ ॥ध्रु०॥
दुडुदुडु धांवत चारीत गायी । वळखे आपला बाळ ॥१॥
दहीं दूध चोरुनि चारी मुलांसी । सुनेवरि घाली आळ ॥२॥
गोकुळ सांडुनि जावें आतां । श्रीहरि आमुचा काळ ॥३॥
मध्वमुनीश्वरस्वामी म्हणतो । त्रैलोक्याचा पाळ ॥४॥

पद ६६ वें
सये बाई वो आला नाहीं वो । मोठा कपटी वौंसीवाला वो ॥ध्रु०॥
वैरीण रजनी जातां जाईना । विरहें माझा दाहा जाला वो ॥१॥
सुमनसेजेवरी नीज येईना । विंजणवारा झणीं घाला वो ॥२॥
मध्वनाथें मज मोहित केलें । मारुनिया स्मरहाला वो ॥३॥

पद ६७ वें
अझुनि कां अझुनि कां साजणी कृष्ण न ये वो ॥ध्रु०॥
नेणो कोण्या शाहाणीनें चाळविला ॥ जिवलग शोधोनिया आणि सये वो ॥१॥
मध्वनाथस्वामीची वो जाली ॥ बहु अवसर अंतरीं ध्यान लय वो ॥२॥

पद ६८ वें
कधीं भेटेल मजला देव हरी ॥ध्रु०॥
माझ्या अंगणीं हो का बाई । कोकिळा बोले मधुरस्वरीं ॥१॥
हातींचा माझ्या ग्रासचि पडतो । तळमळ तलमळ जीव करी ॥२॥
डावा माझा डोळाचि लवतो । बाहु माझे स्फुरण करी ॥३॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । शकुन सांगा कोणि तरी ॥४॥

पद ६९ वें
हरिची मला लागली गोडी ॥ध्रु०॥
सुंदर रूप पाहुनी डोळां जालें मी वेडी ॥१॥
गृहधनआशा सर्वहि त्यजुनी कृष्णपदीं जोडी ॥२॥
मध्वमुनीश्वर स्वामीदयाघन चरणसरोज न सोडी ॥३॥

पद ७० वें
सावळा गोविंद झडकरी आणा वो मंदिरा ॥ध्रु०॥
वाजवी मंजुळ वेणु वृंदावनीं ॥ चारी धेनु चरणकमळीं ॥ ज्याच्या तल्लीन इंदिरा ॥१॥
मध्वनाथस्वामीवीण ॥ शरीर हें झालें क्षीण ॥ विरहें व्याकुळ होते राधिका सुंदरा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP