आरती नरहरीची
मध्वमुनीश्वरांची कविता
रत्नजडित सिंहासनीं शोभे नरहरी । वामभागीं जगन्माता राजस सुंदरी ॥ क्षीरसागरांत पूजुनि षोडशउपचारीं । सनकादिक योगेश्वरीं स्तविला सुरवरीं ॥१॥
जयदेव जयदेव जयजय नरसिंहा । आलों शरण माझा भवरिपु निरसी हा ॥ध्रु०॥
हिमकरवर्ण फणीवर मस्तकीं छत्राकृति शोभे । ब्रह्मादिकदेवसेवक भोंवते उभे ॥ अभिनव रूप देखुनि त्यांचें मानस लोभे । स्वभक्तांसि गांजी त्यावरि तात्काळा क्षोभे ॥जयदेव जयदेव०॥२॥
सभास्तंभामधुनि कैसा सत्वर निघाला । कैलासी ध्यानस्थ महादेव तो भ्याला ॥ हिरण्यकश्यपालागीं हृदयीं कल्पांत झाला म्हणे माझा विनाशकाळ विपरीत आला ॥जयदेव जयदेव०॥३॥
शंखचक्रपिनाक खङ्ग घेऊनि आयुधें । स्वभक्तांचे रक्षणीं बहुत सावध ॥ सत्यज्ञानसुखस्वरूप ब्रह्म तें शुद्ध । ओवालूं आरती पंचप्राण स्वतःसिद्ध ॥जयदेव जयदेव०॥४॥
तिखटानखें चिरूनि दुष्टा रक्षी प्रल्हादा । ज्याचें दैवत असेल त्यासि अढळ संपदा ॥ मध्वनाथ पूजी भावें प्रल्हादवरदा । अनाथबंधु पतितपावन सांभाळी बिरुदा ॥जयदेव जयदेव०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP