मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते ६

नृसिंहाची पदें - पदे १ ते ६

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ लें
जय जय जय जय नरसिंहा । संशय माझा निरसी हा ॥ करुणाम्रुतरस वोरसी हा ।  मग्न करी जीव समरसीं हा ॥१॥
सखया लक्ष्मीरमणा रे । किती तर्‍ही करूं मी भ्रमणा रे ॥ करितों नामस्मरणारे । चुकवी जन्ममरणा रे ॥२॥
हिरण्यकशिपु उदरा तूं । दारिसी पूर्ण उदारा तूं ॥ मध्वमुनीश्वरवरदा तूं । राखि आपुल्या बिरुदा तूं ॥३॥

पद २ रें
श्रीसामराजा तूं स्वामी माझा ॥ध्रु०॥
श्रीनीलकंठा जय व्योमकेशा । स्तंभीं प्रगट होसी नरसिंहवेशा ॥१॥
सत्यज्ञानस्वरूपा लक्ष्मीनिवासा । क्षीरसागरामध्यें स्थळचिद्विलासा ॥२॥
प्रल्हादवरदा भवबंधनाशा । मध्वनाथ विनवी करी पूर्ण आशा ॥३॥

पद ३ रें
वेगीं शामराज दीनबंधु । पावला कैवल्यसिंधु ॥ध्रु०॥
कडकड स्तंभीं प्रगट होतां । त्रैलोक्यीं आक्रंद ॥१॥
हिरण्यकश्यप वधुनी त्याचा । छेदिला भवबंध ॥२॥
प्रसन्न होउनी प्रल्हादाला । दिधला परमानंद ॥३॥
मध्वमुनीश्वर महिमा त्याचा । गातोहे स्वच्छंद ॥४॥

पद ४ थें
पावलारे महाराज सिंहासन । उग्ररूप देखुनी दचकला महेशान ॥ध्रु०॥
कडकडाटें प्रगटला । दुष्ट दैत्य निवटिला । भक्तवत्सल भेटला । मोहछाव वाटला ॥१॥
नखीं चंद्रकोटी तेज । पीतपटीं चमके वीज । चक्रपाणी चतुर्भुज । रक्षी प्रल्हादाचें गुज ॥२॥
देव करिती पुष्पवृष्टि । ब्रह्मानंदें कोंदे सृष्टि । नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ॥३॥
ज्याचें नांव लक्ष्मीकांत । निजरूप धरी शांत । मध्वनाथा विश्रांत । दिल्ही निरसली भ्रांत ॥४॥

पद ५ वें  
जय जय नरहरि राया रे । आरत तुझिया पायां रे ॥ध्रु०॥
नांदसी श्रीमणिपर्वतीं । जेथें मुनिजन मिरविती ॥ पद्मतीर्थाचे कांठीं । प्रगटसी श्रीरुचिरासाठीं ॥१॥
मध्यगोदेच्या बेटीं । येती सनकादिक भेटीं ॥ काश्यपगोत्रींची सेवा । सदैव घेसी तूं देवा ॥२॥
प्रसन्न विश्वेश्वर जाला । घेउनि गदाधरा आला ॥ श्रीशिवानंदासंगमीं । पूजुन झालों असंग मी ॥३॥
सिद्धेश्वर नागेशा । अवघा आपण विश्वेशा ॥ विश्वेशावरि फणिवर । देखिला म्यां धणीवर ॥४॥
एकादशीच्या दिवशीं । दर्शन जालें सर्वांसी ॥ दोन प्रहरपर्यंत । बसला होता अनंत ॥५॥
कीर्तन ऐकुनिया गेला पूर्ण अनुग्रह केला ॥ छत्र देवावरि धरितों । प्रसाद देऊनी उद्धरितों ॥६॥
मध्वनार्थीं साम्राज्य । करील विश्वेश्वर आजि ॥७॥

पद ६ वें
नरहरि थांब पाव रे । राजीवनयना राघवा रामा ॥ध्रु०॥
तुजविण मला आतां कोणचि तारी । तारक हरि तूं आम्हां ॥१॥
मी बुडतों भवसागरडोहीं । नेउनि पार आम्हां ॥२॥
मध्वमुनीश्वर प्रार्थितसे तुज । आठवुनियां तुझ्या नामा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP