स्फुट पदें - पदे १७१ ते १८०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १७१ वें
चाल निरंजनीं । तूंच जनीं वनीं ॥ध्रु०॥
पांच पोरें तीन ढोरें शेजार्याचे घरीं । घरचा पति सोडियेला फट संसारी ॥१॥
आठ पाटील नवनारी सांगती तें करी । दीर भावा नंदा जावा राखिती घरोपरी ॥२॥
टाकमटीका भाव निका सांडी याचे चाळे । आत्माराम गडी केला ठकविलें तुज बाळे ॥३॥
लटका जन्म लटकें मरण लटकी आटाआटी । सद्गुरुकृपें माधवदासा पूर्ण जाहल्या भेटी ॥४॥
पद १७२ वें
मी वेडी बाई माणुसपण उरलें नाहीं बोलुं नका । कैसें गेलें माणूसपण फुंकिले गुरूनें कान बोलूं नका ॥ध्रु०॥
तनुमन म्यां दिधलें दान, हरपलें माझें देहभान ॥ उजळले माझे नयन अघटित गुरुचें विंदान ॥ द्वैताचें उडालें भान एकतत्व केलें स्वामीनें ॥चाल॥ बोध वाटी, लावूनी ओंठीं, धरी कासोटी, उलट्या देठीं । अद्वैत केलें गुरुनें ॥ दाविली हिर्याची खाण वरी प्रकाश केला गहन ॥ संसार आतां बाई, बोलणें तंव उरलें नाहीं ॥१॥
बोलणें तंव अवघें खोटें कां करितां व्यर्थची वट । त्रिकुंटावरि गोल्हाट पाहिलें मीं औटपीठ । दोन्ही वाटा जाती नीट एक वाट पाहे गुडगट ॥चाल॥ समजा बोली, गुरुची किल्ली, हाता आली वृत्ति फिरली ॥ काम भ्रमला माणूस पण देहींच देव असोन ॥ कां व्यर्थ पूजा पाषाण । ज्ञात्यासी म्हणती वेडे कां जाणून होता मूढ ॥२॥
सद्गुरुनें धरिलें करीं नेलें हो निजमंदिरीं । चौदा भुवनांचे हो हरी प्रकाश आंतबाहेरी । नाहीं उरला आणिक यावरी समसमान सर्वांतरीं । जन अवघें निराकारी ॥चाल॥ झाला बोध, सरला भेद, नाचे छंद, पूर्णानंद प्रेम दुणावला, आठव नाहीं देहाला ॥ देह सुखेंचि सुखावला सुखांत लोळे हो माय ॥ बोलणें तंव उरलें काय ॥३॥
गुण गावयासी वेगळा नाहें उरला देव निराळा ॥ योगीयांची अगाध लीळा ग्रासिल्या बारासोळा ॥ पांच तत्वांचा एक मेळा वलयांकित अवघा गोळा । समसमान ज्याच्या डोळा तो पूर्णब्रह्म पुतळा ॥चाल॥ हेंचि साधन, पूर्ण अंजन, अद्वय लेणें, सद्गुरुखुणें, हें पूर्व पुण्य उदेलें । बोलविलें अबोलें, प्रेमाचे ढेकर ॥ हा नयनीं कळला अर्थ नाहीं उरला मध्वनाथ ॥४॥
पद १७३ वें
गुरूसोहळा पाहुन डोळां मीपण गेलें विरून । गुरूनें मीपण नेलें हिरून ॥ध्रु०॥
कानीं फुंकिलें नयनीं दाविलें तें सांगतां न ये । बळकट धरिले गुरुचे पाये । मुक्यानें साखर गिळिली त्यासी मुखीं सांगतां नये । अवघड घाट चढोनी वाट नगर दाविलें माये । तेथें नदी येक झुळझुळ वाहे । घडघड कडकड घनन वाद्य सुस्व्हर कोकिळा गाये । नानापरीचे सुगंध राये ॥चाल॥ याहून वरुतें स्वरूप निरुतें गुरुचे वचनावरून ॥१॥
मायिक कैसें ममता पिसें तत्वाचा आकार । कोठुनी रचियेलें शरीर । पुढें परिसा आत्मठसा उगाच शून्याकार । आत्मा निर्गुण सर्वेश्वर । जैसें मंदीर पोकळ सार आंत करी संसार । तैसा आत्मा निर्गुण बार । पोकळी वारा धरून उबारा नाद उठती गंभीर, तयाचें नांव शब्दाकार । गुरुची किल्ली हाती आली ज्ञानी घेती भरून ॥२॥
उघड हातोटी पाहूं दृष्टीं मागील खोटें केलें । अवचित निजमंदिरा नेलें । इंद्रियबंधन समाधिसाधन वरी काळाचे घाले सिद्धते उड्यामाजी गेले । दाऊन कौतुक मुद्रापंचक एकदेशीं ब्रह्म जालें । तरी का बहु देसीं बुडालें । साधक शिणले वादक भुलले वचनें गुरुचे आले । वेद तेणें मौनावले । साही शास्त्रें अठरा पुराणें अवघें मायेचें करून ॥३॥
गुरुशरिरांत सद्गुरुनाथें अघटित करणी केली । पांढरीवर काळी दाविली । रक्तपित्त वरुतें श्वेत श्याम कला फांकली । पिंवळ्या रंगें तेजाळली । ब्रह्म रक्त विष्णु श्वेत शाम शिव डौकली । तीहीं देवांची मांडणी केली । याहून वरुती माया निरुती सुनीळ रूपें देखिली । तुर्या नाम विराजली । हीं कीं माया निर्गुण सखया सद्गुरु देती धरून ॥४॥
सुनीळ वरुतें सुंदर श्वेत मध्यें दशवें । द्वार परवस्तूचें तें मंदीर । विश्वव्याप्त म्हणती गुप्त प्रगट दिसे विचारं । अज्ञानासी नकळे बार । तेणें दिप्ती चिंताकृति नवरंग प्रकार रंगा अग्रीं सर्वेश्वर । धरोनि स्वार्थ मध्वनाथ निघाला गुरुनें निरसिलें तिमीर । प्रकाश जाला दिन उदेला अंबर दिधलें भरून ॥५॥
पद १७४ वें
अद्भुत ऐका नवल तमाशा गुरु दाखवी डोळा । लवणाची मासोळी जीवनीं घेती उल्हाळा ॥ध्रु०॥
आज एक मीं नवल देखिलें उफराटें झाड । खाली शेंडा वरती बुडका बावन खोड । राउतावरी जीन ठाकुनी वर बसलें घोड । सरदाराची छाया ग बाई छत्रीवर पड । गुरुकृपेविण अर्थ कळेना मोठा अवघड । बोध गुरूचा सत्य गड्यांनो नव्हे बडबड । होईल श्रीगुरुकृपा जेव्हां कळेल कळा ॥१॥
आकाशीं एक विहीर मोट तिची चाले पाताळीं । तिपायांनीं पाणी चाललें बहु पिकल्या केळी । हातापायावीण पाणी खेळवि वर वाफे चाली । सवालक्ष फळ गणना तिची होत नित्य काळीं । माळी राखतो मळा बसुनी गमनापोकळी । गुरुपुत्र हा खूण जाणे येरां रांडोळी । असोनि डोळा व्यर्थ झांपड कां पडली बुबळीं । दया तयाची पूर्ण जयावर तो जाणे सकळी । गुरुचरणामृत सेवुनी जो कीं पूर्णत्वें आला ॥२॥
वृक्षामाथां पक्षी वेंगती नाहींत हातपाय । बिनचोचीनें चारा चरे नवल नोहे काय । बिनतोंडाचा भासा देखिला गगनीं तो जाय । गगन गर्जना आणिक येक मीं नवल देखिलें दर्पणांत मुख पाहे । दर्पण उरलें मुख हरपलें उरलें तें काय । उरलें पुरलें पूस गुरूला जोडुनि गुरुकमळा ॥३॥
आणिक एक मीं नवल देखिलें कांतिणीचा तंतु । त्याचें जाळें करुनि गोंविलें लोक तिन्ही आंतु । तेथुनि निघाया उपाय थकले वेदांतु । एक माउली येउनि सांगे माझ्या श्रवणांतु । एकावरती एक आदळती पाहे त्रिपुटांतु । संत सज्जन अनुभव घेती बैसोनि एकांतु । त्याचे चरणीं मध्वनाथ हा जाला निवांतु । चरणामृतसर प्राशन करुनि पावे निजवस्तु । गुरूकृपेचा दीप लागला झाला बंबाळा ॥४॥
पद १७५ वें
बहु जन्मार्चित अनंत युगाचें गुरुदर्शन जाहालें । कृपा करुनी गुरुराजदयाळें आत्मपदासी नेलें ॥ध्रु०॥
आदि तळातळ वितळ रसातळ सुतळ कळा दावी । तळ पाताळे सप्तकीरे हे ऐक राया बरवी । आघारचक्रापासुनि पदवी भिन्न ऐकावी । सत्य गुरुचें वचन सख्या तुज दिव्य दृष्टि व्हावी ॥चा०॥ आधारचक्री वक्रतुंड पाहा चतुर्थ मातृका । सहाशतें जप होतो ऐका गूढ हा पवनमार्ग निका । गुरुची दया भला गुरुचि दया भाग्य फळलें । अघटित साधन साध्य सख्या तुज सहजगती घडलें ॥१॥
स्वाधिष्ठानीं सहा मातृका ब्रह्मा दैवत । सहा सहस्र जप ही संख्या पूर्णपणें होत । मनपुरामध्यें दाहा गामिनी दशदळ नेमस्त । विष्णुमाया दैवत तेथें जाण किंरे सत्य ॥चाल॥ अजपाजप हा सहा सहस्र मनपुरामाझारीं । द्वादशदळ अनुहातचक्री रुद्र दैवत हे निर्धारी । गुरुची लीला भला गुरुची लीला भाग्य फळलें ॥२॥
साहसहस्र जप अनुहातीचा ऐक राया निगुती । पुढें विशुद्ध चक्री मात्रा षोडश विराजती । एकसहस्र जप ही संख्या मुनिवर बोलती । अग्नि ऋषी दैवत त्या चक्रीचें हे खूण वेदांतीं ॥चाल। द्विदळ चक्र दोन मातृका लक्षाचा झाडा । कोहं सोहं बावन निवडा औट मात्रेचा पवाडा । ऐक राया भला ऐक राया स्थूळ सरले ॥३॥
रक्त पित्त तैं अकार मात्रा करी शिष्या श्रवण । श्वेत कर्पूर उकार विष्णु करी प्रतिपाळण । मकार मात्रा महेश अग्नि रति शामवर्ण । अर्धमातृका रंग निळा हा मसुरेप्रमाण ॥चाल॥ पंचतत्त्व त्रिगुणात्मक जाण याचा घे झाडा करून । पांच पांचकी पंचवीस गुण, सदर हे जाहाले सगुण । उभा रे उभा भला उभारे उभा गगन भरलें ॥४॥
खाण नवाची दहावें शोकीं अकरावें ग्रासीं । ब्रह्मपथीं हें भरोनि उरलें पंचभुतीकांसी । योगी समाधिस्थ सदोदित हे पाहोनि सुखरासी । समान समता ब्रह्मभावना अखंड ज्यापासीं ॥चाल॥ ब्रह्मभूत जे जाहाले त्यावरी गुरुकृपा पूर्ण । मनोमय गेलें विरोन मध्वनाथीं गुरुखूण । सहजासहज अनुभवें कीं मन माझें मुरलें । बहु जन्मार्चित अनंत युगाचें गुरुदर्शन झालें ॥५॥
पद १७६ वें
पहा कसें रूप मनोहर दाखवि डोळा । उभी पुढें मूर्ति गुरुची रंग सावळा ॥ध्रु०॥
उत्तम किल्ला कायापुर चौदा ताळे उंच अपार । मनोरे एकवीस स्वर्गावर कमानी खिडक्याचा प्रकार ॥चा०॥ तेथें तुर्यादेवी सुंदर दाखवी कळा । सत्रा विद्या ओघ वाहे झुळझुळा । दोन तटा जाती नीट इडा पिंगळा । सुषुन्मा वाट तिसरी आत्मजिव्हाळा । किल्ल्यांत उतरला ओघ अगाध लीला । जीवनांत पेटली ज्योत दिसे बंबाळा । मन गिरकी चक्राकार करिती चाळा । मायेच्या हातीं सूत्र देती हिंदोळा । यावरी औट मातृका कळाविकळा । चंद्रसूर्याच्या रश्मी बारा सोळा ॥१॥
अनुहात ध्वनी लागली थोर होती वाद्यांचें गजर । सिद्धसंतांचें माहेर तेथें वस्तु निराकार । नवरंगाच प्रकार ॥चाल॥ लागली ज्योत ध्यानस्थ ऋषिह्मुनी अखंडीत । अठरासी पडले ठक सहा राहिले निवांत । न कळे याची हातोटी गूढ सिद्धांत । वेदाची वाणी तेथें जाहाली कुंठीत । पुढें सिद्ध बोला बोल ऐका मात । नवरंगारहित हे करणी कैसी अद्भुत । ब्रह्मा विष्णु महेश्वर होतील श्रुत । नलगे समाधि मुद्रा आसनयुक्त । प्रगटचि तकिया आहे मैदानांत । हे खूण सिद्धसंताची शब्द आगळा । जा शरण लोटांगणीं धरी चरणयुगुलां ॥२॥
त्रिकुटी ब्रह्म रक्तपीत श्रीहाटी विष्णु समाधिस्थ । श्वेतवर्ण रुद्र विख्यात वास गोल्हाट सिखराआंत ॥चाल॥ औट पीठीची वस्तूलाघव्व । म्हणती हे अर्धमात्रा सिद्ध सर्व । इजपासोन जाहले तिन्ही देव । या शरीराचें मूळ पाहा अनुभव । अव्यक्त मूळ माया ईचें नांव । तेह्तें गगनीं दसवें द्वार म्हणती गुरुराय । मन निग्रहे न करी बापा धरी दृढभाव । त्या साक्षी मच्छिंद्र नाम ज्ञानदेव । समबुद्धि निश्चय नमनीं ज्याचा भाव । हें वचन सत्य गुरुचें भेद आटला । अभेद जाहाला तो नभी कळिकाळाला ॥३॥
अर्धमात्रेचें शोधन जाहालें देह्याचें दर्शन । आतां आणिक पुढें बोलणें ऐका संतजन । देह्यांतील वस्तु निर्गुण ॥चाल॥ बोलतों उघडेंच आहे गुज पाहातां सहजासहज । मोत्याचा वोगर भरला चिन्मय निजावर्ण । व्यक्ताचा भाष्य दान जें । साजे कोटी चंद्रसूर्यचें तेज । अमूप कळा निजबीज फांकल्या दिव्य तेज । प्रकाश सर्वांतरीं नाहीं दुजें । सोवळ्यांत वोवळ्याचें काय काज । द्वैताचें उडालें भान एकमय राज । एकत्वें जगदीश्वर कोण अत्यंत । स्थावरजंगमीं उभा पूर्ण महाराज । यांतच आटले सर्व देव द्विज । या वचनीं भवभय नाहीं बाल पैज । हें पाहुनी मध्वनाथ मनीं मोकळा । वर्णाश्रम आचरे सत्य नाहीं कंटाळा ॥४॥
पद १७७ वें
पहा रे या कीं उघडें सच्चिदानंद रुपडें । हरि भजा सुखें हरि भजा वाडेंकोडें ॥ध्रु०॥
सद् म्हणजे साकारलें अनुभवीं पाहिजे भलें । नीळ रंगाचें वोतिलें देह शामरूप चांगलें । कारण नाम ठेविलें, सूक्ष्म सदोदित दाटलें । रक्तपित्ताचे स्थूळ नेमाचें षड्चक्रांचें औट हाताचें ॥चाल॥ हें सगुण साकारलें । सद्ब्रह्म मुसावलें । अनुभवीं अनुभविलें । हें सहज सुखाचे डोले । संतांचे अबोल बोल उघडे ॥१॥
नीळ कर्दम पंचभूतांचा, अव्यक्त मूळ मायेचा । अशंका वदेल वाचा दृष्टान्त गर्भगीतेचा । गुणपंचक मूळतत्वाचा मेळा हा पंचविसाचा । देह पिंडब्रह्मांडींचा जडाव सद्ब्रह्मींचा ॥चाल॥ चवदा ताळा । बावन बाळा । इडा पिंगळा । ऐक्य पुतळा । पाहा नाड सुषुन्मा नीट, वाहे सत्रावीचा पाट । अजपा जप सुसाट सोहं उच्चार हा प्रगट । चिद् ऐका श्रोतेजन चैतन्यकळा ॥२॥
आनंद श्वेतपित्त चांदणें सदोदित । सागरीं आलें भरतें जळ अक्षयीं निवांत । बोलणें बोला पुरतें निरशून्य शून्यातीत । मृदुतीक्ष भासें सत्यगुज वदले साधुसंत ॥चाल॥ त्रय पद झोका । गूढ तीहीं लोकीं ऐका । चंपककलिका । गुरुगुज ऐका । हें ऐक्याचें मंडण गुरु लक्ष लक्ष निर्गुण । छेदकता भवबंधन अशी त्रयपद व्याख्या जाहाली । वाणी मध्वनाथी वदली गोड ॥३॥
पद १७८ वें
तो नर गति चुकला । स्वानंदातें मुकला ॥ध्रु०॥
सद्गुरुवरदावाणी नाहीं नाहीं ज्याचे श्रवणीं ॥१॥
शास्त्रें पाहुनि वक्ता । बोलत फार अनुभग नसतां ॥२॥
धर्मवासना कांहीं । ज्याचें मानसिं तिळभर नाहीं ॥३॥
संतसंग हरिभक्ति । क्षणभरी नये मनांत विरक्ति ॥४॥
मध्वनाथ म्हणे भाव । सद्गुरुवांचुनी कैंचा देव ॥५॥
पद १७९ वें
गजनरवेष वर्णी शेष नुरवी शेष सेंदुरवाडा नांदतो रे ॥१॥
वहनीं उंदीर वदनीं सिंदुर त्रिभुवनसुंदर सेंदुरवाडा नांदतो रे ॥२॥
तीर्थ पुरातन दैत्यदुरातन सत्यसनातन सेंदुरवाडा नांदतो रे ॥३॥
गणपतिपीठ जाणुनि नीट विठ्ठल धीट सेंदुरवाडा नांदतो रे ॥४॥
जाणुनि नैश्वर आळवि सुस्वर मध्वमुनीश्वर सेंदुरवाडा नांदतो रे ॥५॥
पद १८० वें
कधीं पाहीन मी घननीळा हो ॥ध्रु०॥
आंगीं झगा पिंगळा विलसे बरी । त्यावरी शोभति माळा हो ॥१॥
राम पराक्रमी देखुनि रावण । हृदयीं फार जळाला हो ॥२॥
मध्वमुनीश्वर आरति करुनि । भेटेन दीन दयाळा हो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP