मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १४१ ते १५०

स्फुट पदें - पदे १४१ ते १५०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १४१ वें
काय करूं जन हे आंधळे रे । नसतें वासनाजाळीं बांधले रे ॥१॥
कांहीं उपाय यासी आढळेना । भवदुःख आंगीं याचें आढळेना ॥२॥
विषम विषयरसीं रातले । अहंभावें मदेंकरुनि मातलें ॥३॥
मध्वनाथ म्हणे ऐसे मदांध । यमासि उत्तर काय देईल मग ॥४॥

पद १४२ वें  
हरिकीर्तन ऐका । कांहीं न वेचे पैका ॥ध्रु०॥
सगुणचरित्रें ऐकुनि साधू । गेले परलोका ॥१॥
व्यर्थ तुम्ही जन कळिकाळाचा । वागवितां धोका ॥२॥
मध्वनाथ भवसिंधु तराया । सांपडली नौका ॥३॥

पद १४३ वें
सावध होई आतां रे ॥ध्रु०॥
निशिदिनीं ध्याई श्रीभगवंता । हृदयीं ध्याई दयाळा अनंता । व्यर्थचि जासी दूर दिगंता । मरणहरण तरण स्मरण हरीचें जप तूं निवांता ॥१॥
त्यजुनि ममता देहीं अहंता । शरण जावें पुजावें महंता । मध्वमुनींद्रा न करी चिंता । श्रवण मनन भजन नमन करुनि सेवी संता ॥२॥

पद १४४ वें
सगुणा तुझें जपतों नाम ॥ध्रु०॥
शिणलों बहुतांपरि हरि । दाखवी आतां अपुलें धाम ॥१॥
शरण जाणुनि मध्वनाथा । म्हणुनी याचे पुरवी काम ॥२॥

पद १४५ वें
शरणागतासी रे । तारितो महाराज भगवान ॥ध्रु०॥
धाउनि सोडवी दिव्य गजेंद्र । कोण करी अनुमान ॥१॥
कौरवीं गांजियली जधि द्रौपदी । राखी तिचा सन्मान ॥२॥
रघुपतिमुद्रा घेउनि निजकरीं । सागरीं तरे हनुमान ॥३॥
चरणावरि शिर ठेवि बिभीषण । धरी त्याचा अभिमान ॥४॥
मध्वमुनीश्वरस्वामी दयानिधी । बळीसदनीं दरवान रे ॥५॥

पद १४६ वें
नाम सार सार सार सार जप तूं वारंवार ॥ध्रु०॥
सांगतों हें तुज मीं प्राण्या । चुकवी येरझार ॥१॥
संसारार्णव तरुनि जाई । वेगीं पैलपार ॥२॥
मध्वनाथा नामस्मरणें प्रसन्न । जगदाधार ॥३॥

पद १४७ वें
ध्याना आणूं परमात्मा । ध्याना आणूं ॥ध्रु०॥
आसन घालुनि प्राणायामें । चित्तचतुष्टयमंडप ताणूं ॥१॥
निर्मळ प्रत्याहार प्रयागीं । जीव सुमंगल बाणक न्हाणूं ॥२॥
गुरुचरणासी शरण रिघोनि । निशिदिनीं अजपा मंत्र उमाणूं ॥३॥
मध्वमुनीश्वरस्वामीदयेनें । मृगजळवत भवसागर जाणूं ॥४॥

अभंग १४८ वा
तुझें रूप वेळोवेळां । दिसो माझ्या दोहीं डोळां ॥१॥
रामनाम वदो वाणी । हरिकथा पडो कानीं ॥२॥
तुलसीनिर्माल्यसुवास । नाकीं राहो सावकाश ॥३॥
हातीं घडो देवपूजा । सर्वकाळ गरुडध्वजा ॥४॥
पायीं तीर्थयात्रा घडो । देह संताघरीं पडो ॥५॥
मध्वनाथ म्हणे देवा । घडो वैष्णवांची सेवा ॥६॥

अभंग १४९ वा
श्रीरामाची भक्ति न सोडावी कदां । प्रार्थीत आहें सदा आवडीनें ॥१॥
आवडीनें राम चिंतावा मानसीं । मग गर्भवासीं येऊं नये ॥२॥
येऊं नये गर्भवासीं महादुःख । संसारांत सुख कांहीं नाहीं ॥३॥
कांहीं नाहीं सुख संसारींच्या जना । म्हणोनि भजना प्रवर्तावें ॥४॥
प्रवर्तावें सदा श्रीरामस्मरणा । तेणें जन्ममरणा चुकवावें ॥५॥
चुकवाचें जन्ममरणाचें मूळ । तेणें उभय कूळ उद्धरावें ॥६॥
उद्धरावें निजगोत्रजासहित । हेचि सदोदित आज्ञा माझी ॥७॥
आज्ञा माझी आहे विवेकी असावें । दुःख निरसावें संसारींचें ॥८॥
संसारींचें दुःख ज्ञानेंकरुनि जातें । ऐसें मध्वनाथें सांगितलें ॥९॥
सांगितलें श्रीशुकयोगींद्रस्वामीनें । तेंचि सुबुद्धीनें विचारावें ॥१०॥

अभंग १५० वा
संतनामावळी
प्रातःकाळीं करितां संतांचें स्मरण । हरती जन्ममरण महादोष ॥१॥
प्रल्हाद नारद ध्रुव रुक्मांगद । सुग्रीव अंगद नळ नीळ ॥२॥
बळी बिभीषण अर्जुन भीमसेन । भीष्म विश्वक्सेन अंबऋषि ॥३॥
दिलीप सगर धर्मात्मा विदूर । उद्धव अक्रूर परीक्षिती ॥४॥
हनुमंत गरुड फणिपती चंद्रचूड । स्वामी हंसारूढ सनकादिक ॥५॥
कश्यप अत्रि श्रेष्ठ भारद्वाज शिष्ट । गौतम वसिष्ठ विश्वामित्र ॥६॥
जमदग्नि पुलस्ती अंगिरा अगस्ती । मृगांक गभस्ति शचीनाथ ॥७॥
भृगु उद्दालक मुद्गल वाल्मीक । जैमिनी शौनक पुंडलीक ॥८॥
कृष्णद्वैपायन कृपेचा समुद्र । श्रीशुकयोगींद्र सद्गुरु माझा ॥९॥
गौडेंद्र गोविंद आचार्य शंकर । जयाचा किंकर हस्तामलक ॥१०॥
श्रीधर सुरेश्वर रामानंद इती । नरसिंहभारती अच्युताश्रम ॥११॥
विद्यारण्य क्रीडे विद्येच्या सागरीं । केली विद्यानगरीं हेमवृष्टी ॥१२॥
परमहंस स्वामी नारायणाश्रम । हरिला भवभ्रम मधुसूदन ॥१३॥
तारक सभेश्वर गंगाधरस्वामी । विश्वेश्वरधामीं विराजती ॥१४॥
गिरीपुरी भारती तीर्थ सरस्वती । दशविध यती नमो त्यांसी ॥१५॥
स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य । शरण अनन्य आचार्यांसि ॥१६॥
बिल्वमंगळ कालीदास चिदंबर । भर्तृप्रभाकर शबर स्वामी ॥१७॥
कपिलपतंजलि भक्तचिंतामणी । उदयला अग्रणी जगन्नाथ ॥१८॥
रामानुज निंबादित्य विष्णुस्वामी । पांचरात्रागमी मध्वाचार्य ॥१९॥
सत्यनिधी सत्यनाथ सत्यव्रत । सत्याभिनवतीर्थ सत्यपूर्ण ॥२०॥
पावक कुळींचें दाहक कळीचे । गोसावी गोकुळींचे निवेदनी ॥२१॥
सूर्य जोशेवे रामचंद्र देवस्वामी । नांदे नंदिग्रामीं वरदीशेष ॥२२॥
शूद्रसेन कासीराज रंगनाथ । अंतरीं निवांत दासानंद ॥२३॥
महाभारताचा अर्थ केला विशद । चौधरी गोविंद दीक्षित जी ॥२४॥
पंचायतनाचें जे करिती पूजन । याज्ञिक सज्जन नमो त्यांसि ॥२५॥
वर्तमानी संत शास्त्रज्ञ पंडित । त्यासि दंडवत आहे माझें ॥२६॥
मच्छिंद्र गोरक्ष गैनी श्रीनिवृत्ति । मुकुंदराज मूर्ति विवेकाची ॥२७॥
जैतपाळ गोपीचंद हा विरक्त । राजा जीवन्मुक्त भर्तृहरि ॥२८॥
परिसा भागवत जनमैत्रनागा । वटेश्वर चांगा बहिरो पिसा ॥२९॥
परमानंद जोगा हरिदास कान्हया । सतिदास सालया पाठकनामा ॥३०॥
नरहरि सोनार गोरा तो कुंभार । चोखामेळ चतुर कनकदास ॥३१॥
वडवाळाचा सिद्ध प्रसिद्ध नागेश । मृत्युंजय निर्दोष हेमाद्रिपंत ॥३२॥
पिपाजी कुबाजी दादाजी कृपाळ । तान्हाजे गोपाळ उपासक ॥३३॥
रंका बंका सधना मुद्धया ज्ञानी जी । गिरमाजी निंबाजी लोलिंबराज ॥३४॥
रमावल्लभाचे दास भाग्य्वान । जयदेव सोपान विठा नारा ॥३५॥
निपटनिरंजन सुरदास मल्लूक । रोहिदास नानक धनासेनी ॥३६॥
तुळसीदास हरि व्यास बनखंडी । ज्याची नवखंडीं कीर्ति गाजे ॥३७॥
काकोबा रामाचा अंतरंगसखा । जीवन्मुक्त देखा माधवदास ॥३८॥
कृष्णातीरीं नांदे आनंदाची मूर्ति । वृंदावनीं कीर्ति डोलतसे ॥३९॥
कृष्णउपासक वासुदेवपंत । नरहरि गुणवंत मालोबाचा ॥४०॥
विजय विठ्ठलाचा रुक्मणा निजभक्त । अंतरीं विरक्त वैद्यनाथ ॥४१॥
मारकीनाथाचें वैराग्य उत्तम । गुरुभक्ति निस्सीम उद्धवाची ॥४२॥
संतबा पवार सिऊबा गुरव । विठ्ठलीं गौरव बोधल्याचा ॥४३॥
ब्रह्मानंद निजानंद रंगराव । जयाचा सद्भाव पांडुरंगीं ॥४४॥
केशव वामन शिवराम चिद्घन । जयराम सज्जन कृष्णदास ॥४५॥
सखा विठ्ठलकवि पंडीत पुण्यवान । गोसावीनंदन मानपुरी ॥४६॥
वर्तमानीं संत पुढें जे होणार । त्यासि नमस्कार आहे माझा ॥४७॥
मध्वनाथ म्हणे संतनामावळी । जपतां वनमाळी जवळी आहे ॥४८॥
ऐसी वनमाळा धरील जो कंठीं । तो नर वैकुंठीं मान्य होय ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP