मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ११ ते २०

स्फुट पदें - पदे ११ ते २०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ११ वें
सद्गुरुमायबहिणी माझे सासूचे विहिणी गे परीसे मंगळदायक अभिनव येक काहाणी गे ॥ कोठें नाहीं देखिली कहणी तैसी रहणी गे । तिन्हींत्रिभुवनीं नाहीं तुज येवढी शाहाणी गे ॥१॥
कायापुरीं देखिले सखे दोघे भाऊ गे । दंडीं त्यांचे ताईत सोनियाचे डाऊ गे ॥ दळितां कांडितां त्यावर ओव्या गाऊं गे । टिपरी खेळत पंढरीस जाऊं गे ॥२॥
वडील भाऊ म्हणवितो उदासीन जोगी गे । धाकटा देखिला कर्मफळ भोगी ॥ कर्मफळ भोगितां जाला क्षयरोगी गे । आतां कैशा भाळतील राजकन्या चौघी गे ॥३॥
विद्या अविद्या म्हणविती दोघीजणी जावा गे । परस्परें अबोला चालविती दावा गे ॥ धाकटीस नावडे वडिल आपला भावा गे । जळो तिचा स्वभाव तुजही आहे ठावा गे ॥४॥
जैसी रांड नाचवी तैसा मेला नाचे गे । वडिलांचें नांव तेंही कधीं नाणी वाचे गे ॥ म्हणतो मी मी माझें माझें येणें घाये कांचें गे । अंगावरीं पडलें ओझें आतां कैसा वांचे गे ॥५॥
वडील भाऊ यांचें कधीं घेईना तें नांव गे । याचें त्याचें सरकतीचें आहे येक गांव गे ॥ येक्या गांवामध्यें बाई येक घर ठाव गे । येक्या घरामध्यें याचा उणा पडला डाव गे ॥६॥
वडिलानें करावा याचा प्रतिपाळ गे । हें तो केवळ अज्ञानी तान्हें लहान बाळ गे ॥ शाहाण्यानें घातलें यावरी मायाजाळ गे । मायाजळामध्यें दुःखी होतें सर्वकाळ गे ॥७॥
बाळपणीं मरितो याचीं मायबापें गे । तरुणपणीं याच्या हातें करवी महापापें गे ॥ आयुष्यास लाविलीं रात्रंदिवस मापें गे । अंतकाळीं गिरवितो प्रलयकाळसोपें गे ॥८॥
त्या वडिलाची विषमबुद्धि सांग ऐसी कैसी गे । येकालागीं देतोंहे गाई घोडे म्हैसी गे ॥ संतति संपति सुंदर वनिता दासी गे । येक आपल्या पोटासाठीं त्यांसी तोंड वासी गे ॥९॥
येक शिव्यागाळी देती घेतो तळतळाट गे । येक त्याच्या चरणावरी ठेविती लल्लाट गे ॥ येका आपुलें स्वरूप दावितो विराट गे । येक नरकामध्यें दाटुनि पचवितो सैराट गे ॥१०॥
वडिलासि दटाउनी करवी याचें राज्य गे । सद्गुरुमायबहिणी तुजला मागतें हें आजि गे ॥ विषम सृष्टि देखुनी आलें बहु वाजी गे । कृपादृष्टि पाहुनी गरिबां नवाजी गे ॥११॥
महाद्वारीं गरुडपारीं घालूं ऐसा बार गे । पुंडलीक भाई माझा गौरवील फार ग ॥ माझ्या कंठी घालील नवरत्नांचा हार गे । मध्वनाथा स्वामीस मागे समचरणीं थार गे ॥१२॥

पद १२ वें टिपरी
गंगातीरीं बारा पोरी खेळताति नानापरि । गौराईची बरोबरी न करी कोण्ही ॥१॥
गौराईचें वर्मकर्म ब्रह्मादिकां न कळे । भले भले ठकले मुनीश्व ॥२॥  
ब्रह्मा विष्णु महेश्वर जडजन्म पावले । भक्षिताति कावळे बीज त्यांचें ॥३॥
कर्माचा भोग इंद्रचंद्रादिकां न सुटे । तया आंगीं उमते भगंदर ॥४॥
कर्माची गोष्टी तुम्ही आयका नायका । दोघां एक बायको आवडली ॥५॥
कुकर्म जाणुनि मनामध्यें रडली । अग्नीमाजीं पडिली जिवंतचि ॥६॥
तिच्या रूपालागीं जाले दोघे दुर्व्यसनी । लोळताति मसणीं निरंतर ॥७॥
दोघांतोन येकाच्या गळांच पडली । अंगसंग जडली राहे सदा ॥८॥
सावत्र लेक तिला प्रातःकाळीं झोडिती । संध्याकाळीं जोडिती दोन्ही हात ॥९॥
तिचें नांव सांगा तिचें नांव सांगा । लाजतां कां गा वैष्णव हो ॥१०॥
वैष्णवाची कन्या एकास्मार्तासी रातली । त्यानें ती घातली घरामध्यें ॥११॥
अठरापगड जाती तिला चुंबन देती । डोईवर घेती उचलूनिय ॥१२॥
चालणें तिचें सहज वांकडें । दर्शन सांकडें अंघोळीचें ॥१३॥
तार्किकांचे परिकरी कटकट मोठी । घालिते खडे पोटीं आपुलिया ॥१४॥
कडेलोट करितां गेली अधोगतिला । नावडे सवतिला म्हणोनिया ॥१५॥
सासरीं नांदेना माहेरीं नांदेना । वाढीना रांधिना कधीं तरी ॥१६॥
सावत्र लेकानें बाहेरी घातली । जाउन रतली विजातीसी ॥१७॥
मुनीश्वराचे सुगम उगाणे । उगमा पुराणें शोधोनिया ॥१८॥

पद १३ वें टिपरी
जीवशीव टिपरें ॥ याची घेणें टीप रे ॥ गुरुनाथा टीप रे ॥ त्वरा करी खेळतां ॥१॥
मागें पुढें पाही रे ॥ खाले वर काई रे ॥ चारी वेद गाही रे ॥ त्वरा करी खेळतां ॥२॥
चुकूं नको बैस ऊठ ॥ स्वरूपाचा रंग लूट ॥ खोटेपणा तुटातूट ॥ त्वरा करी खेळतां ॥३॥
मध्वनाथ सांवळा ॥ करतळीं आवळा ॥ पहा जैसा गोपाळा ॥ त्वरा करी खेळतां ॥४॥

पद १४ वें
खेळ खेळतो ऐंद्रजालिक जगचालक । बागबगीचे लावितो आंबे ते काय थांबे ॥ तैसें शेवटीं हें अवघें नासें क्षणहरी भासे । काय गंधर्वनगरीची बरी वस्ती खरी । तैसा प्रपंच हा मायि जाणा मिथ्या म्हणा । मृगजळें जाईल तृष्णा हें तो मृषा । तेथें धीवर घालुनी फांसे सांपडवी मासे । स्वप्नीं सांपडला बागुलाचा केवा जतन ठेवा । त्यासि पर्वकाळ पाहुनी बरा दान पुण्य करा । रज्जुभुजंगाचा काढुनी मणी द्यारे कोण्ही ॥ अवघी कल्पित कादंबरी वाजवी परी । वाजना तोंडासी मांडीवरी आडवें धरी ॥ त्यास कासवीचें दूधतूप पाजी सुखरूप । शक्तिरजताचे लेववुनी नग खेळवी मग ॥ त्याचा आवसेच्या रातीं घरीं व्रतबंध करी । त्यास नोवरीची राजसवाणी सांगे काहाणी ॥ भीष्मतनया नोवरी बाला भाळेल तुला । गगनकुसुमाची गुंफूनि माळा घालील गळां ॥ तेथें सुनमुख पाहोनि बरें अवघेंच खरें । सांगे मध्वनाथ याची कथा अवघे तथा ॥१॥

पद १५ वें दळण
संसारचक्रजातें ॥ जें तें याला वोढूं जातें ॥ वोढितां वोढवेना ॥ जडकाविलें आपुल्या हातें ॥१॥
कर्माकर्म दळुनियां ॥ आपुल्या आपण खातें ॥ खावूनी तृप्ती नोहे ॥ टकमका पाहातें ॥२॥
प्रवृत्तीही खालील तळी ॥ निवृत्ति ते वरील बळी ॥ अष्टादशवर्ण धान्य ॥ आपल्या भारानें दळी ॥३॥
दळुनियां पीठ केलें ॥काळबैल तेंही गिळी ॥ ऐसें हें दुष्ट जातें ॥ बहुतां जनांला छळी ॥४॥
अहंतेचा खुंटा गाढा ॥ याला धरील तेंच द्वाड ॥ ब्रह्मादिकीं धरूं जातां ॥ त्यांवरी पडली देवधाड ॥५॥
आतां मी काय करूं ॥ इतरांचा कोण पाड ॥ ममतेचा चिकटा धरी ॥ त्याची न धरावी चाड ॥६॥
दळणाचें दुःख भारी ॥ ऐसें जाणुनी संसारीं ॥ शरण गेल्या देवराया ॥ मध्वनाथाच्या कैवारी ॥७॥
जीवन्मुक्त अन्नसत्रीं ॥ जेऊन बसल्या पोटभरी ॥ सच्चिदानंदबोधें ॥ मन झालें निराकारी ॥८॥

पद १६ वें कांडण
उखळ निजनिष्ठेचें मांडून । दृश्य साळी घालूनि कांडण ॥ विवेकाच्या मुसळें ताडण । कोंडा मायाविवर्त झाडणें ॥१॥
लक्ष लावून घाली घाव । शमदम साधुनिया भाव ॥ अवस्था चितीं सडिते वाव । चौसडीचें तुर्येमध्यें नांव ॥२॥
शुद्ध वस्तु अवस्थातीत जे । निवृत्तीच्या पात्रांत ठेविजे ॥ ज्ञानदुग्ध त्यावरी ओतिजे । वैराग्याच्या अग्निवरी सिजे ॥३॥
जाऊं नेदी प्रेमाचा तो ऊत । वरी घाली गुरुभक्तिघृत ॥ स्वानुभव शर्करेसहित । सेवुनी बाई होई संगातीत ॥४॥
जीवन्मुक्त स्थितीचें पायस । जेऊन बसले धणिवर राजहंस ॥ क्षीरसागरीं जयाचा रहिवास । चिदानंदीं करिती चिद्विलास ॥५॥
ऐसें कांडण आहे या परीचें । शुकयोगींद्राधरींचे ॥ मध्वनाथाचिया आंतरींचें । जेणें सुख होय त्या हरीचें ॥६॥

पद १७ वें
गगनीं बांधुनी घर बसली येक राजकन्या । चंद्रवंशींची म्हणविते हे राजमान्या ॥ व्यभिचार करिते जोगियासी फार मैत्री । सुमनसेजेवरि निजवुनी भोगी दिवसरात्रीं ॥१॥
अनाहत नौबत वाजविते घरीं घोष होतो । क्षण एक ऐकतां साधकाचा महादोष जातो ॥ जिच्या द्वारापुढें येक हत्तिण झुले ते सर्वकाळ । हत्तिणी लोटुनी येईल जो पुढें त्यास घालील माळ ॥२॥
ठाईं ठाईं तिनें ठेविली रक्षण राजमार्गीं । त्रिकुटशिखरावरी खेळते अबला सिद्धवर्गी ॥ सद्गुरुकृपें मध्वनाथें वश केली आळा । त्रिवेणीसंगमीं तिसी साधियेली लग्नवेळा ॥३॥

पद १८ वें
मधल्या घरामध्यें निजली नागिणी कोण करी तिस जागें रे । घरींच्या धन्याला येऊं देइना पाहते त्याकडे रागें रे ॥१॥
नागीण नोहे नागीण नोहे नाहीं विखाचे दांत रे । नवद्वारांचें मुंगियांचें घर राहातें वारुळांत रे ॥२॥
बाहेर येता बहुत भीते अगणित वारा पीते रे । नागसराचेन मोहित होते अनाहित नादें जीते रे ॥३॥
सुमनसुवास आवडतो ती दुधाची आवडी मोठी रे । सद्गुरु मध्वनाथ गारोडी तीस बांधतो कमळादेठीं रे ॥४॥

पद १९ वें
केसी खेळविते चिद्शक्ति । मेळवुनी अवघ्या व्यक्ति ॥१॥
आपण बैसली दृढतर । त्रिगुण तिवईवर ॥२॥
पोरें दहापांच मिळविते । येकामागें येक पळविते ॥३॥
डोळे झाकिते बहुतांचे । आपल्या हातें साचे ॥४॥
कैसी हिंडवते लेंकरें । चौर्‍यायशींचीं घरें ॥५॥
जाली हीन सुदी सकळ । केली अवघी विकळ ॥६॥
इची इजपासीं मिळाली । दिसती मात्र निराळीं ॥७॥
ऐसा गडी कैचा तिही लोकीं । इचेही डोळे झाकी ॥८॥
तिवईवरून चळवी । खेळ मोडून पळवी ॥९॥
समूळ पिंपळ परी तोडी । कपाळ ईचें फोडी ॥१०॥
नाथ शिकवितो उपाये । चुकती सर्व अपाय ॥११॥
स्वरूपीं धरितां निजसोये । भेटेल मध्वनाथ ॥१२॥

पद २० वें
चित्कला स्वैरिणी विपरीत जाणावी । संकेतें खुणावी विरक्तासी ॥१॥
सुमनशेजेवरी यारे माझ्या कोण्ही । पापपुण्य दोन्ही कल्पूं नका ॥२॥
हृदयग्रंथी सोडा निरसा जीवशिवा । अधरामृत सेवा सायुज्येचें ॥३॥
वसन निर फेडा भवबंध तोडा । जीव नेऊनि जोडा सद्गुरुपायीं ॥४॥
मध्वनाथ म्हणे ऐसी ज्याची लीला । देखणी तो कळा स्वयें जाणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP