मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद १११ ते १२४

श्रीरामाचीं पदें - पद १११ ते १२४

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


कवन १११ वें
सरसिजनेत्रा दशरथराजपुत्रा ॥ध्रु०॥
रत्नसिंहासनावरी शोभसी तूं धर्नुधारी । उपासक ओळखती । रघुपति पूजायत्रा ॥१॥
कोटि - मदनाभिरामा पतितपावन नामा । निशिदिनीं मध्वनाथ । जपतसे राममंत्रा ॥२॥

पद ११२ वें
श्रीरामाचें नाम मुखीं घ्यावें रे ॥ध्रु०॥
त्रिभुवनीं नामरूप पाहुनियां सुखी व्हावें ॥१॥
मध्वनाथ म्हणे अभिनव राघोबाचें यश गावें ॥२॥

पद ११३ वें
श्रीरामाचें ध्यानीं रूप चिंती रे ॥ध्रु०॥
धनसुतरामा तुज कोण्ही काम न ये । अंतीं रूप चिंती रे ॥१॥
सारांश जाणुनि मध्वनाथा सांगितलें । संतीं रूप चिंती रे ॥२॥

पद ११४ वें
तो तूं माझा परमसखा रघुराज ॥ध्रु०॥
मीपण धरुनी वणवण करितां शिणलों आलों वाज । मी शरणागत जाणुनि माझें बीज भवाचें भाज ॥१॥
मध्वमुनीश्वरदीनदयाळा राखे बिरुदें आज । त्रिंबक विनवी भावें मजला बोधसुधारस पाज ॥२॥

पद ११५ वें
तो मी तुझा सेवक आळसी जाण ॥ध्रु०॥
ध्यान न जाणें ज्ञान न जाणें नेणें वेद पुराण । मानस माझें मळिन दयाळा जाणसि तूंचि सुजाण ॥१॥
विषयसुखाला देखुनि माझे निवती पंचप्राण । मध्वमुनीश्वर जानकीनाथा वाहतो तुझी आण ॥२॥

पद ११६ वें
बोला बोला राघोबाचें नाम बोला । बोलेना तो होईल श्वानश्वापद कोल्हा ॥ अथवा रानीं होउनि भटकत फिरेल होला । येवढा कारे हाणोनि घेतां टोला ॥१॥
कांरे अफू खादली तार आली डोळां । आपल्या घरा जाउनी पाय पसरुनि लोळा ॥ जळो जळो वोंगळ हा तुमचा मोळा । हृदयीं ध्यातां श्रृंगार सुंदर सोहळा ॥२॥
कीर्तनरंगीं ब्रह्मानंदें गजरें डोला । रामनामस्मरणें करा कंठ बोला ॥ हातीं टाळी वाजुनि करणें गदारोळा । मध्वनाथीं रंजवी देव भोळा ॥३॥

पद ११७ वें
राम रम्यलक्षण दक्षिणे लक्ष्मण राम आला ॥१॥
पृष्ठभागीं भरत शत्रुघ्नसहित राम आला ॥२॥
वामभागीं जानकी राममुखा अवलोकी राम आला ॥३॥
दासामध्यें निरभिमान सन्मुख उभा हनूमान राम आला ॥४॥
मध्यें माझा रघुपति कोदंड मिरवे हातीं राम आला ॥५॥
मध्वनाथें आळविला प्रीति करूनि कवळिला राम जाला ॥६॥

पद ११८ वें
शरणागतासी रे । तारी तो महाराज भगवान ॥ध्रु०॥
धावुनि सोडवि दिव्य गजेंद्र । कोण करी अनुमान ॥१॥
कौरवीं गांजियली जधिं द्रौपदी । राखि तिचा सन्मान ॥२॥
रघुपतिमुद्रा घेऊनि निजकरीं । सागरीं तरे हनुमान ॥३॥
चरणांवरि शिर ठेवि बिभीषण धरि त्याचा अभिमान ॥४॥
मध्वमुनीश्वरस्वामी दयानिधि । बळिसदनीं दरवान रे ॥५॥

पद ११९ वें
देवा रमानाथा देवा रमानाथा ॥ध्रु०॥
तुजविण कोण वारी अनाथाची वेथा ॥१॥
मध्वनाथ म्हणे माझ्या ठेवी करांबुज माथां ॥२॥

पद १२० वें
करी तरि बरी मज कृपा दीनावरी रामा ॥ध्रु०॥
कामक्रोधादि रिपु गांजिताति आम्हां । म्हणुनि शरण आलों आतां तुज पूर्णकामा ॥१॥
दीन बहु मीन जळाविण तसा मी धामा । जीव जीवी आतां येतुनिया रामा मेघश्यामा ॥२॥
दीनदयाळ पतितपावन वदताति तुम्हां । तेंचि ब्रीद साच करी सच्चित्सुखधामा ॥३॥
मध्वनाथ विनवीतसे तुज घनश्यामा । येथुनिया सोडी वेगें नेई निजधामा ॥४॥

पद १२१ वें
तूं माझा यजमान । रामा ॥ध्रु०॥
जननी जठरीं रक्षियलें मज । पोसुनि पंचहि प्राण ॥१॥
बाहेर निघतां मातेचे स्तनीं । पय केलें निर्माण ॥२॥
ऐसें असतां या पोटाची । कां करूं चिंता जाण ॥३॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । धरि माझा अभिमान ॥४॥

पद १२२ वें
जयराम श्रीराम रघुपति मंगलधामा ॥ध्रु०॥
क्षत्रियकुलवन्हि परशुधरा । कश्यपमुनिदातारा ॥१॥
ब्रह्मीचरपर्णा जटाधारा । मंत्रमहोदधिसारा ॥२॥
हरिमुनिवेषा परात्परा । मध्वमुनीश्वरहार ॥३॥
                                                             
पद १२३ वें
तुम्ही पूजित जा श्रीरामा ॥ध्रु०॥
मातापुरनिवासिनीसूनु । नाहीं जयातें रामा ॥१॥
संतति संपत्ति देत सरस्वती । कलिमलहारनामा ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी । गात असे निष्कामा ॥३॥

पद १२४ वें
राम माझा धरिल कसा अभिमान । पाहातो काय निदान ॥ध्रु०॥
जपतपसाधन कांहींच नेणें । पातकी दुष्ट महान् ॥१॥
परघातक मी गुरुवंचक मे । दोष्ह हे काय लहान ॥२॥
करुणाघन हा निष्ठुर झाला । त्र्यंबकप्राननिधान ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP