मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते १०

परिशिष्ट पदे - पदे १ ते १०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ ले
सांपडला बहुता दिवसा मज सेंदुरवाडीचा मंगळमूर्ती । सांग सख्या मग काय उणें घरिं बैसल्या होईल उदरपूर्ती ॥ देईल संतती संपत्ति सन्मति सद्गतिदायक निर्मळ स्फूर्ती । चिंतामणिविण आणिक दैवत चिंतिल्या होईल दुर्गति पुर्ती ॥१॥
देव निरंजन मुनिजनरंजन भवभयभंजन सद्गुरुरूपा । भेदविनाशक शूद्रउपासक बुद्धिप्रकाशक द्विजकुलभूपा ॥ दिव्य चतुर्भुज तोचि तूं शंभुज दावि पदांबुज अनुकंपा । मध्वमुनीश्वर जाणुनि किंकर देव अभयंकर शांति अमूपा ॥२॥

अभंग २ रा
चला जनहो यात्रे जाऊं । पांडुरंग नेत्रीं पाहूं ॥१॥
सामराजक्षेत्रीं राहूं । तया गंगेमध्यें नाहूं ॥२॥
सुखदुःख दोन्ही साहूं । पद वैकुंठीचें लाहूं ॥३॥
समपदकमळें ध्याऊं । भावें तुळशीदळ वाहूं ॥४॥
नाम विठोबाचें गाऊं । मध्वनाथसी तेथेंच बाहूं ॥५॥

अभंग ३ रा
तारावया जढमूढ । स्वामी आला गरुडारूढ ॥१॥
देवा आला गंगास्नाना । कारे जनहो यात्रे याना ॥२॥
तुळसीमाळा घालुनि कंठीं । कथा करूं वाळवंटीं ॥३॥
कळिकाळा उसीक । यमदूता न घालूं भीक ॥४॥
दिंड्या पताकांचे भार । गरुड टके झळकती फार ॥५॥
पुढें वैष्णव साबडे । गाती नामाचे पवाडे ॥६॥
टाळमृदंग धुमाळी । रंगीं नाचे वनमाळी ॥७॥
देव करिती पुष्पवृष्टी । अवघी आनंदली सृष्टी ॥८॥
आखाडीच्या यात्रेमुळें । उद्धरती कोटीकुळें ॥९॥
मध्वनाथ गंगातीरीं । जवळ आणिली पंढरी ॥१०॥

अभंग ४ था
ब्रह्मसुख प्रगटलें । भवदुःख निवटलें ॥१॥
ईटेवरी उभें ठेलें । सेंदुरवाड्यांत भेटलें ॥२॥
नंदघरिंचे नांगरगोडे । कव्हडे येथें आलें धेंडे ॥३॥
मध्वनाथासी उपकार । केला पुंडलिकें फार ॥४॥

अभंग ५ वा
चंद्रभागा सरोवरीं । उभा होता ईटेवरी ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । गंगातीरीं आला जाणा ॥२॥
गुप्त होता बहुत दिवस । प्रगट जाला जगदीश ॥३॥
दीनजन तारावया । दया आली देवराया ॥४॥
मध्वनाथाचा उद्धार । करील विठ्ठल उदार ॥५॥

अभंग ६ वा
बळकट बांधोनिया कास । जालों विठ्ठलाचा दास ॥१॥
येव्हडा शिरावरी धनी । कळिकाळा कोण गणी ॥२॥
गाऊ नामाचे पोवाडे । जिंकूं कामक्रोध गाढे ॥३॥
कांहीं नाहीं भय शोका । जेथें जेथें आमुचा ॥४॥
मध्वनाथ म्हणे आज । आम्ही करूं रामराज्य ॥५॥

अभंग ७ वा
ऐका जनहो निगम । सांगतों जें सुगम ॥१॥
कर्म करुनी क्लेश । न मिळे सुखाचा तो लेश ॥२॥
संततीचा सहसा । मानूं नका भरंवासा ॥३॥
मेळविता धनमाल । तेणें काय निवाल ॥४॥
कासी त्रिवेणी गया । बहुता दिवसां येईल दया ॥५॥
प्राणायाम वायु योग । पूर्ण जाणावा तो भोग ॥६॥
मनांतून संन्यास । करा घरींच वनवास ॥७॥
मोक्षत्यागाविरहित । नव्हे तुमचें तें स्वहीत ॥८॥
स्वयें होतांचि निःसंग । भेटेल तो श्रीरंग ॥९॥
मध्वनाथ संन्यासी । जीवनमुक्त अविनाशी ॥१०॥

अभंग ८ वा
तुळसीमाळ घालुनि कंठीं । मी काळ कंठीं विठ्ठलें ॥१॥
तुझें नाम घेतों मुखीं । नाहीं सुखी मन माझें ॥२॥
वैष्णव म्हणवितों तोंडें । कानकोंडे वाटत ॥३॥
तुझ्या वागवितों मुद्रा । भीक शूद्रा मागतों ॥४॥
मध्वनाथ म्हणे आजी । माझी लाज राखवी ॥५॥

अभंग ९ वा
पुंडलीकवरदें कृपा केली मोठी । सामाविले पोटीं अपराध ॥१॥
पंढरीचा राजा म्हणवी जगजेठी । त्यानें दिली भेटी अनाथासी ॥२॥
अनाथाचा नाथ पतितपावन । तें केलें जतन ब्रीद देवें ॥३॥
मध्वनाथ म्हणे स्वामी कृपासिंधू । म्हणवी दीनबंधु पांडुरंगा ॥४॥

अभंग १० वा
समपद विटेवरी । उभा होता भीमातीरीं ॥१॥
दया आली त्या विठ्ठला । सेंदुरवाडा भेटला ॥२॥
आला गोपाळाच्या संगें । माझे निववीलें आंगें ॥३॥
मूर्ती सुंदर राजस । जीस वर्णीं वेदव्यास ॥४॥
देव सांवळा सुंदर । कांसे बरवा पीतांबर ॥५॥
शंखचक्रांकित कर । ठेवियेले कटिवर ॥६॥
कंकण किंकिनी मेखळा । कंठीं पदकांची माळा ॥७॥
काळी खांद्यावर घोंगडी । चिमणे गोपाळ संवगडी ॥८॥
कर्णीं कुंडलांची दाटी । माथा मोरपिसा वेंठी ॥९॥
केशर मळवट भाळीं । कृपादृष्टीनें न्याहाळी ॥१०॥
मध्वनाथासी केले टोणे । त्यातें उतरा लिंबलोणे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP