आरती विठ्ठलाची
मध्वमुनीश्वरांची कविता
समपद जोडुनि ईतेवरि ऊभा ठाके । दशहि दिशा प्रभा मुगुटाची फांके ॥ कुंडलाच्या तेजें रविमंडळ झांके । ज्याच्या स्मरणें जन्ममरणादिक धाके ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । भावार्थे आरती तुज अंतरंगा ॥ध्रु०॥
मेघांसवें जैशी वीज प्रकाशे । तैसा पीतांबर झळकतो कांसे ॥ करयुग जघनीं भक्त तारक आभासे । गोवळवेष देखुनि श्रीरुक्मिणी हांसे ॥जयदेव॥२॥
धन्य भीमा चंद्रभागा पंढरी । पुंडलीकाच्या भेटी आला श्रीहरि ॥ विठ्ठल विठ्ठल ऐसे जपतां क्षणभरी । लक्ष चौर्यायशींचें दुःख परिहारी ॥जयदेव॥३॥
गरुड टके कुंचे झळकती पताका ।सनकादिक देती मधुरध्वनि हांका ॥ लौकिकलज्जा देहअभिमान टाका । कीर्तनकरीत यारे भीमातटाका ॥जयदेव॥४॥
तुळशीमाळा कंठीं वाहूं कृपाळा । संतसंगें गीती गाऊं गोपाळा ॥ मृदंगवीणे घेऊनि झलरी करीं टाळा । मध्वनाथ म्हणे मर्दू कळिकाळा ॥जयदेव॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017

TOP