श्रीरामाचीं पदें - पद ४१ ते ५०
भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला
पद ४१ वें
वेडा वेडा गे दशरथ राजा जाला वेडा । कैकयीचा गे बळकत बाई चेडा ॥ घरामध्यें तो पोसियला रेड । सूर्यवंशीं पाडिलें उजेडा गे ॥१॥
लंकेशाच्या नगरा सागराचा वेढा । याही दशानना लाविला वेढा ॥ भार्गवरामाचा तो वाहियला मेढा । ज्याच्या नामापुढें मधुर न लागे पेडा गे ॥२॥
ऐसा रामचंद्र वनवासा धाडी । याणें आम्हांवरती आणियली धाडी ॥ म्हातार्याची या पिकली अवघी दाढी । दुःख संकटांत अयोध्येश पाडि वो ॥३॥
आतां आम्ही वसऊं दुसरी रामवाडी । तेथें जाउनि राहूं बांधुनी येक माडी ॥ जेथें जानकी ते पंचामृत वाढी । मुक्ति सायुज्यता अंगण झाडी वो ॥४॥
कौसल्येच्या पुण्यें आम्हां काय उणें । सुमित्रेसी तें सौख्य होईल दुणें ॥ कैकयी भुंकेल जैसें पिसाळिलें सुणें । नाचे मध्वनाथ रामकृपागुणें वो ॥५॥
पद ४२ वें
जाऊं नको तूं दुरी रे रामा । जाऊं नको तूं दुरी ॥ध्रु०॥
नव्हे वरदान हें माझें आदान । कैकयी गुळाची सुरी ॥१॥
वृद्धासि तरुणी जहर रमणी । केल्या तीरां तुरी ॥२॥
अंतरीं कपट बैसुनी निकट । पाय घरामधें चुरी ॥३॥
गुळाचा कवळ गिळिला केवळ । गुंतला माझ्या उरीं ॥४॥
हीन चढें पदीं नीत नव्हे कधीं । न राखी भल्याची उरी ॥५॥
रामा तुजविण व्यर्थ माझें जिणें । वाहवलों भवपुरीं ॥६॥
दिवस न गमे मानस न रमे । बैसुनियां गोपुरीं ॥७॥
मध्वनाथा धांवे आळवितों भावें । सांभाळी अयोध्यापुरी । रे रामा ॥८॥
पद ४३ वें
रायासन्मुख राहोनि उभी कौसल्या करी शोका हो ॥ गोरस खातां अपथ्य करितां कफवातानें खोका हो ॥१॥
आतां वोखद कैकयीचें अधरामृतरस चोखा हो ॥२॥
दरवेशाचें वानर जैसें म्हणुनी घेती फोकाहो ॥३॥
अझुनी वरि तर्ही रडे तीचा फाडुनी टाका रोखा हो ॥४॥
कामिनी कामुकसंगति खोडी ऐकुन त्या कोका हो ॥५॥
उदरा आलें ब्रह्मसनातन नाम तयाचें धोका हो ॥६॥
सिंहासनीं रघुवीरा बसतां संमत होतें लोका हो ॥८॥
रामउपासक परधन वनिता मानिती विषया बोका हो ॥९॥
पोपट गंगारामासाठीं पोसिला जो बोका हो ॥१०॥
पांचभौतिक पिंजर्याला पाडिल तो कीं भोका हो ॥११॥
तप्त लोहावरी जैसा पडत घणाचा ठोका हो ॥१२॥
ऐसें कळलें जेव्हां तेव्हां देहा भलतें हो काहो ॥१३॥
मध्वमुनीश्वर दिव्य कवीश्वर वर्णित पुण्यश्लोका हो ॥१४॥
पद ४४ वें
कैकयीनंदन आला । अंतरीं व्याकुळ झाला ॥ नगरी देखोनि भ्याला । म्हणे पडला मोठा घाला ॥१॥
जननी म्हणे त्या तनया । उतरुनी आला सीण या ॥ देखुन तुझ्या विनया । रायें केलें सुनया ॥२॥
हरत म्हणे वो आई । जळो तुझी खाई ॥ केलें हें तां काई । माझा अंतरविला भाई ॥३॥
तूं नव्हेसी माझी माता । केलें पतिच्या घाता ॥ अहारे दशरथताता । नाहीं निरविलें रघुनाथा ॥४॥
भावांत कल्पुनी भेदा । अपमानुनिया वेदां ॥ कारण जालीस खेदा । तुझ्या करितों शिरच्छेदा ॥५॥
भरत घरामधें लोळे । उदकें भरले डोळे ॥ सानुज अंतरीं पोळे । तेव्हां सद्गुरु । घन त्या वेळे ॥६॥
वसिष्ठ म्हणे रे भरता । दशरथ गेला वरता ॥ विचार पाहणें तरता । त्याची सद्गति करणें तरी तां ॥७॥
मध्वमुनीश्वर नामा । आणिन मंगलधामा । भरता होय रिकामा । तुजला भेटवितों श्रीरामा ॥८॥
पद ४५ वें
कौसल्येच्या सदना आला । भरत शोकें व्याकुळ जाला । आंगणांत ॥१॥
राममाता देखुनी दृष्टी । धाउनियां घाली मिठी । कंठदेशीं ॥२॥
रडे मोकालुनी धाय । म्हणे रामा हाय हाय । काय करूं ॥३॥
तुजविण जालों परदेशी । फिरोनि गांवासि कधीं येसी । हें कळेना ॥४॥
क्षणभंगुर संसार । येथें आहे येक सार । नाम तुझें ॥५॥
सद्गुरुचरणीं ठेवुनी हात । म्हणे हें मी नेणें मात । कैकयीची ॥६॥
भरता झाला अनुताप । वदे गुरुहत्येचें पाप । मज लागो ॥७॥
हें मज नाहीं संमत । पापीण हे उन्मत्त । फार जाली ॥८॥।
इची आतां करितों हत्या । ऐसी कामा नये कृत्या । सूर्यवंशीं ॥९॥
कौसल्येनें धरिला पोटीं । म्हणे धैर्य धरुनी घोटी । शोकसिंधु ॥१०॥
परिहारा नलगे देणें । आतां समाचार घेणें । राघवाचा ॥११॥
सुकुमार रामा माझा । सीतेसहित वनवासा । धाडियला ॥१२॥
मागें रायें दिधला प्राण । अनर्थासी मूळ जाण । माय तुझी ॥१३॥
तुझ्या हृदयीं नाहीं कपट । राहसी मध्वनाथानिकट । जाणतें मी ॥१४॥
पद ४६ वें
जानकीरमणा रामा । श्रीरामा राम रामा ॥ध्रु०॥
रामा पतितपावननामा । अवाप्तपूर्ण कामा ॥ परिस मंगलधामा । संगें नेरे आम्हां ॥१॥
रामा प्राणाचा तूं प्राण । जिवलग आत्मा जाण ॥ तुजविण नको अन्न । वाहातो तुझी आण ॥२॥
रामा तुजविण अवघें भाग्य । लावीन त्याला आग ॥ जालें हें वैराग्य । हेंचि मजला श्लाघ्य ॥३॥
रामा मध्वमुनीला आज । नलगे त्रिभुवनराज्य ॥ आलों याला वाज । आम्हाला नवाज ॥४॥
पद ४७ वें
कनकमृगामागें श्रीराम लागे ॥ध्रु०॥
पंचवटीमध्यें देखुनी त्यासी । कंचुकी जानकी मागे ॥१॥
गोदातटाकीं भक्त जटायु । पर्णकुटीपुढें जागे ॥२॥
गुंफेचें रक्षण करी सुलक्षण । सेवेंत लक्ष्मण वागे ॥३॥
मध्वमुनीश्वस्वामिस स्तवितां । रसना शेषाची ते भागे ॥४॥
पद ४८ वें
जनस्थानीं गोदातटीं । पाहा धन्य पंचवटी ॥ जेथें उभा जगजेठी । ज्याला चिंती धूर्जटी ॥१॥
मांडुनी दिव्य ठाण । हातीं घेऊनी धनुर्बाण ॥ हरिले राक्षसांचे प्राण । छेदुनी शूर्पनखेचें घ्राण ॥२॥
वामभागीं जगन्माता । जे करवी दानवघाता ॥ दक्षिणभागीं लक्ष्मण भ्राता । मध्यें त्रैलोक्याचा त्राता ॥३॥
सफळ तयांचे नेत्र । जे पाहाती ऐसें क्षेत्र ॥ मध्वनाताचें चरित्र । ऐकुनी होती पवित्र ॥४॥
पद ४९ वें
चिंतावा श्रीरघुवीर ॥ध्रु०॥
नासिक त्रिंबक नगर मनोहर । पावन गंगातीर ॥१॥
पंचवटीमधें पर्णकुटी करी । सेउनि राहे नीर ॥२॥
मधुर हरीच्या नामाविरहित । न रुचे साकर खीर ॥३॥
लौकिक लज्जा सांडुनी अवघी । पांघर भगवी चीर ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो रामीं । चित्त करावे स्थीर ॥५॥
पद ५० वें
माशुक माशुक तेरे सुरतपर हम आशक ॥ध्रु०॥
तनधन छांडू बनबन धुंडूं । दिल दिवाना लाशक ॥१॥
तिंअर जाऊं गंगा न्हाऊं । शहर न छांडूं नाशक ॥२॥
मध्वमुनीश्वर हरदम जपता । नाम गुरूका मा शुक ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2017
TOP