श्रीरामाचीं पदें - पद १ ते १०
भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला
१ रामजन्माचीं पदें
अवतरला रघुपति जैं । आनंदली वसुधा तैं । गंधर्ववनिता मध्यान्हसमयीं । मंगल घोषें थैं थैं ॥१॥
याचक वांछावल्या । साफल्या त्या फुलल्या । प्रसूत झाल्या श्रीकौसल्या । सरिता वाहती अमृततुल्या ॥२॥
क्षीराब्धीसम वाडे । सुरतरूंचीं फुलझाडें । आंगणीं कुंकुमकेशरसडे । गुढिया मखरें चहूंकडे ॥३॥
वाजंत्र्यांचे जोडे । वाजती द्वारापुढें । अरुंधती बाळंतिणीकडे । वाटितसे बोळविडे ॥४॥
पाहुनी राममुख । राजा पावे सुख । जयजयकारें ब्रह्मादिक । गर्जती, त्रिभुवनी कोंदला हरिख ॥५॥
ऋषिश्रृंगाकारनें । पूजुनियां सन्मानें । गजरथ तुरंगादिक गोदानें । राजा वाटी समाधानें ॥६॥
देवाधर्मासाठीं । येवढी करणें आटाटी । मुक्तीच्या मस्तकीं देऊनि पाटी । मध्वमुनीश्वर साकरःवाटी ॥७॥
पद २
पाहूं चला सावळा राम डोळां । समाधानें बोलती बारासोळा । रत्नताटीं हातवे दीपमाला । घेउनी बुंथी चालती चमकत बाळा वो ॥१॥
कृष्णावेणी चंद्रभागा भीमरथी । ताम्रपर्णी नर्मदा सरस्वती । गंगा यमुना तापी शरयू भागीरथी । या हेलकरणी सुगंधें पाणी भरिती वो ॥२॥
वाजत गाजत मिरवत आल्या राजद्वारा । म्हणती कौसल्या तूं धन्य राजदारा । अंकीं खेळविसी धणीवरी जगदाधारा । पायांवरी न्हाणसी दीनोद्धारा वो ॥३॥
करतळकमळें कोमळ जावळ कुरवाळिसी । अंजन घालुनी निरंजना न्याहाळिसी । जांभई देतां चुंबन चुटकें चाळविसी । शतंजीव शिंकतां आळविसी वो ॥४॥
क्षीराब्धीचा जांवई श्रीधर भूप । नित्य वत्सास पाजिसी दूध तूप । पाळण्यांत निजविसी सुखरूप । स्तन्य पाजुनी लुटिसी सुख अमूप वो ॥५॥
म्हणती भाग्याचा होईल सूर्यवंशीं । परमात्मा अवतरला पूर्ण वंशीं । सनकादिकीं वंदिजे परमह्म्सीं । म्हणती कौसल्ये तूं माउली पोटहिंबसी वो ॥६॥
रामजन्म ऐकुनी रावण रात्रीं कष्टी । सुर्वर विमानींहुनी करिती पुष्पवृष्टी । ब्रह्मानंदें कोंदली अवघी सृष्टि । मध्वनाथास पाहिलें कृपादृष्टी वो ॥७॥
पद ३
धन्य दशरथ राजा दशरथ ॥ध्रु०॥
ज्याचें पोटीं उपजला राम त्रैलोक्यनाथ ॥१॥
मध्वनाथ म्हणे ज्याचे पूर्ण जाले मनोरथ ॥२॥
४ पद
दशरथाघरीं आनंद होतोहे भारी ॥ध्रु०॥
नानावाद्यें वाजताती नृत्यांगना नाचताती । सप्तस्वरें आळविती । थैय्यमानें तालधारी ॥१॥
चैत्रमासीं गुणरासी । रामनवमीचे दिसीं । मध्वनाथ म्हणे माझा प्रगटला सहकारी ॥२॥
५ पद
दशरथराजके द्वारें ॥ध्रु०॥
ताल पखावज ढोल बजंतर वाजत धों धों नगारे ॥१॥
चंग उपांग रबाब मनोहर । करणे भेरी तुतारे ॥२॥
कंचनी रामजनी नत धुंडी । ठाकुर आये दौरे ॥३॥
अंदर महलमे गावत तरुणी । शंकरमानसपारे ॥४॥
कहत है माधोनाथ गुसाई । राघोजी बलहारे ॥५॥
६ रामाचा रात्रवर्ग ( चामर वृत्त )
शैव शाक्त आगमोक्त मोहबीज वर्जिती । ब्रह्मनिष्ठ अग्निहोत्रि काम्यधर्म वर्जिती । रात्रिवर्ग तो म्हणोनि रामचंद्र शिक्षिता । बूतपूतनादिकांस काळरूपि भक्षिता । शुद्ध सात्विकांसि राम सर्वकाळ रक्षिता । त्यास व्यास वाल्मिकादि देति मंत्रअक्षता ॥२॥
इंद्रचंद्रमाविरंचि पंचमीस सेविती । पंचक्रोश वंचुनी सुधारसास जेविती । जन्ममृत्यु सांडुनी अखंडरूप नीवती । ते असो प्रसन्न मायलेंकरांसि जीवती ॥३॥
इष्ट कामदायिनी अरिष्टसर्व नाशिनी । षष्ठि देवता वरिष्ठ पूजिती सुवासिने । गाति नारदादि सिद्ध शारदादि कामिनी । धन्य आजि रामजन्म पुण्यरूप यामिनी ॥४॥
धन्यदन्य सूर्यवंश पुण्यवंत दंपती । बारसें करूनि नाम राम ठेवि भूपती । रामचंद्र देखतांच कोटि काम लोपती । रावणास प्राणनाश सर्व देव कोपती ॥५॥
ब्रह्मपुत्र श्रीवसिष्ठ शिष्ट सर्व हर्षती । कौशिकासि पुष्टि फार पुष्पभार वर्षती । दुष्त दैत्य कष्टताति तुष्ट होति दिक्पती । मध्वनाथ रामदास नाचताति जुत्पती ॥६॥
धर्म अर्थ काम मोक्ष ऐक्यता सुलक्षणा । शंखचक्र शेषविष्णु साम्य रामलक्ष्मणा । सद्गुरूस पूजुनी करूनियां प्रदक्षिणा । मध्वनाथ वांटतो सुवर्णपुष्प दक्षिणा ॥७॥
७ पद रामाचे पाळणे
येगे येगे गाई येगे गाई । माझ्या रामाला दूध देई । बहू नवसाची हे सामाई माझी रामाबाई ॥१॥
भरत सुलक्षण सुंदर लक्ष्मण । शत्रुघ्नासम पाही । बहुत गुणाची धार्जिणी आली घेउनि तीघे भाई ॥२॥
भक्तजनाची सीतळ छाई । म्हणवीते जलशायी । सुरवर किन्नर विधि हर तुंबर लागती जीचे पाईं ॥३॥
अगणित गुण वर्णुं मी काइ । इजला उपमा नाहीं । मध्वमुनीश्वर म्हणतो याला आहेत चौघे गाही ॥४॥
८ पद
जय जय दीनदयाळा । निज बाळा जो जो ॥ध्रु०॥
रत्नजदित मुगुट जाण । त्याला जडिलें पिंपळपान । त्यासि देखुनी चंद्रसूर्य लाजो ॥१॥
वनमाला वैजयंती । वाहिली जे भाग्यवंती । तेथें जीवती वाघनखें साजो ॥२॥
करारविंदें पदारविंदा । मुखरविंदींघालितां । चरणीं बाळे वाकीं रुणझुण वाजो ॥३॥
सत्रावी जे कामधेनु । तिचा महिमा काय वानूं । तेचि येउनि बाळा दूध पाजे ॥४॥
मध्वनाथा आळवितें । पाळणा मी हालवितें । पतितपावन बिरुदावलि साजो ॥५॥
९ पद
राघोबाच्या मुखा । कौसल्या देते मुका ॥ अमृताचा रस फिका । रामकथारस निका ॥ बाळबोध करुनी टीका । व्यास पढवितो शुका ॥१॥
लेंकुरबाळी आळवीते । जावळासी कुरवाळिते । मध्वनाथ म्हणे तिच्या । पार नाहीं सुखा ॥२॥
१० पद
माझें अचडें बचडें छकडें वो ॥ध्रु०॥
विकसितपंकजलोचन त्याला । जननी म्हणते चिपदें वो ॥१॥
त्रिभुवनपाळा बाळांत्यासें । पांघरवी जे लुगडें वो ॥२॥
मध्वमुनीश्वर खेळवी अंकीं । ब्रह्मसनातन उघडें वो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2017
TOP