संस्कृत सूची|पूजा विधीः|षोडशसंस्कारः|
प्रस्तावना

षोडशसंस्कारः - प्रस्तावना

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे. म्हणून प्रत्येक संस्कारात काय वैशिष्टय आहे यांची पूर्वकल्पना असणें अत्यंत आवश्यक असते. संस्कार म्हणजे शास्त्रोक्त विधि, उपनयनविवाहादि संस्कारांच्या आरंभीं ‘ देवप्रतिष्ठा ’ असते. यामध्यें श्रीगणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, मंडपदेवताप्रतिष्ठा हे विधि येतात.
(१) गणपति पूजन -- प्रारंभीं त्या त्या संस्काराविधीतील देवगणांचा प्रमुख म्हणून गणपतिपूजन असते. संकल्पित कार्य निर्विघ्नपणे पार पडावे हा मुख्य उद्देश.
(२) पुण्याहवाचन -- पुण्यं अह: = पुण्यकारक ( सणासारखा ) दिवस व्हाव या उद्देशाने केलेले वाचन ( ब्राह्मनांनीं दिलेले आशिर्वाद ) हा मुख्य विधि यांमध्यें असतो. यामुळें तो दिवस सणासारखा संस्कारकर्त्याला व संस्कार्याला होत असतो. दसरा दिवाळी हे जसे धार्मिक सण, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे जसे राष्ट्रीय सण तसाच ज्याचे शुभ कार्य आहे त्याला व्यक्तिगत तो दिवस पुण्याह वाचनानें सणासारखाच होत असतो. स्वस्तिवाचन, समृद्धिवाचन याचप्रमाणें होत.
(३) मातृकापूजन -- ह्यामध्यें कुलदेवतांचे पूजन असते. शुभकार्यारंभीं पुण्यकारक दिवस झाल्यानंतर कुलदेवतापूजन सपरिवार यांमध्यें केले जाते. प्रत्येक कुलाची विशिष्ट देवता असते. तिच्या पूजेमुळे आपले व आपल्या कुळाचे कल्याण होते.
(४) नांदीश्राद्ध -- मंगलकार्यांमध्यें आपले दिवंगत वाडवडिल सूक्ष्म रूपानें उपस्थित होत असतात. त्यांचीहि पूजा, सत्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळविणें हा या विधीतील मुख्य उद्देश आहे. नांदी म्हणजे मंगलकार्य त्यावेळी केले जाणारे श्राद्ध म्हणून याला नांदीश्राद्ध असे म्हणतात.
(५) मंडपदेवताप्रतिष्ठा -- ज्या मंडपांत शुभकार्य होणार असते त्या मंडपाची पूजा, ससूत्र आम्रपल्लवावर मंडपदेवतेचे आवाहन करून ह्या मंडपदेवतांची प्रतिष्ठा ( स्थापना ) करण्यांत येते. सांप्रत कार्यालयांत जरी कार्य असले तरी मंडप समजून हा विधि केला जातो. देवकोत्थापन ( देवताविसर्जन ) व मंडपोद्वासन ( मांडाव परतणे ) हे विधि शुभकार्य पार पाडल्यानंतर काळजीनें अवश्य करावे लागतात. आवाहनाइतकेच विसर्जन ( निरोप देणें ) महत्वाचे असते.
आतां षोडशसंस्कार कोणकोणते आहेत. त्यांचा उद्देश काय व त्यामध्यें प्रमुख विधि कोणता आहे. हें क्रमाने माहित असणें आवश्यक आहे.
१. गर्भाधान संस्कार - बीजसंबंधी अथवा गर्भसंबंधी जें अदृष्ट ( एन: ) विघ्नकारक पाप असते तें दूर व्हावे यासाठीं हा संस्कार आहे.
२. पुंसवन संस्कार - ( पुंस: सवनं ) पुत्राचा जन्म व्हावा या उद्देशानें हा संस्कार सांगितलेला आहे. उडीद, दही, यव यांचे प्राशन यांमध्यें सांगितले आहे.
अनवलोभन संस्कार - गर्भाची स्थिरता व्हावी. यासाठीं हा विधि आहे. या संस्कारांत गर्भाच्या चिरंजीवित्वासाठी दूर्वारससेचन वधूच्या दक्षिणनासिकापुटांत करतात व विष्णु देवतात्मक हवन करावे लागते. हा विधि पुंसवन संस्काराबरोबरच करतात.
३. सीमन्तोन्नयन संस्कार -- सीमंत: = केश, उन्नयनम् = विंचरणें. गर्भाची मेंदूशक्ति वाढावी यासाठीं पतीनें दोन उंबराची फ़ळे असलेला देठ व तीन पांढरे ठिपके असलेला सायाळाचा काटा व तीन दर्भ हे सर्व एकत्रित हातांत घेऊन त्यांनीं पत्नीचे केश विंचरावे लागतात. हे पत्नीचे मस्त्कावरून फ़िरवितात. म्हणून यांस सीमन्तोन्नयन असे म्हणतात.
४. जातकर्म संस्कार -- ( जातस्य कर्म ) मुलगा जन्मल्याबरोबर करावयाचा विधि याला जातकर्म संस्कार म्हणतात. या विधीत सुवर्णशलाका मध व तूप यामध्ये उगाळून ते चाटण बालकाला प्राशन करवितात. नंतर ती सुवर्णशलाका मुलाचा कर्णवेध करून मुलाचे कानामध्ये स्मरणशक्ति वाढावी म्हणून घालतात.
५. नामकरण संस्कार -- मुलांचे नांव ठेवणें - नांवे ४ प्रकारचे आहेत.
(१) कुलदेवताभक्तनाम - जी कुलदेवता असेल तिचा भक्त म्हणून पहिले नांव
(२) मासनाम - ज्या महिन्यांत जन्म झाला असेल त्या महिन्याचे दुसरे नांव
(३) नाक्षत्रनाम - जन्मनक्षत्राचे आद्याक्षर असलेले तिसरें नांव
(४) लौकिकनाम - व्यवहारासिद्धीसाठी ठेवलेले चवथें नांव. हे नांव फ़क्त व्यवहारांत प्रसिद्ध असते. बाकीची नांवे गुप्त असतात. नामकरण संस्कारामुळे आयुष्यवृद्धि - लौकिकसंपादन व प्रतिष्ठा प्राप्त होते.
६. निष्क्रमण संस्कार -- मुलाला घराबाहेर नेणें. त्याची मानसिक, शारिरिक शक्ति वाढावी, आयुष्य वाढावे ह्या उद्देशानें देवतादर्शन घडवितात, हा मुख्य विधि, देवतादर्शनामध्ये सूर्य - चंद्र - अग्नि - गाय - दिक्पाल जवळचे वडिल नातेवाईक सर्वजण येतात. त्यांचे दर्शन - पूजन करणे हा विधि.
७. अन्नप्राशन संस्कार -- आयुष्य वाढावे शारिरिक शक्ति वाढावी म्हणून सुवर्णयुक्त हातानें मुलाला अन्नप्राशन करविणे.
८. चौलसंस्कार -- हा संस्कार उपनयनाल जोडूनच करतात. चूडा = शेंडी ठेवण्याचा संस्कार. चौल = वपन क्रिया - बालकाचे आयुष्य वाढावे. ब्रह्मतेज प्राप्त व्हावे यासाठीं हा विधि आहे.
वपन झाल्यानंतर बालकाला द्वितीय स्नान घालून आईच्या मांडीवर जेऊं घालता. याला ‘ मातृभोजन ’ असे म्हणतात. सांप्रत चौल हे उपनयन संस्काराचे पूर्वाङ्न झालेले आहे. वास्तविक हा संस्कार वयाचे ५ वे वर्षी करावा लागतो. वरील सर्व संस्कार यथायोग्यकाली झाले नसल्यास प्रायश्चित विधि आहुतीरूपाने अथवा द्रव्यरूपाने उपनयनसंस्काराचे वेळी करावा लागतो.
९. उपनयन संस्कार -- हा संस्कार प्रमुख असल्यानें या संस्कारांत प्रामुख्यानें येणारे विधि - चौलहोम. मातृभोजन व उपनयनाङ्गभूत वपन झाल्यावर स्नान करून देवदर्शन झाल्यावर गायत्रीचा उपदेश करण्यासाठी आचार्यांच्याजवळ ( उप ) नेणे ( नयन ) म्हणून याला ‘ उपनयन ’ असे म्हटले आहे. यामध्यें कटिसूत्र, कौपीनधारण, द्वितीयजन्मसूचक ( द्विजत्वसिद्धि ) वस्त्रप्रावरण अजिनधारण - यज्ञोपवीतधारण करवितात. प्रधान होम करून शिष्यत्व सिद्धीसाठीं अंजलिक्षारण, हस्तग्रहण, सूर्यावेक्षण, हृदयालंभन अग्न्युपस्थान हे विधि आहेत. नंतर गायत्रीचा उपदेश, मुञ्जा नांवाची दोरी कंबरेला कटिबद्धतेसाठी बांधतात. म्हणून मौंजीबंधन असे म्हणतात. मेधा ( दैवी स्मरणशक्ति ) वाढावी म्हणून मेह्दजनन ( पळसोला ) हा विधि करावा लागतो. वेदाध्ययनाला उपनयनापासून आरंभ होत असल्याने वेदव्रत ग्रहणसूचक व्रतबंध असेहि याला म्हणतात. वेदाध्ययनाचा अधिकार उपनयनामुळे प्राप्त होतो. व मनुष्याला द्विजत्व प्राप्त होते. म्हणून हा संस्कार सर्व संस्कारात प्रमुख मानला आहे.
१०. महानाम्नी, ११. महाव्रत १२. उपनिषदूव्रत हीं ‘ वेदव्रते ’ आहेत गुरुजींजवळ राहून षडङ्ग वेद, उपनिषदे यांचा अभ्यास करावयाचा असतो.
१३. गोदान -- सांग वेदाध्ययन होत नसल्यामुळे सांप्रत याबद्दल फ़क्त प्रायश्चित विधि केला जातो. यालाच केशांत ( स्नान ) असे म्हणतात - वेदव्रत पूर्ण झाल्याचे प्रतीक स्नान करावे लागते. यावेळीं गुरुजींना गाय व बैल दक्षिणा देतात.
१५. समावर्तनसंस्कार -- ( सोडमुंज ) द्वितीयाश्रम स्वीकारण्याकरितां गुरुजींची अनुज्ञा घेणें. उपनयनाप्रमाणेंच सर्व विधि असून शेवटी गृहस्थाश्रमोपयोगी उपदेश केला जातो.
१६. विवाह्संस्कार -- ‘ धर्मप्रजासंपत्ति: प्रयोजनं विवाहस्य ’ ब्राह्मविवाहाचा स्वीकाराचा संस्कार असल्याने हा सामाजिक संस्कार आहे. सर्व समाजांचा या संस्काराशीं संबंध येतो. किंबहुना विवाह म्हणजे एक सामाजिक संमेलनच असते. यांत येणारे मुख विधि.
(१) वाग्दानं ( वाङनिश्चय ) सर्वांच्या संमतीनें मुलासाठीं मुलीला मागणी घालणे व वधूपित्यानें ‘ वाणीने दिली ’ असे म्हणणे याला ‘ वाग्दान ’ असे म्हणतात. म्हणजेच वाणीद्वारा निश्चय जाहीर केला जातो. यावेळीं प्रतीक म्हणून वधूचीवरपक्षीयाकडून वस्त्रालंकारांनीं पूजा केली जाते. (२) सीमान्तपूजन - वधूपक्षानें वस्त्रालंकारांनीं वराचे व वरपक्षीयांचे पूजन करणें. पूर्वी हे पूजन गांवाच्या सीमेवर होत असे. (३) मधुपर्क - विवाहासाठीं आलेल्या वराचे पूजन, पाय धुणे मधयुक्त दहि देवतांना अर्पण करणे. (४) गौरहरपूजा - सौभाग्यप्राप्तीसाठी गौरीहराचे वधूकडून पूजन करविणें. (५) मंगलाष्टकं - मंगलाष्टकपूर्वक सुमूहूर्तावर वरानें व वधूने परस्परांना पुष्पमाला घालून वरणें. (६) कन्यादान - यांमध्यें शपथविधि असतो. वधूचे मातापिता वराचे हातावर पानी सोडून कन्येची प्रार्थना करतात. कन्यादानामुळे पृथ्वीदानाचे पुण्य लाभते. कुलाचा उद्धार होतो व मोक्ष मिळतो. अक्षतारोपण व सूत्रवेष्टन - परस्परांच्या परस्परापासून अपेक्षा - व्यक्त करणें मंगलसूत्रबंधन - सौभाग्यचिन्ह म्हणून मंगळसूत्र यावेळीं वधूला पतीच्या हातानें बांधतात. व वेष्टित सूत्रानें कंकणबंधन करतात. (७) विवाहहोम - वधूला आर्यात्व येण्यासाठी हवन, पाणिग्रहण - लाजहोम - परिणयन ( अग्निप्रदक्षिणा ) अश्मारोह ( स्थिरतेसाठीं ) सप्तपदी ( सखापदप्राप्तिसाठीं ) (८) गृहप्रवेशनीय होम - गृहस्थाश्रमसिद्धीसाठीं गृह्याग्नीची स्थापना. हाच अग्नि अंत्येष्टीपर्यंत कायम ठेवावा लागतो. सांप्रत अनुसंधानविधि त्याबद्दल करतात. (९) चतुर्थीदिनकृत्य - समारोप, वधूची पाठवणी. (१०) गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन - वराने आपल्या घरी येऊन पत्नीस्वरूप लक्ष्मीचे पूजन करावयाचे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP