मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
सपिंडीकरण

तृतीय परिच्छेद - सपिंडीकरण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां सपिंडीकरण सांगतो -

अथसपिंडीकरणं माधवीयेहारीतः यातुपूर्वामावास्यायामृताहाद्दशमीभवेत् सपिंडीकरणंतस्यांकुर्यादेवसुतोग्निमान् मृताहादूर्ध्वंदशमीएकादशीत्यर्थः सपिंडीकरणंकुर्यात्पूर्ववच्चाग्निमान्सुतः परतोदशरात्राच्चेत्कुहूरब्दोपरीतरइतिकार्ष्णाजिनिस्मृतेः आहिताग्नेस्तेनविनाश्रौतपिंडपितृयज्ञासिद्धेः तदाह गालवः सपिंडीकरणात्प्रेतेपैतृकंपदमास्थिते आहिताग्नेः सिनीवाल्यांपितृयज्ञः प्रवर्तते मदनरत्नेप्रजापतिः नासपिंड्याग्निमान्पुत्रः पितृयज्ञंसमाचरेत् अपरार्केकात्यायनः एकादशाहंनिर्वर्त्यपूर्वंदर्शाद्यथाविधि प्रकुर्वीताग्निमान्विप्रोमातापित्रोः सपिंडतां आशौचांतप्रथमदर्शयोर्मध्येकस्मिंश्चिदह्नीत्यर्थः पित्रादीनां सपत्नीकानांदेवतात्वेनमातुरपिप्राग्दर्शात्सपिंडनंयुक्तमित्यपरार्कः एवंपितामहादेरपिसपिंडनंप्राग्दर्शात्कार्यं तेनविनापार्वणायोगात् द्वादशाहेवाकार्यम् साग्निकस्तुयदाकर्ताप्रेतश्चानग्निमान्भवेत् द्वादशाहेभवेत्कार्यंसपिंडीकरणंसुतैरितिगोभिलोक्तेः साग्नेः प्रेतस्यतुत्रिपक्षे प्रेतश्चेदाहिताग्निः स्यात्कर्तानग्निर्यदाभवेत् सपिंडीकरणंतस्यकुर्यात्पक्षेतृतीयकइतिसुमंतूक्तेः मदनरत्नेलघुहारीतोपि अनग्निस्तुयदावीरभवेत्कुर्यात्तदागृही प्रेतश्चेदग्निमांस्तुस्यात्र्त्रिपक्षेवैसपिंडनं द्वयोः साग्नित्वेद्वादशाहएव साग्निकस्तुयदाकर्ताप्रेतोवाप्यग्निमान्भवेत् द्वादशाहेतदाकार्यंसपिंडीकरणंपितुरितितेनैवोक्तेः ।

माधवीयांत हारीत - " जी अमावास्येच्या पूर्वींची आणि मृत दिवसाहून पुढची दशमी म्हणजे मृतदिवस धरुन अकरावी तिथि असेल त्या तिथीस अग्निमान् ( श्रौताग्नि धारण करणार्‍या ) पुत्रानें पित्याचें सपिंडीकरण करावें . " " अग्निमान् पुत्रानें मृतदिवसाहून दहा दिवसांचे पुढें अमावास्या असेल तर दहा दिवसांनंतर सपिंडीकरण करावें , इतरानें ( अनग्निकानें ) वर्षानंतर सपिंडीकरण करावें . " अशी कार्ष्णाजिनिस्मृति आहे , म्हणून अकराव्या दिवशीं सपिंडीकरण करावें . सपिंडीकरण केल्यावांचून आहिताग्नीचा श्रौत पिंडपितृयज्ञ सिद्ध होत नाहीं . तें सांगतो गालव - " सपिंडीकरणापासून प्रेताला पितृत्व प्राप्त झालें असतां आहिताग्नीचा अमावास्येस पितृयज्ञ प्रवृत्त होतो . " मदनरत्नांत प्रजापति - " अग्निमान् पुत्रानें सपिंडी केल्यावांचून पिंडपितृयज्ञ करुं नये . " अपरार्कांत कात्यायन - " अग्निमान् ब्राह्मणानें दर्शाच्या पूर्वीं एकादशाहकृत्य यथाविधि करुन नंतर मातापितरांचें सपिंडन करावें . " आशौचसमाप्तीचा दिवस आणि प्रथम दर्श यांच्यामध्यें कोणत्याही दिवशीं सपिंडन करावें , असा अर्थ समजावा . पिंडपितृयज्ञांत पित्रादिक सपत्नीक देवता असल्यामुळें मातेचेंही दर्शाच्या पूर्वीं सपिंडीकरण युक्त आहे , असें अपरार्क सांगतो . याप्रमाणें पितामहादिकांचेंही दर्शाच्या पूर्वीं सपिंडन करावें . कारण , पितामहावांचून पार्वण होत नाहीं . अथवा बाराव्या दिवशीं सपिंडन करावें . कारण , " जेव्हां कर्ता अग्निमान् असेल आणि प्रेत अग्निरहित असेल त्या वेळीं बाराव्या दिवशीं पुत्रांनीं सपिंडीकरण करावें " असें गोभिलवचन आहे . साग्निक प्रेताचें तर तिसर्‍या पक्षांत करावें . कारण , " ज्या वेळीं प्रेत आहिताग्नि ( श्रौताग्निमान् ) असून कर्ता अग्निरहित असेल त्या वेळीं त्याचें सपिंडीकरण तिसर्‍या पक्षीं कराचें " असें सुमंतुवचन आहे . मदनरत्नांत लघुहारीतही - " ज्या वेळीं गृहस्थाश्रमी कर्ता अग्निरहित असेल आणि मृत झालेला अग्निमान् असेल त्या वेळीं त्याचें सपिंडीकरण तिसर्‍या पक्षीं करावें . " दोन्ही अग्निमान् असतील तर बाराव्या दिवशींच करावें . कारण , " ज्या वेळीं कर्ता अग्निमान् आणि प्रेतही अग्निमान् असेल त्या वेळीं त्या मृतपित्याचें सपिंडीकरण बाराव्या दिवशीं करावें " असें त्यानेंच सांगितलें आहे .

द्वयोरनग्निमत्त्वेतुभविष्ये सपिंडीकरणंकुर्याद्यजमानस्त्वनग्निमान् अनाहिताग्नेः प्रेतस्यपूर्णेब्देभरतर्षभ द्वादशेहनिषण्मासेत्रिपक्षेवात्रिमासिवा एकादशेपिवामासिमंगलस्याप्युपस्थितौ कात्यायनगोभिलौ यदहर्वावृद्धिरापद्येतेति तच्चवृद्धिदिनेएवेतिवाचस्पतिः तन्न प्रातर्वृद्धिनिमित्तकमितिनियमात्सपिंडनस्यचापराह्णकालीनत्वेनपूर्वत्वबाधापत्तेः वृद्धिदिनेतत्पूर्वदिनेवेतिश्रीदत्तः स्मार्तगौडस्तुवृद्धिपूर्वः वर्षांत्यश्चक्षणः सपिंडनस्यप्रेतत्वनाशेसहकारी तेनपरेद्युर्विघ्नाद्वृद्ध्यभावेपितत्कर्तव्यतानिश्चयसहितमेवकालांतरक्रियमाणवृद्धिपूर्वक्षणसहकृतंप्रेतत्वनाशकमित्याह तन्न अकालेकृतस्यफलाजनकत्वात् एतेननिमित्तनिश्चयवतएवाधिकारात् वृद्ध्यभावेपिनक्षतिरितिमिश्रोक्तिः परास्ता वृद्धिपूर्वदिनस्यचकालस्यांगत्वेननिमित्तत्वाभावात् तेनपुनः कार्यमित्यन्ये मदनरत्नेपुलस्त्यः निरग्निकः सपिंडत्वंपितुर्मातुश्चधर्मतः पूर्णेसंवत्सरेकुर्याद्वृद्धिर्वायदहर्भवेत् चतुर्विंशतिमते सपिंडीकरणंचाब्देसंपूर्णेभ्युदयेपिवा द्वादशाहेतुकेषांचिन्मतंचैकादशेतथा ।

दोघे अग्निरहित असतील तर सांगतो भविष्यांत - " यजमान ( कर्ता ) अग्निरहित असून प्रेत अग्निरहित असेल त्या वेळीं त्याचें सपिंडीकरण पूर्ण वर्षांतीं करावें . अथवा बाराव्या दिवशीं किंवा सहाव्या मासीं अथवा तिसर्‍या पक्षीं किंवा तिसर्‍या मासीं , अथवा अकराव्या मासीं किंवा मंगलकार्य उपस्थित असतां सपिंडीकरण करावें . " कात्यायन गोभिल - " अथवा ज्या दिवशीं वृद्धिश्राद्ध प्राप्त होईल त्या दिवशीं करावें . " तें वृद्धिप्रयुक्त सपिंडीकरण वृद्धिदिवशींच करावें , असें वाचस्पति सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , वृद्धिश्राद्ध प्रातः कालीं करावें , असा नियम असल्यामुळें व सपिंडीकरणाचा अपराह्णकाल असल्यामुळें सपिंडीकरण पूर्वीं झालें पाहिजे , त्याचा बाध होईल . वृद्धिश्राद्धदिवशीं किंवा त्याच्या पूर्व दिवशीं सपिंडीकरण करावें , असें श्रीदत्त सांगतो . स्मार्त गौड तर - सपिंडीकरणाला प्रेतत्वनाशरुप कार्य करण्याविषयीं वृद्धिकर्माचा पूर्वक्षण आणि वर्षाचा अंत्यक्षण हा सहकारी आहे . तेणेंकरुन , दुसर्‍या दिवशीं विघ्नाच्या योगानें वृद्धिकर्म झालें नाहीं तरी वृद्धिकर्म करावयाच्या निश्चयानें सहितच कालांतरीं होणार्‍या वृद्धीचा पूर्वक्षण प्रेतत्वनाशाविषयीं सपिंडनाला सहकारी होतो , असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , अकालीं केलेलें सपिंडन प्रेतत्वनाशरुप फल उत्पन्न करीत नाहीं . येणेंकरुन , निमित्ताच्या ( वृद्धिकर्माच्या ) निश्चयवंतालाच अधिकार असल्यामुळें वृद्धिकर्म जरी झालें नाहीं तरी दोष नाहीं . कारण , वृद्धिकर्माचा निश्चय आहे , असें मिश्राचें सांगणें खंडित झालें . कारण , वृद्धिपूर्वदिनरुप जो काल तो सपिंडीकरणाला अंग असल्यामुळें त्या पूर्वदिनरुप कालाचा अभाव असल्यामुळें सपिंडीकरणरुप कर्म अंगहीन झालें . त्यामुळें तें सपिंडीकरण पुनः करावें , असें इतर विद्वान् सांगतात . मदनरत्नांत पुलस्त्य - " निरग्निकानें पित्याचें व मातेचें सपिंडीकरण पूर्ण वर्षांतीं करावें . अथवा ज्या दिवशीं वृद्धिकर्म असेल त्या दिवशीं करावें . " चतुर्विंशतिमतांत - " सपिंडीकरण संपूर्ण वर्षाचे ठायीं करावें . किंवा आभ्युदयिक ( वृद्धिकर्म ) प्राप्त असतां करावें . कितीएकांचें मत बाराव्या दिवशीं , तसेंच अकराव्या दिवशीं सपिंडन करावें , असें आहे .

पृथ्वीचंद्रोदयेबौधायनः अथसपिंडीकरणंत्रिपक्षेवातृतीयेवामासिषष्ठेचैकादशेवाद्वादशेवाद्वादशाहेचेति एतत्प्रक्रमेविष्णुः मासिकार्थंद्वादशाहंश्राद्धंकृत्वात्रयोदशेह्निवाकुर्यान्मंत्रवर्जंहिशूद्राणांद्वादशेह्निसंवत्सराभ्यंतरेयद्यधिमासोभवेत्तदामासिकार्थंदिनमेकंवर्धयेदिति आशौचोत्तरंद्वादशस्वहः सुमासिकानितेष्वेवाद्यषष्ठद्वादशदिनेषूनमासिकादीनिकृत्वात्रयोदशेह्निसपिंडनंकुर्यात् अधिमासेतुचतुर्दशेह्निकुर्यात् शूद्रस्त्रयोदशेद्वादशेह्नीत्यस्यमासिकांत्यदिनपरत्वादितिपृथ्वीचंद्रः पैठीनसिः संवत्सरांतेसंसर्जनंनवमेमासीत्येके अत्रसाग्नेरनग्नेर्वोक्तकालाभावेत्रिपक्षादिसंवत्सराताअनुकल्पाज्ञेयाः कल्पतरुस्त्वग्रेवृद्धिनिश्चयएवसर्वेपकर्षप्रकराइत्याह तन्न यदहर्वेतिस्वातंत्र्यश्रुतेः यद्यपिवृद्धिनिमित्तोपकर्षोनिरग्नेरेवोक्तस्तथापिसाग्नावपिज्ञेयः उक्तकालासंभवेवर्षांतादिगौणकालवद्वृद्धेरपिप्राप्तेः वक्ष्यमाणगोभिलवचनात् अयातयामंमरणंनभवेत्पुनरस्यत्वितिदोषश्रुत्यविशेषाच्च अपरार्कपृथ्वीचंद्रादिस्वरसोप्येवं अत्रवृद्धिपदंचूडोपनयनविवाहमात्रपरम् सीमंतादौतुवृद्धिश्राद्धलोपएवेत्याचार्यचूडामणिः पुंसवनाद्यन्नप्राशनान्तेष्वावश्यकेष्वपकर्षइति श्राद्धविवेकः श्रुतिसागरेपिबृहस्पतिः प्रत्यवायोभवेद्यस्मिन्नकृतेवृद्धिकर्मणि तन्निमित्तंसमाकृष्य पित्रोः कुर्यात्सपिंडनं गर्भाधानस्यऋत्वंतरेपिसंभवात् अन्यश्राद्धंपरान्नंचगंधमाल्यंचमैथुनमितिदेवलेनप्रथमाब्देमैथुननिषेधाच्च नतत्रापकर्षइतिश्राद्धकौमुद्यादयः तन्न ऋतुस्नातांतुयोभार्यामितिनिषेधादब्रह्मचार्येवपर्वाण्याद्याश्चतस्रश्चवर्जयेदितिमैथुनेदोषाभावाच्च पितामहमरणेपौत्रस्यवृद्धौनापकर्षः तस्यमहागुरुत्वाभावात् तत्रतदूर्ध्वेभ्योवृद्धिश्राद्धमितिश्राद्धचंद्रिका तन्न भ्राताचेत्यादौतदभावेप्यपकर्षोक्तेः तेननिर्देशोप्युपलक्षणम् ।

पृथ्वीचंद्रोदयांत बौधायन - " आतां सपिंडीकरण तिसर्‍या पक्षीं , किंवा तिसर्‍या मासीं , अथवा सहाव्या मासीं , किंवा अकराव्या मासीं , अथवा बाराव्या मासीं , किंवा बाराव्या दिवशीं करावें . " सपिंडीकरणाचा उपक्रम चालला असतां सांगतो विष्णु - " बारा दिवस बारा मासिकश्राद्धें करुन तेराव्या दिवशीं करावें ; शूद्राचें मंत्ररहित बाराव्या दिवशीं करावें . संवत्सरामध्यें जर अधिक मास असेल तर मासिकाकरितां एक दिवस वाढवावा . " याचा अर्थ - आशौच समाप्तीनंतर बारा दिवस बारा मासिकें आणि त्यांत पहिल्या , सहाव्या व बाराव्या दिवशीं ऊनमासिक , ऊनषाण्मासिक व ऊनाब्दिक हीं करुन तेराव्या दिवशीं सपिंडन करावें . वर्षामध्यें अधिक मास असेल तर चवदाव्या दिवशीं सपिंडन करावें . शूद्रानें तेराव्या दिवशीं करावें . बाराव्या दिवशीं असें जें म्हटलें तें मासिकांच्या अंत्यदिवशीं असें आहे , असें पृथ्वीचंद्र सांगतो . पैठीनसि - " वर्षांतीं सपिंडीकरण होतें . नवव्या मासांत करावें , असें कितीएक सांगतात . " ह्या सपिंडीकरणाविषयीं साग्निकाला किंवा अग्निरहिताला वर सांगितलेल्या मुख्य कालांच्या अभावीं त्रिपक्ष इत्यादिक संवत्सरापर्यंत अनुकल्प ( कनिष्ठ ) काल जाणावे . कल्पतरु तर - पुढें वृद्धिकर्माचा निश्चय असतांच सारे अपकर्षप्रकार आहेत , असें सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , " अथवा ज्या दिवशीं वृद्धि प्राप्त होईल त्या दिवशीं सपिंडन अपकर्ष करुन करावें " असें कात्यायन गोभिल यांच्या वर सांगितलेल्या वचनावरुन वृद्धिनिमित्तक अपकर्ष स्वतंत्र सांगितला आहे . जरी वृद्धिनिमित्तक अपकर्ष निरग्निकालाच सांगितला आहे तरी तो साग्निकालाही जाणावा . कारण , वर सांगितलेल्या ( एकादशाहादि ) मुख्य कालाच्या असंभवीं वर्षांत इत्यादिक गौणकाल जसे साग्निकाला प्राप्त होतात तसा वृद्धिकर्मरुप कालही त्याला प्राप्त होतो . ते गौणकाल पुढें सांगावयाच्या गोभिलाच्या वचनावरुन साग्निकाला प्राप्त होतात . आणि " वृद्धिकर्म केल्यावर प्रेतश्राद्ध करुन मरण ताजें करुं नये " ह्या कात्यायनवचनानें वृद्धिश्राद्धानंतर प्रेतश्राद्ध केलें असतां मरण ताजें होतें , हा दोष निरग्निकालाच आहे असें नाहीं , तर साग्निकालाही आहे . अपरार्क , पृथ्वीचंद्र इत्यादि ग्रंथांचें स्वारस्यही असेंच आहे . ह्या अपकर्षप्रकरणीं ‘ वृद्धि ’ या पदानें चौल , उपनयन , आणि विवाह हीं तीनच संस्कारकर्मै समजावीं . सीमंतादि संस्कारांमध्यें तर वृद्धिश्राद्धाचा लोपच होतो . असें आचार्यचूडामणि सांगतो . पुंसवनादिक अन्नप्राशनांत आवश्यक संस्कारांमध्यें अपकर्ष करावा , असें श्राद्धविवेक सांगतो . श्रुतिसागरांतही बृहस्पति - " जें वृद्धिकर्म केलें नसतां प्रत्यवाय ( दोष ) उत्पन्न होईल त्या निमित्तानें मातापितरांचें सपिंडन अपकर्ष करुन करावें . " गर्भाधान इतर ( पुढील ) ऋतुदर्शनीं देखील होण्याचा संभव असल्यामुळें , आणि " इतराचें श्राद्धभोजन , परान्न , गंधमाल्यांचा उपभोग आणि मैथुन हीं करुं नयेत . " ह्या देवलवचनानें प्रथम वर्षांत मैथुनाचा निषेध केल्यामुळेंही त्या गर्भाधानाविषयीं सपिंडीचा अपकर्ष करुं नये , असें श्राद्धकौमुदी इत्यादि ग्रंथकार सांगतात , तें बरोबर नाहीं . कारण , " जो मनुष्य ऋतुस्नात भार्येप्रत संनिध असतां गमन करीत नाहीं त्याला भ्रूणहत्यादोष प्राप्त होतो . " या वचनानें मैथुन न करण्याचा निषेध आहे . आणि " पर्वदिवस व पहिल्या चार रात्री वर्ज्य करुन ऋतुकालीं गमन करणारा ब्रह्मचारीच असतो . " या वचनानें मैथुनाविषयीं दोषही नाहीं . पितामह मृत असून पौत्राला वृद्धिकर्म करावयाचें असतां त्याचे सपिंडीकरणाचा अपकर्ष होत नाहीं . कारण , तो पितामह महागुरु नाहीं . त्या ठिकाणीं ( पितामहमरणसमयीं ) त्या पितामहाच्या पूर्वीच्यांचें वृद्धिश्राद्ध करावें , असें श्राद्धचंद्रिकाकार सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , भ्राता मृत असतां , इत्यादि स्थलीं महागुरुचा अभाव असतां अपकर्ष सांगितला आहे . त्यावरुन महागुरुचा निर्देश केला तो पितामहादिकांचें उपलक्षण ( बोधक ) आहे .

व्याघ्रः आनंत्यात्कुलधर्माणांपुंसाचैवायुषः क्षयात् अस्थितेश्चशरीरस्यद्वादशाहः प्रशस्यते एतदाशौचांतोपलक्षणं सर्वेषामेववर्णानामाशौचांतेसपिंडनमितिनिर्णयामृतेकात्यायनोक्तेः सर्वेषामितित्रैवर्णिकपरं शूद्राणांत्वाशौचमध्ये मंत्रवर्जंहिशूद्राणांद्वादशेहनिकीर्तितमितिविष्णूक्तेः एतद्दर्शश्राद्धकारिशूद्रविषयमित्यपरार्केकल्पतरौच वृद्धमनुः द्वादशेहनिविप्राणामाशौचांतेतुभूभुजाम् वैश्यानांतुत्रिपक्षा दावथवास्यात्सपिंडनं ।

व्याघ्र - " सपिंडीकरण लवकर न केलें तर कुलधर्म अनंत आहेत त्यांना नड येईल म्हणून , आणि पुरुषांचे आयुष्याचा क्षय असल्यामुळें शरीर स्थिर नाहीं , म्हणूनही सपिंडीकरणाला बारावा दिवस प्रशस्त आहे . " बारावा दिवस प्रशस्त असें सांगणें हें आशौचसमाप्तीचें उपलक्षण ( बोधक ) आहे . कारण , " सार्‍याच वर्णांचें सपिंडन आशौचांतीं होतें " असें निर्णयामृतांत कात्यायनवचन आहे . ह्या वचनांत ‘ सर्वेषां ’ हें पद ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य ह्या तीन वर्णाचें बोधक आहे . शूद्रांचें तर आशौचामध्यें सपिंडन होतें . " कारण , " शूद्रांचें बाराव्या दिवशीं अमंत्रक सपिंडन सांगितलें आहे " असें विष्णुवचन आहे . हें वचन दर्शश्राद्ध करणार्‍या शूद्राविषयीं आहे , असें अपरार्कांत कल्पतरुंत सांगितलें आहे . वृद्धमनु - " अथवा ब्राह्मणांचें बाराव्या दिवशीं , क्षत्रियांचें आशौचांतीं , वैश्यांचें तिसर्‍या पक्षीं वगैरे सपिंडन होतें . "

निर्णयामृतेगोभिलः द्वादशाहादिकालेषुप्रमादादननुष्ठितं सपिंडीकरणंकुर्यात्कालेषूत्तरभाविषु इदंसाग्नेरुक्तकालासंभवेगौणकालविधानार्थमितिमदनपारिजातः मदनरत्नेप्येवं ऋष्यश्रृंगः सपिंडीकरणंश्राद्धमुक्तकालेनचेत्कृतं रौद्रेहस्तेचरोहिण्यांमैत्रभेवासमाचरेत् कालादर्शेपि एकादशेद्वादशेह्नित्रिपक्षेवात्रिमासिवा षष्ठेचैकादशेवाब्देसंपूर्णेवाशुभागमे सपिंडीकरणस्येत्थमष्टौकालाः प्रकीर्तिताः साग्नौकर्तर्युभावाद्यौप्रेतेसाग्नौतृतीयकः अनग्नेस्तुद्वितीयाद्याः सप्तकालामुनीरिताः रोहिणीरौद्रहस्तेषुमैत्रभेवापितच्चरेत् नारदसंहितायांतु सपिंडीकरणंकार्यंवत्सरेवार्धवत्सरे त्रिमासेवात्रिपक्षेवामासिवाद्वादशेह्निवेत्युक्तं वत्सरेतीतेज्ञेयम् ततः सपिंडीकरणंवत्सरात्परतः स्थितमितिभविष्योक्तेः पितुः सपिंडीकरणंवत्सरादूर्ध्वतः स्थितमितिनागरखंडोक्तेः पितुः सपिंडीकरणंवार्षिकेमृतिवासरेइत्युशनसोक्तेश्च पूर्णेसंवत्सरेपिंडः षोडशः परिकीर्तितः तेनैवचसपिंडत्वंतेनैवाब्दिकमिष्यतइतिहेमाद्रौवचनाच्च अस्यानाकरत्वोक्तिर्मूर्खोक्तिरेव यत्तु पूर्णेसंवत्सरेकुर्यात्सपिंडीकरणंसुतः एकोद्दिष्टंचतत्रैमृताहनिसमापयेदिति धवलनिबंधे जाबाल्युक्तेः पुत्रः सपिंडनंकृत्वाकुर्यात्स्नानंसचैलकम् एकोद्दिष्टंततः कुर्यात्कुतपंनविचारयेदिति स्वल्पमात्स्योक्तेश्चाब्दिकंतद्दिनेपुनः कार्यमितिकेचित् तेनिर्मूलत्वाद्धेमाद्रिविरोधाच्चोपेक्ष्याः षोडशत्वंचसपिंडनस्यषोडशश्राद्धांतर्भावपक्षे स्मृत्यर्थसारेतु वर्षांत्यदिनेसंवत्सरविमोक्षश्राध्दंसपिंडनंचकृत्वापरेद्युर्मृताहेवार्षिकंकार्यमित्युक्तं गौडाअप्येवमाहुः तत्पूर्वविरोधाच्चिंत्यम् ॥

निर्णयामृतांत गोभिल - " द्वादशाह इत्यादि कालांचे ठायीं प्रमादेंकरुन सपिंडीकरण राहिलें असतां पुढें सांगितलेल्या कालांचे ठायीं सपिंडीकरण करावें . " हें वचन साग्निकाला ( श्रौताग्निमंताला ) उक्तकालाचा असंभव असतां गौणकाल सांगण्याकरितां आहे , असें मदनपारिजात सांगतो . मदनरत्नांतही असेंच आहे . ऋष्यशृंग - " सपिंडीकरणश्राद्ध उक्तकालीं जर केलें नसेल तर आर्द्रा , हस्त , रोहिणी व अनुराधा या नक्षत्रांवर करावें . " कालादर्शांतही - " अकरावा दिवस , बारावा दिवस , तिसरा पक्ष , तिसरा मास , सहावा मास , अकरावा मास , वर्ष पूर्ण झाल्यावरचा दिवस , आणि इतर शुभदिवस , हे सपिंडीकरणाचे आठ काल सांगितले आहेत . अग्निमान् कर्ता असतां पहिले दोन काळ ; मृत झालेला अग्निमान् असतां तिसरा काळ ; आणि अनग्निकाला दुसरा धरुन सात काल सपिंडीकरणाचे मुनींनीं सांगितलें आहेत . अथवा रोहिणी , आर्द्रा , हस्त , व अनुराधा ह्या नक्षत्रांवरही सपिंडन करावें . " नारदसंहितेंत तर - " सपिंडीकरण संवत्सर झालें असतां करावें . अथवा अर्ध्या वर्षीं किंवा तिसर्‍या मासीं अथवा तिसर्‍या पक्षीं किंवा पहिल्या मासांत अथवा बाराव्या दिवशीं करावें " असें सांगितलें आहे . या वचनांत ‘ वत्सरे ’ याचा अर्थ - वर्ष होऊन गेलें असतां , असा समजावा . कारण , " तदनंतर सपिंडीकरण वर्षाच्या पुढें आहे . " असें भविष्यवचन आहे . " पित्याचें सपिंडीकरण वर्ष होऊन गेल्यानंतर आहे " असें नागरखंडाचें वचनही आहे . " पित्याचें सपिंडीकरण वर्षाच्या मृतदिवशीं होतें " असें उशनसाचें वचनही आहे . आणि " वर्ष पूर्ण झालें असतां जो सोळावा पिंड ( श्राद्ध ) सांगितला आहे , तेणेंकरुनच सपिंडत्व येतें व त्यानेंच आब्दिकही होतें " असें हेमाद्रींत वचनही आहे . हें वचन आकरांत नाहीं , असें म्हणणें मूर्खाचेंच आहे . आतां जें ‘‘ संवत्सर पूर्ण झालें असतां पुत्रानें सपिंडीकरण करावें , आणि एकोद्दिष्टही त्याच मृतदिवशीं समाप्त करावें " ह्या धवलनिबंधांतील जाबालि वचनावरुन ; आणि " पुत्रानें सपिंडन करुन सचैल स्नान करावें , आणि तदनंतर एकोद्दिष्ट करावें , कुतुपकालाचा विचार करुं नये " ह्या स्वल्पमात्स्यवचनावरुनही वर्षाच्या मृतदिवशीं सपिंडन करुन त्याच दिवशीं पुनः आब्दिक करावें , असें केचित् ग्रंथकार म्हणतात . त्यांचें तें म्हणणें मूलरहित असल्यामुळें आणि हेमाद्रीशीं ( ‘ पूर्णे संवत्सरे पिंड : ’ या वरील वचनाशीं ) विरुद्धही असल्यामुळें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . वरील हेमाद्रीचे वचनांत सोळावा पिंड ( श्राद्ध ) तेंच सपिंडन सांगितलें तें षोडशश्राद्धांत सपिंडन आहे त्यापक्षीं समजावें . स्मृत्यर्थसारांत तर - वर्षाच्या शेवटच्या दिवशीं संवत्सरविमोक्षश्राद्ध व सपिंडन करुन दुसर्‍या दिवशीं मृत तिथीस वार्षिक करावें , असें सांगितलें आहे . गौडही असेंच सांगतात . तें पूर्वीं सांगितलेल्या भविष्यादिवचनाशीं विरुद्ध असल्यामुळें चिंत्य ( प्रमाणशून्य ) आहे .

तच्चपुत्रेसतिनान्यः कुर्यात् श्राद्धानिषोडशादत्वानतुकुर्यात्सपिंडतां प्रोषितावसितेपुत्रः कालादपिचिरादपीतिवायवीयोक्तेः षोडशश्राद्धानांवर्षादूर्ध्वंकालाभावेपितान्यदत्वानकुर्यात् किंतुदत्वैव तानियदिकनिष्ठभ्रात्रादिनाकृतानितदासपिंडनमेवकुर्यादित्यपरार्कः सपिंडनेतुकनिष्ठानांनैवाधिकारइत्यर्थः तत्रैव अज्ञानादथवामोहान्नकृताचेत्सपिंडता तत्रापिविधिवत्कार्याकालादपिचिरादपि तेष्वपिज्येष्ठस्यैवाधिकारः ज्येष्ठेनजातमात्रेणपुत्रीभवतिमानवइतिमनूक्तेः अपरार्केप्रचेताअपि एकादशाद्याः क्रमशोज्येष्ठस्तुविधिवत्क्रियाः कुर्यान्नैकैकशः श्राद्धमाब्दिकंतुपृथक् पृथक् मरीचिः सर्वेषांतुमतंकृत्वाज्येष्ठेनैवतुयत्कृतम् द्रव्येणचाविभक्तेन सर्वैरेवकृतंभवेत् यत्तु वाचस्पतिशूलपाणिभ्यामुक्तं द्रव्यदानानुमत्यभावेकनिष्ठैः पृथक्कार्यमिति तन्न एवकारस्यतदभावेपिपृथक्करणाभावार्थत्वात् अंधादेरिवज्येष्ठेसतिकनिष्ठानामनधिकाराच्च अतस्तेषांप्रत्यवायमात्रं आहिताग्निः कनिष्ठस्तुकुर्यादेव अन्यथापितृयज्ञासिद्धेः एवमावश्यकवृद्धावपिकनिष्ठोन्यः सपिंडोवाकुर्यात् भ्रातावाभ्रातृपुत्रोवासपिंडः शिष्यएवच सहपिंडक्रियांकृत्वाकुर्यादभ्युदयंततः तथैवकाम्यंयत्कर्मवत्सरात्प्रथमादृते इतिमदनरत्नेलघुहारीतवचनात् वृद्ध्यनंतरंप्रथमाब्दमध्येपिकाम्यंकुर्यात् वृद्ध्यभावेतुप्रथमाब्दादूर्ध्वमेवेत्यर्थः काम्योक्तेरनावश्यकेष्टापूर्तादौनापकर्षः एतद्भ्रातृपुत्रादिसंस्कारेप्राप्ताधिकारस्यनांदीश्राद्धाधिकारार्थं अभ्युदयपदंचनांदीश्राद्धनिमित्तकर्ममात्रपरमितिहेमाद्रिः तेनज्येष्ठेदेशांतरस्थेकनिष्ठः सपिंडनंविनैववृद्धिंकृत्वापुत्रसंस्कारंकुर्यादितिश्रीदत्तोक्तिः परास्ता भ्रातृशिष्याद्युक्तेर्नांदीश्राद्धेज्यदेवतामात्रपरोपकर्षइत्यपास्तं अस्यक्रममात्रपरत्वाद्वृद्धिकर्तैवसपिंडनंकुर्यादितिननियमइतिगौडाः अतएवकन्यायामातृमरणेभ्रात्रासपिंडनेकृतेपितुर्दानाधिकारः ।

तें सपिंडीकरण पुत्र असतां दुसर्‍यानें करुं नये . कारण , " प्रवासांत मृत असतां पुत्रानें चिरकालानें देखील षोडश श्राद्धें केल्यावांचून सपिंडीकरण करुं नये " असें वायुपुराणांतील वचन आहे . याचा अर्थ - सोळा श्राद्धांचा वर्षानंतर काल नसला तरी तीं केल्यावांचून सपिंडीकरण करुं नये ; तर तीं श्राद्धें करुनच सपिंडन करावें . तीं जर कनिष्ठ भ्राता इत्यादिकानें केलीं असतील तर सपिंडनच ज्येष्ठानें करावें , असें अपरार्क सांगतो . सपिंडनाविषयीं तर कनिष्ठांना अधिकार नाहींच , असा अर्थ समजावा . तेथेंच - " अज्ञानानें किंवा मोहाच्या योगानें जर सपिंडीकरण केलें नसेल तर चिरकालानें देखील यथा शास्त्र सपिंडन करावें . " त्या षोडशश्राद्धाविषयीं देखील ज्येष्ठ पुत्रालाच अधिकार आहे . कारण , " ज्येष्ठ पुत्र झाल्यानेंच मनुष्य पुत्रवान् होतो " असें मनुवचन आहे . अपरार्कांत प्रचेताही - " एकादशाहादिक क्रिया ज्येष्ठानें यथाविधि अनु क्रमानें कराव्या . प्रत्येकानें करुं नयेत . आब्दिकश्राद्ध तर प्रत्येकानें वेगवेगळें करावें . " मरीचि - " ज्येष्ठानेंच सर्व भ्रात्यांचें मत घेऊन सामायिक द्रव्य खर्च करुन जें कर्म केलें तें सर्वांनीं केलेंच असें होतें . " आतां जें वाचस्पति शूलपाणि यांनीं सांगितलें कीं , ‘ द्रव्य आणि अनुमोदन कनिष्ठांनीं दिलें नसेल तर त्यांनीं वेगळें कर्म करावें . ’ असें सांगितलें तें बरोबर नाहीं . कारण , ह्या मरीचिवचनांत ‘ सर्वैरेव ’ येथें ‘ एव ’ हें पद आहे , त्याचा अर्थ - द्रव्यादिक न दिलें तरी त्या सर्वांनींच तें केलें , अर्थात पृथक् करुं नये , असा आहे . आणि श्रौतकर्माविषयीं अंधादिकाला जसा अधिकार नाहीं तसा ज्येष्ठ भ्राता असतां कनिष्ठ भ्रात्यांना अधिकारही नाहीं . म्हणून त्यांना कर्म झालें नाहीं किंवा अनुमोदन वगैरे दिलें नसेल तर दोष भ्राता प्राप्त होईल . आहिताग्नि कनिष्ठ असेल तर त्यानें करावेंच . तें केल्यावांचून पिंडपितृयज्ञाची सिद्धि होत नाहीं . याप्रमाणें आवश्यक वृद्धिकर्म असतांही कनिष्ठानें किंवा इतर सपिंडानें करावें . कारण , " भ्राता किंवा भ्रात्याचा पुत्र , अथवा सपिंड किंवा शिष्य यानें सपिंडनक्रिया करुन तदनंतर आभ्युदयिक ( वृद्धिकर्म ) करावें . तसेंच जें काम्यकर्म असेल तेंही करावें . प्रथमवर्षीं काम्यकर्माकरितां अपकर्ष करुं नये . " असें मदनरत्नांत लघुहारीतवचन आहे . याचा अर्थ - वृद्धिकर्मानंतर प्रथम वर्षामध्येंही काम्यकर्म करावें . वृद्धिकर्म केलें नसेल तर प्रथमवर्षानंतरच काम्यकर्म करावें , असा आहे . काम्यकर्म प्रथम वर्षानंतर करावें , असें सांगितल्यावरुन , आवश्यक नसलेलें यज्ञदानादिकर्म व वापी - कूप - तडाग इत्यादिकर्म , त्याविषयीं कनिष्ठादिकानें अपकर्ष करुं नये . हें वचन , भ्रातृपुत्रादिकांचे संस्काराविषयीं ज्याला अधिकार प्राप्त असेल त्याला नांदीश्राद्धाच्या अधिकाराकरितां आहे . या वचनांत ‘ अभ्युदय ’ असें पद आहे त्याचा अर्थ - नांदीश्राद्धाला निमित्त असलेलें सर्व कर्म , असा हेमाद्रि सांगतो . तेणेंकरुन ( अभ्युदयनिमित्तक भ्राता इत्यादिकांना अधिकार सांगितल्यावरुन ) ज्येष्ठ देशांतरीं असतां कनिष्ठानें सपिंडन केल्यावांचूनच वृद्धिश्राद्ध करुन पुत्राचा संस्कार करावा , असें श्रीदत्तानें सांगितलेलें खंडित झालें . त्या वचनांत भ्राता , शिष्य इत्यादिकांना अधिकार सांगितल्यावरुन , नांदीश्राद्धांत येणार्‍या ज्या देवता ( पिता इत्यादिक ) त्यांच्या सपिंडनाचा मात्र अपकर्ष करावा , असें मत तें खंडित झालें . हें वचन भ्रात्यानें , त्याच्या अभावीं भ्रातृपुत्रानें सपिंडन करावें इत्यादि क्रमाचें मात्र बोधक असल्यामुळें वृद्धिकर्त्यानेंच सपिंडन करावें , असा नियम नाहीं , असें गौड सांगतात . म्हणूनच कन्येची माता मृत असतां कन्येच्या भ्रात्यानें सपिंडन केलें असतां तिच्या पित्याला कन्यादानाविषयीं अधिकार आहे .

शूलपाणिस्तु महागुरौप्रेतभूतेवृद्धिकर्मनयुज्यतइतिनिषेधात् मृतस्यभ्रात्रादिः सपिंडनंकृत्वातत्पुत्रकन्यादेरभ्युदयंकुर्यान्नतुस्वपुत्रसंस्कारे संस्कार्यपितुः सपिंडनंविनावृद्धौदेवतात्वाभावादित्याह तन्न देवताप्रयुक्तापकर्षस्यनिरस्तत्वात् वृद्धिंविनाकनिष्ठेनकृतेतु विदेशस्थेनज्येष्ठेनपुनः कार्यम् यवीयसाकृतंकर्मप्रेतशब्दंविहायतु तज्ज्यायसापिकर्तव्यंसपिंडीकरणंपुनरिति स्मृतेः ज्येष्ठेनवाकनिष्ठेनसपिंडीकरणेकृते आद्यपादे मातापित्रोः कनिष्ठेनेतिवापाठः देशांतरगतानांचपुत्राणांतुकथंभवेत् श्रुत्वातुवपनंकार्यंदशाहांतंतिलोदकम् ततः सपिंडीकरणंकुर्यादेकादशेहनि द्वादशाहेनकर्तव्यमितिशातातपोब्रवीदितिवचनाच्चेतिभट्टाः सिंगाभट्टीयेप्येवम् पूर्ववचनेऽत्रचमूलंचिंत्यम् स्मृत्यर्थसारेतु विभक्ताऋद्धिकामाश्चेत्पुत्राः पृथक् सपिंडीकरणंकुर्युरित्युक्तम् अत्रदत्तकस्यतत्पुत्रादीनांविशेषः प्रागुक्तः केचित्तु वृद्धिंविनापिकनिष्ठस्यसपिंडनमाहुः मातापित्रोर्मृतेः कालेज्येष्ठेदेशांतरस्थिते कनिष्ठेनप्रकर्तव्यंसपिंडीकरणंतथेतिकार्ष्णाजिनिस्मृतेः गतेवारोधितेज्येष्ठेपित्रावाप्रेषितेसति षण्मासान्ननिवर्तेततदाकार्यंकनीयसाः संवर्तः पुनः सपिंडीकरणंश्राद्धंपार्वणवच्चरेत् अर्घ्यसंयोजनंनैवपिंडसंयोजनंनचेति तेषांवचसांनिर्मूलत्वात्प्रोषितावसितेपुत्रइत्यादिविरोधाच्चोपेक्ष्याः ।

शूलपाणि तर - " महागुरु ( पिता ) प्रेतरुप असतां वृद्धिकर्म योग्य होत नाहीं " असा निषेध असल्यामुळें मृताचा भ्राता इत्यादिकानें सपिंडन करुन त्याच्या ( मृताच्या ) पुत्रकन्यादिकांचें अभ्युदय कर्म करावें . आपल्या पुत्राच्या संस्काराविषयीं ह्या निषेधावरुन सपिंडन करुं नये . आणि संस्कार करावयाचे जे पुत्रादिक त्यांच्या पित्याचें सपिंडन झाल्यावांचून वृद्धिश्राद्धांत त्याला ( पित्याला ) देवतात्व येत नाहीं , असें सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , नांदीश्राद्धांत येणार्‍या ज्या देवता त्यांच्या सपिंडनाचा मात्र अपकर्ष , तो वर खंडित केला आहे . वृद्धिकर्मावांचून कनिष्ठानें अपकर्ष केला असेल तर परदेशांत असलेल्या ज्येष्ठानें पुनः करावें . कारण , " कनिष्ठानें केलेलें सपिंडीकरणरुप कर्म तें पुनः प्रेतशब्द वर्ज्य करुन ज्येष्ठानेंही करावें " अशी स्मृति आहे . ज्येष्ठानें किंवा कनिष्ठानें सपिंडीकरण केलें असतां ( येथें ‘ मातापित्रोः कनिष्ठेन ’ असें पाठांतर आहे त्याचा अर्थ - मातापितरांचे कनिष्ठानें सपिंडीकरण केलें असतां ) देशांतरीं गेलेल्या पुत्रांचें कसें होईल ? देशांतरीं गेलेल्या पुत्रांनीं पितृमरण श्रवण करुन वपन करावें . दहा दिवस तिलोदक द्यावें . तदनंतर अकराव्या दिवशीं सपिंडीकरण करावें . बाराव्या दिवशीं करुं नये , असें शातातप सांगता झाला . " असें वचनही आहे असें भट्ट सांगतात . सिंगाभट्टीयांतही असेंच आहे . वरील स्मृतिवचन व हें वचन यांविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . स्मृत्यर्थसारांत तर - विभक्त असून समृद्धीची इच्छा करणारे जर पुत्र असतील तर त्यांनीं वेगवेगळें सपिंडीकरण करावें , असें सांगितलें आहे . येथें ( सपिंडीकरणाविषयीं ) दत्तकाला व त्याच्या पुत्रादिकांना विशेश निर्णय पूर्वीं ( श्राद्धाधिकारिनिर्णयप्रसंगीं ) सांगितला आहे . केचित् विद्वान् तर - वृद्धिकर्मावांचूनही कनिष्ठाला सपिंडनाचा अधिकार सांगतात . कारण , " मातापितरांच्या मरणसमयीं ज्येष्ठ पुत्र देशांतरीं असतां कनिष्ठानें सपिंडीकरण करावें " अशी कार्ष्णाजिनिस्मृति आहे . " ज्येष्ठ पुत्र देशांतरीं गेला असतां , अथवा बंदीत असतां किंवा बापानें पाठविला असतां सहा महिनेपर्यंत जर आला नाहीं तर त्या वेळीं कनिष्ठानें करावें . " संवर्त - " पुनः सपिंडीकरणश्राद्ध पार्वणाप्रमाणें करावें . अर्घ्याचें संयोजन करुं नये व पिंडाचेंही संयोजन करुं नये . " त्या केचित् विद्वानांनीं सांगितलेलीं हीं वचनें निर्मूल असल्यामुळें , आणि वर सांगितलेलें ‘ प्रोषितावसिते पुत्रः ’ हें वायवीयवचन व मनु , प्रचेता इत्यादिकांचीं वचनें यांच्याशीं विरोध येत असल्यामुळेंही त्या केचित् विद्वानांचें मत उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे .

व्युत्क्रममृतौहेमाद्रौब्राह्मे मृतेपितरियस्याथविद्यतेचपितामहः तेनदेयास्त्रयः पिंडाः प्रपितामहपूर्वकाः तेभ्यश्चपैतृकः पिंडोनियोक्तव्यस्तुपूर्ववत् मातर्यथमृतायांचविद्यतेचपितामही प्रपितामहीपूर्वस्तुकार्यस्तत्राप्ययंविधिः एवंप्रपितामहजीवनेतत्पित्रादिभिर्ज्ञेयम् तदाहसुमंतुः त्रयाणामपिपिंडानामेकेनापिसपिंडने पितृत्वमश्नुतेप्रेतइतिधर्मोव्यवस्थितः यत्तु व्युत्क्रमात्तुप्रमीतानांनैवकार्यासपिंडतेतितन्मातापितृभर्तृभिन्नविषयम् व्युत्क्रमेणमृतानांनसपिंडीकृतिरिष्यते यदिमातायदिपिताभर्तानैषविधिः स्मृतइतिमाधवीये स्कांदोक्तेः मदनरत्नादौचैवम् अत्रप्रपितामहादिभिः पितुः सपिंडनेकृतेपितामहेमृतेतत्सपिंडनेसतिपुनस्तेनसहपितुः सपिंडनंकार्यमितिहेमाद्रिर्मतमाह अन्येनैतन्मन्यंते तत्त्वंतुपितुः सपिंडनाभावेपितामहेन सहपुनः कार्यंनतत्सत्त्वे त्रयाणामपिपिंडानामेकेनापिसपिंडने पितृत्वमश्नुतेप्रेतइतिधर्मोव्यवस्थितइतिविष्णुधर्मोक्तेः पितामहेप्रपितामहेवापुत्रांतरैरसंस्कृतेप्यसंस्कृताभ्यामेवपितुः सपिंडनंकुर्यात् असंस्कृतौनसंस्कार्यौपूर्वौपौत्रप्रपौत्रकैः पितरंतत्रसंस्कुर्यादितिकात्यायनोब्रवीदितिछंदोगपरिशिष्टात् असंस्कृतौदाहाद्यैरितिकेचित् असपिंडीकृतावितितुतत्त्वम् अतएवोक्तंतत्रैव पापिष्ठमपिशुद्धेनशुद्धंपापकृतापिवा पितामहेनपितरंसंस्कुर्यादितिनिश्चयः पापिष्ठमकृतसपिंडनं नतुपतितादि अभिशस्तपतितभ्रूणघ्नाः स्त्रियश्चातिचारिणीर्नसंसृजेदितिबैजवापोक्तेः पापकर्मिणोनसंसृजेरन्निति गौतमोक्तेश्चेत्युक्तंनिर्णयामृते ।

उलट क्रमानें मरण असेल तर सांगतो हेमाद्रींत ब्राह्मांत - " ज्याचा पितामह जीवंत असून पिता मृत असेल त्यानें प्रपितामहादि तिघांना तीन पिंड देऊन त्या तीन पिंडांत पित्याचा पिंड पूर्वींप्रमाणें ( पितामह मृत असतां जसा मिळवावयाचा तसा ) मिळवावा . आतां माता मृत असतां पितामही जीवंत असेल तर त्या ठिकाणींही प्रपितामही इत्यादिकांना तीन पिंड देऊन असाच विधि करावा . " याप्रमाणें प्रपितामह जीवंत असतां त्याच्या पित्रादिकांशीं पित्याचें संयोजन जाणावें . तें सांगतो सुमंतु - " तीन पिंडांमध्यें देखील कोणत्याही एका पिंडाबरोबर सपिंडन केलें तरी प्रेताला पितृत्व प्राप्त होतें , असा धर्म व्यवस्थित आहे . " आतां जें " उलट क्रमानें मृत झालेल्यांचें सपिंडन करुं नये " असें सांगितलें आहे तें माता , पिता , भर्ता यांवांचून इतरविषयक आहे . कारण , " उलट क्रमानें ( वडील जीवंत असतां पुत्र मरणें अशा क्रमानें ) मृत झालेल्यांचें सपिंडीकरण इष्ट नाहीं , जर माता किंवा पिता अथवा भर्ता असेल तर त्या ठिकाणीं हा निषेध नाहीं " असें माधवीयांत स्कांदवचन आहे . मदनरत्नादिकांतही असेंच आहे . ह्या उलट क्रमानें मरणस्थलीं प्रपितामहादिकांशीं पित्याचें सपिंडन केलें असतां नंतर पितामह मृत झाला व त्याचें सपिंडन केलें असतां पुनः त्या पितामहाबरोबर पित्याचें सपिंडन करावें , असें मत हेमाद्रि सांगतो . इतर ग्रंथकार तें मत मानीत नाहींत . याचा खरा प्रकार म्हटला म्हणजे , पित्याचें सपिंडन पूर्वीं केलें नसेल तर पितामहाचें सपिंडन झाल्यावर पुनः पित्याचें सपिंडन करावें . पित्याचें सपिंडन केलें असेल तर पुनः त्याचें सपिंडन करुं नये . कारण , " तीन पिंडांमध्यें देखील कोणत्याही एकाशीं सपिंडन केलें तरी प्रेताला पितृत्व प्राप्त होतें , असा धर्म व्यवस्थित आहे " हें वरील सुमंतुवचन विष्णुधर्मांत उक्त आहे . पितामह किंवा प्रपितामह याचा त्यांच्या इतर पुत्रांनीं संस्कार केला नसेल तरी असंस्कृतांबरोबरच पित्याचें सपिंडन करावें . कारण , " पिता व प्रपितामह हे असंस्कृत असतां त्यांचा पौत्रप्रपौत्रांनीं संस्कार करुं नये . त्यांच्याशीं पित्याचा संस्कार करावा , असें कात्यायन सांगता झाला . " असें छंदोगपरिशिष्टवचन आहे . या वचनांत ‘ असंस्कृत ’ म्हणजे दाहादिकांनीं संस्कार न झालेले , असें केचित् म्हणतात . परंतु सपिंडी न झालेले , असा खरा अर्थ आहे . म्हणूनच तेथेंच सांगितलें आहे कीं , " पिता पापिष्ठ म्हणजे सपिंडी न झालेला असला किंवा शुद्ध म्हणजे सपिंडी झालेला असला तरी त्याचा सपिंडी झालेल्या किंवा न झालेल्याही पितामहाबरोबर संस्कार ( संयोजन ) करावा , असा निश्चय आहे . " या वचनांत ‘ पापिष्ठ ’ म्हणजे सपिंडी न झालेला समजावा . पतितादिक समजूं नये . कारण , " अभिशस्त ( लोकापवादानें दूषित ), पतित , गर्भघातक , आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांचें संयोजन करुं नये " असें बैजवापवचन आहे . आणि " पापकर्म्यांचें संसर्जन करुं नये " असें गौतमवचनही आहे , असें निर्णयामृतांत सांगितलें आहे .

पूर्वयोः पुत्राभावेतुपौत्रः कुर्यादेव पितामहः पितुः पश्चात्पंचत्वंयदिगच्छति पौत्रेणैकादशाहादिकर्तव्यं श्राद्धषोडशम् नैतत्पौत्रेणकर्तव्यंपुत्रवांश्चेत्पितामहः पितुः सपिंडतांकृत्वाकुर्यान्मासानुमासिकमितिकात्यायनोक्तेः अपरार्केशूलपाणौचैवम् तेनसपिंडनस्यानित्यत्वादकृतसपिंडनयोरेवपार्वणानुप्रवेशइति मूर्खोक्तिः परास्ता कृतेसपिंडीकरणेप्रेतः पार्वणभाग्भवेदिति हारीतविरोधाच्च केचित्पुत्रांतराभावेपितामहवार्षिकमप्याहुः तन्न श्राद्धषोडशमितिनियमात् इच्छयाभवत्येव पितामहस्यचेद्दद्यादेकोद्दिष्टंनपार्वणमिति वाचस्पतिधृतगर्गोक्तेः त्रयाणांयौगपद्येतुप्राधान्यात्पितुः सपिंडनंकृत्वापूर्वयोः कुर्यात् पितामहेमृतेदशाहांतः पितुर्मृतौपितुः संस्कारंकृत्वापितामहस्यपुनः सर्वमावर्तयेत् वृत्तेदशाहेनैवम् अशक्त्यापित्रानुज्ञातेन पौत्रेणपितामहश्राद्धेप्रकांतेपितृमृतौतदाशौचंवहन्नेवपौत्रः पितामहकर्मकुर्यात्प्रक्रांतत्वादिति मदनपारिजातपृथ्वीचंद्रौ यत्तु उत्तरात्रितयरौद्ररोहिणीयाम्यसर्पपितृभेषुचाग्निभे श्मश्रुकर्मसकलंचवर्जयेत्प्रेतकार्यमपिबुद्धिमान्नर इतिसपिंडनप्रकरणेपाठान्मुख्यकालेनिषिद्धर्क्षेसपिंडनापकर्षः सर्वकालेषुतद्वत्त्वेतद्वर्ज्यान्येव पूर्वोक्तब्राह्मोक्तानिषोडशश्राद्धानिकार्याणीति वाचस्पतिमिश्राः तन्न अस्यपरिभाषात्वेनवाक्यात्सावकाशकर्मपरत्वात् अस्यप्रेतमात्रदैवत्याभावाच्च ।

पितामह व प्रपितामह यांना पुत्र नसेल तर पौत्रानें सपिंडन करावेंच . कारण , " पित्याच्या पश्चात् जर पितामह मरेल तर त्याचीं पौत्रानें एकादशाहादिक षोडश श्राद्धें करावीं . पितामहाला जर दुसरा पुत्र असेल तर हें एकादशाहादिक कृत्य पौत्रानें करुं नये . पित्याचें सपिंडन करुन प्रतिमासीं अनुमासिक करावें . " असें कात्यायन वचन आहे . अपरार्कांत शूलपाणिग्रंथांतही असेंच आहे . तेणेंकरुन ( पौत्रानें करावें , असें सांगितल्यावरुन ), सपिंडन अनित्य असल्यामुळें पितामह - प्रपितामहांचें सपिंडन झाल्यावांचूनच त्यांचा पार्वणांत प्रवेश होतो , असें मूर्खानें सांगितलेलें खंडित झालें . आणि तसें म्हटलें तर " सपिंडीकरण केलें असतां प्रेत पार्वणभागी होतो " ह्या हारीतवचनाशीं विरोधही येतो . केचित् विद्वान् - पितामहाला दुसरा पुत्र नसेल तर त्याचें वार्षिकही करावें , असें सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , वरील वचनांत षोडशश्राद्धें करावीं , असा नियम केला आहे . आपल्या इच्छेनें करावयाचें असेल तर होईलच . कारण , " पितामहाचें जर करावयाचें असेल तर एकोद्दिष्ट करावें . पार्वण करुं नये " असें वाचस्पतीनें धरलेलें गर्गवचन आहे . पिता इत्यादि तिघांचें एकदम सपिंडन प्राप्त असतां पित्याचें मुख्य असल्यामुळें पित्याचें सपिंडन करुन नंतर पितामह - प्रपितामहांचें करावें . पितामह मृत असतां दशाहांत पिता मृत असेल तर पित्याचा संस्कार करुन पितामहाच्या सर्व कृत्याची पुनरावृत्ति करावी . दशाह होऊन गेल्यावर पिता मृत असेल तर पितामहाच्या कृत्याची पुनरावृत्ति नाहीं . पित्याला शक्ति नसल्यामुळें त्यानें पुत्राला कर्म करावयास सांगितल्यावरुन पौत्रानें पितामहाचे दशाह कृत्यास आरंभ केला असतां मध्यें पिता मृत होईल तर पित्याचें आशौच धारण करुनच पौत्रानें पितामहाचें कर्म करावें . कारण , त्यानें त्या कर्मास आरंभ केल्यामुळें दोष नाहीं , असें मदनपारिजात पृथ्वीचंद्र सांगतात . आतां जें " उत्तरा , उत्तराषाढा , उत्तराभाद्रपदा , आर्द्रा , रोहिणी , भरणी , आश्लेषा , मघा , कृत्तिका , ह्या नक्षत्रांवर सकल श्मश्रुकर्म वर्ज्य करावें . आणि प्रेतकार्यही विद्वानानें वर्ज्य करावें . " हें वचन सपिंडनप्रकरणीं पठित असल्यामुळें मुख्यकालीं निषिद्ध नक्षत्र असतां सपिंडनाचा अपकर्ष करावा . सर्व काळांचे ठायीं निशिद्ध नक्षत्र असेल तर सपिंडन वर्ज्य करुन पूर्वीं सांगितलेंली ब्राह्मांतील षोडशश्राद्धें करावीं , असें वाचस्पतिमिश्र सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , हें परिभाषारुप वाक्य असल्यामुळें अवकाश असलेल्या कर्माविषयीं आहे . आणि ह्या सपिंडनाची प्रेतच केवळ देवता आहे , असें नाहीं म्हणूनही याविषयीं तें वचन लागू होत नाहीं .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP