आतां आशौचांचे अन्नभक्षणाविषयीं सांगतो -
अथाशौचान्नभक्षणेविष्णुः ब्राह्मणादीनामाशौचे यः सकृदेवान्नमश्नातितस्यतावदाशौचंयावत्तेषामाशौचव्यपगमेप्रायश्चित्तमिति अज्ञानेत्वंगिराः अंतर्दशाहेभुक्त्वान्नंसूतकेमृतकेपिवा अस्याशौचंभवेत्तावद्यावदन्नंव्रजत्यधः प्रायश्चित्तंत्वमत्याविप्रस्यवर्णक्रमेणैकाहत्र्यहषंचाहसप्ताहोपवासाः दशविंशतिः षष्टिः शतंचप्राणायामाः पंचगव्याशनंच अभ्यासेद्विगुणं आपदितुप्राणायामशतंपंचशतमष्टशतमष्टसहस्त्रंगायत्रीजपश्च मत्यापदितुसवर्णाशौचेत्रिरघमर्षणंगायत्र्यष्टसहस्त्रंच क्षत्रियाशौचेउपवासस्तच्च वैश्याशौचेत्रिरात्रोपवासश्च शूद्राशौचेकृच्छ्रः क्षत्रवैश्ययोः पंचशतमष्टशतंगायत्रीजपः उत्तमेषुशूद्रस्यसर्वत्रस्नानं मत्यानापदिविप्रस्यवर्णेषुसांतपनकृच्छ्रमहासांतपनचांद्राणि अभ्यासेतुमासिकद्वैमासिकषाण्मासिकत्रैमासिकानीत्यादिमाधवीयादौज्ञेयम् ।
विष्णु - “ ब्राह्मणादिकांना आशौच असतां जो एकवारच त्यांचें अन्न भक्षण करितो त्याला, त्यांचें आशौच असेल तोंपर्यंत आशौच समजावें. आशौच गेल्यावर त्यांचें अन्न भक्षण करणारानें प्रायश्चित्त करावें. ” अज्ञानानें भक्षण केलें तर सांगतो अंगिरा - “ जननाशौचांत किंवा मृताशौचांत दहा दिवसांचे आंत अन्न भक्षण केलें असतां जोंपर्यंत तें अन्न शौचमार्गानें पडून गेलें नाहीं तोंपर्यंत त्याला आशौच होतें. ” वरील वचनांत आशौचसमाप्तीनंतर प्रायश्चित्त सांगितलें तें असें - जर ब्राह्मण आशौचवंत अशा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांचें अन्न साहजिक भक्षण करील तर त्यानें अनुक्रमानें एक दिवस, तीन दिवस, पांच दिवस, सात दिवस उपवास करावा. आणि तसेच अनुक्रमानें दहा, वीस, साठ, शंभर प्राणायाम करावे. आणि शेवटीं पंचगव्य प्राशन करावें. पुनः पुनः भक्षण करील तर वर सांगितलेलें द्विगुणित करावें. आपत्कालीं साहजिक भक्षण करील तर अनुक्रमानें शंभर प्राणायाम, पांचशें, आठशें, आठ हजार गायत्रीजप करावा. आपत्कालीं समान वर्णाच्या आशौचांत बुद्धिपूर्वक ( मुद्दाम होऊन ) अन्न भक्षण करील तर त्रिवार अघमर्षण करुन आठ हजार गायत्रीजप करावा. ब्राह्मण क्षत्रियाच्या आशौचांत बुद्धिपूर्वक अन्न भक्षण करील तर त्यानें उपवास आणि आठ हजार गायत्रीजप करावा. वैश्याशौचाचें अन्न भक्षण करील तर तीन दिवस उपवास आणि आठ हजार गायत्रीजप. शूद्राशौचांत क्षत्रिय वैश्यांस प्राजापत्य कृच्छ्र आणि पांचशें व आठशें गायत्रीजप. उत्तम वर्णाच्या आशौचांचे अन्न शुद्र भक्षण करील तर त्याला सर्वत्र स्नान सांगितलें आहे. आपत्काल नसून ब्राह्मणादिवर्णांच्या आशौचांचें अन्न ब्राह्मण बुद्धिपूर्वक भक्षण करील तर त्याला अनुक्रमें सांतपन, कृच्छ्र, महासांतपन, चांद्रायण हीं प्रायश्चित्तें आहेत. आपत्काल नसतां ब्राह्मण पुनः पुनः बुद्धिपूर्वक ( मुद्दाम होऊन ) ब्राह्मणादिकांचें अन्न भक्षण करील तर अनुक्रमानें एक मास कृच्छ्र, दोन मास कृच्छ्र, तीन मास कृच्छ्र, सहा मास कृच्छ्र इत्यादिक माधवीयांत जाणावें.