मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धनिर्णय

तृतीयपरिच्छेद - श्राद्धनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


॥ श्रीगणेशाय नमः ॥

आतां श्राद्धनिर्णय सांगतो -

अथश्राद्धनिर्णयः नानानिबंधवैमत्यभ्रांतचित्तोद्दिधीर्षया कमलाकरसंज्ञेनक्रियतेश्राद्धनिर्णयः तत्स्वरुपमाह पृथ्वीचंद्रोदयेमरीचिः प्रेतंपितृंश्चनिर्दिश्यभोज्यंयत् ‍ प्रियमात्मनः श्रद्धयादीयतेयत्रतच्छ्राद्धंपरिकीर्तितम् ‍ ब्राह्मणस्वीकारांतश्चतुर्थ्यंतपदोपनीतपित्राद्युद्देश्यकस्त्यागः श्राद्धमित्यर्थः तत्रयद्यपिहोमपिंडभोजनानिप्रधानमितिहेमाद्रिः होमश्चपिंडदानंचतथाब्राह्मणभोजनम् ‍ श्राद्धशब्दाभिधेयंस्यादेकस्मिन्नौपचारिकमिति श्रीधरश्च तथापिक्कचिद्विशेषंवक्ष्यामः निमित्तभेदेभोजनस्यपिंडानांवानिषेधोनप्राधान्यंविरुणद्धि असोमयाजिनोदधिपयोयागवत् ‍ यच्चशूलपाणिः नित्यश्राद्धमदैवंस्यादर्घ्यपिंडविवर्जितमितिहारीतीयेनित्यश्राद्धमघादौपिंडनिषेधोस्ति नचप्राप्तिंविनासः नचातिदेशंविनाप्राप्तिः नचांगत्वेनविनातिदेशः प्रधानस्यानतिदेशात् ‍ सप्तमेउपकारकत्वेनातिदेशोक्तेः तेनभोजनंप्रधानंपिंडोंगम् ‍ पिंडदानमात्रविधिस्त्वंगभूतात् ‍ कर्मांतरमेव प्रकरणांतरन्यायादिति तन्न जातश्राद्धेनदद्यात्तुपक्कान्नंब्राह्मणेष्वपि नपक्कंभोजयेद्विप्रान् ‍ सच्छूद्रोपिकदाचनेत्याद्यैर्जातश्राद्धशूद्रश्राद्धादौभोजनस्यनिषेधेनांगत्वापत्तेः नतौपशौकरोतीतिवदुपजीव्यविरोधेन विकल्पापत्तेश्च तेनश्राद्धशब्दाभिधेयत्वेनोभयप्राप्तौनिषेधः पर्युदासोवा दीक्षितोनददातिनजुहोतिना सोमयाजीसन्नयेदितिवदितितत्त्वम् ‍ धर्मप्रदीपेपि यजुषांपिंडदानंतुबह्वृचानांद्विजार्चनम् ‍ श्राद्धशब्दाभिधेयंस्यादुभयंसामवेदिनां तच्चपितृन् ‍ यजेतपितृभ्योदद्यादित्युभयप्रयोगदर्शनाद्यागदानोभयात्मकम् ‍ पितरोदेवताइतिपित्रुद्देश्यकत्वाद्यागत्वंविप्रापेक्षयाचदानत्वमित्यविरुद्धम् ‍ एतेन नायंयागः देवतोद्देशेनत्यागोयागः यागोद्देश्याचदेवतेत्यात्माश्रयादितिगौडमतमपास्तं वैधशब्दविशेषोद्देश्यत्वस्यतस्येदमितिस्वत्वारोपप्रतियोगित्वस्यवादेवतात्वात् ‍ तत्रैवसुमंतुः श्राद्धात्परतरंनान्यच्छ्रेयस्करमुदाह्रतम् ‍ आदित्यपुराणे नसंतिपितरश्चेतिकृत्वामनसियोनरः श्राद्धंनकुरुतेतत्रतस्यरक्तंपिबंतिते ॥

नानाप्रकारच्या निंबधांतील विरुद्ध मतांच्या वाक्यांनीं भ्रांति उत्पन्न झालेल्या पुरुषांच्या चित्ताचा उद्धार ( भ्रांतिनिवारण ) करण्याच्या इच्छेनें कमलाकर नांवाचा मी ( ग्रंथकार ) श्राद्धनिर्णय करितों .

श्राद्धाचें स्वरुप पृथ्वीचंद्रोदय ग्रंथांत मरीचि सांगतो , तें असें - " आपल्याला प्रिय असलेलें भोज्य ( भक्षण करण्यास योग्य वस्तु ), प्रेत व पितर यांच्या उद्देशानें ज्यांत ब्राह्मणाला श्रद्धेनें दिलें जातें , त्या कर्माला श्राद्ध असें म्हटलें आहे . " म्हणजे चतुर्थ्यंत पदानें ( ‘ पितृपितामहप्रपितामहेभ्यः ’ इत्यादि पदानें ) उपस्थापित जे पित्रादिक त्यांच्या उद्देशानें केलेलें दान ब्राह्मणानें स्वीकारलें म्हणजे तें श्राद्ध होतें , असा श्राद्ध शब्दाचा इत्यर्थ होय . आतां त्या श्राद्धामध्यें होम , पिंडदान आणि ब्राह्मणभोजन हीं तीन प्रधान आहेत असें हेमाद्रि सांगतो ; आणि " श्राद्धशब्दाचा अर्थ म्हटला म्हणजे होम , पिंडदान आणि ब्राह्मणभोजन हीं तीन मिळून होतो ; या तिहींतून एकावर श्राद्धशब्दार्थत्व मुख्य येत नाहीं , तर औपचारिक ( गौण ) येतें . " असें श्रीधरही सांगतो . या दोन्ही ग्रंथकारांच्या ( हेमाद्रिश्रीधरांच्या ) मतानें होम , पिंडदान आणि ब्राह्मणभोजन या तिघांना प्राधान्य सांगितलें ; असें जरी आहे , तरी पुढें क्कचित्स्थळीं आह्मीं विशेष सांगूं . भिन्न भिन्न निमित्तानें एकादे ठिकाणीं भोजनाचा किंवा पिडांचा निषेध केलेला असला तरी तो निषेध ( त्या भोजनपिंडांच्या ) प्राधान्याचा विरोध करीत नाहीं ; म्हणजे एकादे ठिकाणीं पिंडांचा किंवा भोजनाचा निषेध असला तरी श्राद्धांतील त्यांच्या प्राधान्याचा तो विघातक होत नाहीं . जसें - अग्निहोत्र्यानें असोमयाजी असतां म्हणजे सोमयाग केला नसतां दधियाग , पयोयाग करुं नयेत ; असा जरी दधिपयोयागांचा निषेध केला आहे , तरी त्या त्या यागांमध्यें त्या दधिपयोयागांचें प्राधान्य नष्ट होत नाहीं ; कारण , असोमयाजित्वानिमित्तापुरताच निषेध आहे . तें निमित्त नसेल तर त्यांना प्राधान्य आहे . त्याप्रमाणें भोजन व पिंड यांविषयीं समजावें . आतां जें शूलपाणि सांगतो , ‘ नित्यश्राद्ध देव , अर्घ्य आणि पिंड यांनीं विरहित करावें . " या हारीतवचनांत नित्यश्राद्धांत व मघादिश्राद्धांत पिंडनिषेध सांगितला आहे . तो निषेध पूर्वीं पिंडांची प्राप्ति असल्याशिवाय होत नाहीं . अतिदेशावांचून पिंडांची प्राप्ति नाहीं , आणि तो अतिदेश अंगत्वावांचून होत नाहीं ; कारण , प्रधानाचा अतिदेश सांगितला नाहीं . जैमिनींनीं पूर्वमीमांसेंत सातव्या अध्यायांत अंगांचा अतिदेश सांगितला आहे . प्रधानाचा अतिदेश सांगितला नाहीं . तात्पर्य - पिंडांचा निषेध केल्यावरुन अतिदेश व अतिदेशामुळें अंगत्व सिद्ध झालें आहे म्हणून श्राद्धामध्यें भोजन प्रधान व पिंड अंग होतें . आतां ज्या कर्मांत केवळ पिंडदानाचाच विधि सांगितला आहे , भोजन नाहीं ; तें कर्म या अंगभूत पिंडदान असलेल्या कर्माहून भिन्न आहे ; कारण , तें प्रकरण भिन्न व हें प्रकरण भिन्न आहे ; प्रकरणभेदानें कर्मभेद होतो , असें मीमांसेंत सांगितलें आहे असें जें शूलपाणि म्हणतो , तें बरोबर नाहीं . कारण , एकाद्या ठिकाणीं पिंडांचा निषेध केल्यामुळें जर श्राद्धामध्यें पिंडांना अंगत्व प्राप्त होतें , तर " जातकर्मांतील श्राद्धाचे ठायीं ब्राह्मणांना देखील ( अपिशब्दानें दर्भबटूंनाही ) पक्कान्न देऊं नये . तसेंच सच्छूद्र जरी असेल तरी त्यानें ब्राह्मणांना कधींही शिजविलेल्या अन्नाचें भोजन घालूं नये ; " इत्यादिवाक्यांनीं जातश्राद्ध , शूद्रश्राद्ध इत्यादिकांचे ठिकाणीं भोजनाचा निषेध असल्यामुळें ( पिंडांप्रमाणें ) भोजनालाही अंगत्व प्राप्त होईल . दुसरा दोष असा कीं , पशुयाग म्हणून एक याग सांगितलेला आहे , त्या ठिकाणीं , चोदकानें अतिदेशानें आज्यभाग प्राप्त होतात , आणि " न तौ पशौ करोति " या वाक्यानें ते आज्यभाग पशुयागाचे ठिकाणीं करुं नयेत असा निषेध केला आहे ; तो निषेध उपजीव्यविरोधामुळें ( ज्यानें आपलें उपजीवन झालें त्याचा विरोध होत असल्यामुळें ) सर्वथा त्यांचा प्रतिबंध न करितां एकवेळां प्रतिबंध व एकवेळां त्या आज्यभागांची प्रवृत्ति , मिळून विकल्प होत असतो ; त्याप्रमाणें या ठिकाणींही अतिदेशानें प्रवृत्ति व वचनानें निषेध असें केलें असतां प्रवृत्तीनें निषेधानें उपजीवन असल्यामुळें उपजीव्यविरोधानें त्या पिंडांच्या प्रवृत्तीचा सर्वथा बाध न करितां एकवेळ प्रवृत्ति व एकवेळ निषेध अशा रीतीनें विकल्प प्राप्त होईल . म्हणून आतिदेशिक प्रवृत्ति मानणें योग्य नाहीं . तर श्राद्धामध्यें भोजन व पिंड या दोघांनाही प्राधान्य असल्यामुळें वरील उदाहरणांत ( नित्यश्राद्ध - मघादि श्राद्धादिकांचे ठायीं ) श्राद्धशब्दानें दोन्ही ( भोजन व पिंड ) प्राप्त झालीं असतां निषेध किंवा पर्युदास करावा . जसें - " दीक्षितो न ददाति न जुहोति " या ठिकाणीं दीक्षितानें ऋतूच्या अंगत्वेंकरुन विहितव्यतिरिक्त पुरुषार्थत्वेंकरुन विहित जीं दानादिक तीं करुं नयेत . असा त्या नकराचा अर्थ निषेध करावा . किंवा पर्युदास करावा . तो असा कीं , दीक्षितानें पुरुषार्थ जीं दानादिक कर्मै त्यांवांचून इतर कर्मै ऋतुकालीं करावीं , असा अर्थ केला असतां निषेध आर्थिक होतो . तसाच " नासोमयाजी संनयेत् ‍ " या वाक्यानें सोमयाग केल्यावांचून सान्नाय्ययाग करुं नये ; या निषेधानें सोमयागानंतर सान्नाय्ययागाचा उत्कर्ष प्रतिपादित केला जातो . या वरील दोन्ही उदाहरणांप्रमाणें श्राद्धामध्यें निमित्तविशेषीं भोजनाचा किंवा पिंडदानाचा निषेध किंवा पर्युदास करावा , असें वरील वाक्यांचें तत्त्व होय . धर्मप्रदीपग्रंथांतही " यजुर्वेद्यांना पिंडदान हें श्राद्ध होतें . बह्वृचांना ( ऋग्वेद्यांना ) द्विजार्चन म्हणजे अन्नादिकांनीं ब्राह्मणपूजन हें श्राद्ध होतें . आणि सामवेद्यांना तीं दोन्हीं ( पिंडदान व द्विजार्चन ) मिळून श्राद्ध होतें . " असें सांगितलें आहे . " पितृन् ‍ यजेत , पितृभ्यो दद्यात् ‍ " अशीं दोन्हीं प्रयोगांचीं वाक्यें दृष्ट आहेत , म्हणून तें श्राद्ध यागदान उभयरुपी आहे . एका श्राद्धावर उभयरुपत्व विरुद्ध कां होत नाहीं , असें म्हणाल तर " पितरो देवता " या वाक्यानें पितरांच्या उद्देशानें विहित असल्यामुळें त्या श्राद्धकर्मावर यागरुपत्व येतें आणि ब्राह्मणांना दिलें जातें म्हणून दानरुपत्वही येतें . ते दोन्ही धर्म पृथक् ‍ संबंधानें आलेले असल्यामुळें विरुद्ध होत नाहींत , अशा वरील व्यवस्थेनें श्राद्धाला यागत्व सिद्ध झाल्यामुळें ‘ जें गौड म्हणतात कीं , हा याग नव्हे , कारण , देवतेच्या उद्देशानें जो केलेला त्याग तो याग , आणि यागाला जी उद्देश्य ती देवता म्हणजे पितरांना देवतात्व सिद्ध झाल्यावांचून श्राद्धाला यागत्व सिद्ध होत नाहीं , आणि श्राद्धाला यागत्व सिद्ध झाल्यावांचून पितरांना देवतात्व नाहीं ; अर्थात् ‍ देवताज्ञानाला यागज्ञान पाहिजे व यागज्ञानाला देवताज्ञान पाहिजे . यावरुन " स्वज्ञाने स्वज्ञानापेक्षा " म्हणजे आपल्या ज्ञानाला आपलेंच ज्ञान पाहिजे , असा आत्माश्रय दोष येतो ; म्हणून हा याग होत नाहीं ’ असें जें गौडांचें मत तें खंडित होतें . कारण , यागाला उद्देश्य ती देवता , असें आह्मीं म्हणत नाहीं ; तर विधिवाक्यांतील विशेषशब्दानें जिचा उद्देश केला असेल ती देवता ; अथवा देयपदार्थांचेठायीं ‘ त्याचें हें ’ असा स्वकीय स्वत्वनिवृत्तिपूर्वक ज्याच्या स्वत्वाचा आरोप केला जातो ती देवता समजावी ; असें देवतेचें लक्षण केल्यानें वरील आत्माश्रयदोष येत नाहीं , असें समजावें . त्याच ग्रंथांत ( पृथ्वीचंद्रोदयांत ) सुमंतु सांगतो - " श्राद्धावांचून दुसरें अत्यंत श्रेयस्कर असें कोणतेंही कर्म सांगितलें नाहीं . " आदित्यपुराणांत - " पितर नाहींत असें मनांत आणून जो मनुष्य श्राद्ध करीत नाहीं त्या समयीं ( श्राद्धकालीं ) आलेले त्याचे ते पितर त्याचे ( श्राद्ध न करणार्‍या मनुष्याचें ) रक्त पितात . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP