स्त्रीगीत - व्रतबंध मंगलाष्टके
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आधी गौरीसुता आमंत्रण दिले धाडुनिया अक्षता
देवांच्या समवेत येउनि करा कार्यामधे सिध्दता
अंबे ! श्रीकुलदेवते ! सकलहि देवांसवे ये आता
आशिर्वाद अभिष्ट देइ बटुसी कुर्यात बटोमंगलम् ॥१॥
आला मंगल आज हा दिन पहा सृष्टि कशी हासते
वाटे सर्व विहंगओळी मजला वाणी शुभा बोलते
येती कौतुक पाहण्यास ललना माता मनी मोदते
सप्रेमे शुभदायी मीहि तुजला आशिर्वचे बोलते ॥२॥
होता हा व्रतबंध जासी बटू तू शास्त्रादि विद्यार्जनी
विद्यावैभव घे यश मिळूनी हो धन्य सार्या जनी
लक्ष्मी आणि सरस्वती उभयता व्हाव्या अनुकूल त्या
देवो आयु तुला सुदीर्घ प्रभु तो कुर्यात बटोमंगलम् ॥३॥
धर्माज्ञेस प्रमाण मान जगती आचार्य देवो भव
विद्येचे व्रत सेविण्यास असतो हा ब्रह्मचर्याश्रम
ज्ञानाचे धन ते अमोल असते सांगु किती थोरवी
दीक्षा घे गुरुची सुमंगल क्षणी कुर्यात् बटोमंगलम् ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP