स्त्रीगीत - पाठवणी
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
कण्वमुनी सांभाळती शकुंतला बाला
करी पाठवणी तिची दुःख होई त्याला ॥१॥
वृक्ष हरिणींना वनलता सखियांना
जाता सोडुनिया पाणी आले डोळीयांना ॥२॥
राजा जनकाने पाळियले जानकीला
जाई रामासंगे रथातुनी अयोध्येला ॥३॥
मन निश्वासले झाले कर्तव्य पित्याचे
कन्या जाते म्हणुनिया अश्रु विरहाचे ॥४॥
तैशी--बाई आज पतीगृही जाई
आला गहिवर अश्रू ढाळितसे आई ॥५॥
झाले सूनमुख केला भूषण शृंगार
भालावर सौभाग्याची खुले चंद्रकोर ॥६॥
नाजुकशी कळी भोळी आहे--बाई
सांभाळा हो पतिराज आणि सासूबाई ॥७॥
पुरे आता शोक गडे पूस बाई डोळे
तुझ्या स्वागताला तुझे घर उत्सुकले ॥८॥
आम्ही सर्व देतो तुला शुभ आशिर्वाद
आनंदाने पतिसंगे -- बाई नांद ॥९॥
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP