स्त्रीगीत - मंगलाष्टके
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
स्वस्ति श्रीगणनायकास नमिले कार्यासी आरंभिता
सिध्दीदायक तो असे गुणनिधी कर्ता तसा करविता
येती ते द्विजश्रेष्ठ मित्रजनहि या उत्सवाला आता
द्याया मंगल आशिषे वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥१॥
दारी मंडप हा असे सजविला लावुनिया तोरणे
वाद्ये सुस्वर वाजती सुखवती आलाप आवर्तने
येती सर्व सुवासिनी प्रमुदिता लेऊनिया भूषणे
आहे मंगल कार्य आज सदनी कुर्यात् सदा मंगलम् ॥२॥
विद्यालंकृत हा सुयोग्य तुजला लाभे पति जीवनी
भाग्याचा जणूं की वसंत फुलला तुझ्या मनःप्रांगणी
बाला तुहि तशी सुविद्या अससि त्यांते अनुरुपिणी
आला योग खराच आज जुळुनि शोभे हिरा कोंदणी ॥३॥
वाहे ही सरिता खळाळुनि पुढे भेटावया सागरा
होई उज्वल ती उषा बघुनिया तेजोनिधी भास्करा
भक्तिपूर्वक तुं प्रसन्नहृदये पुजोनो गौरीहरा
आशादीप सुरम्य घेउनि करी जासी पतिमंदिरा ॥४॥
रामा जानकी शंकरास गिरिजा कृष्णास ती रूख्मिणी
तैसे ह्या विधीने तुम्हास आणिले एकत्र हो जीवनी
दोघेहि सहजीवनांत रमुनी संसार मोदे करा
भाग्यश्री तुमच्या गृही प्रगटूं दे कुर्यात् सदा मंगलम् ॥५॥
होई तूं गृहलक्ष्मी विजयीनी संसार क्षेत्रामधे
पत्नि प्रेमळ, शक्ति प्रेरक, तशी हो सर्व कार्यामधे
आतिथ्यास प्रशस्त ठेव आपुल्या स्नेहे गृहस्थाश्रमी
होवोनी मधुभाषिणी विहर तूं आनंद - मंदाकिनी ॥६॥
अग्निब्राह्मण साक्षीने तुम्ही आता संबध्द व्हा जीवनी
प्रीतीच्या सुममालिका उभयता कंठात द्या घालुनी
चाला सप्तपदी करी कर तसा गुंफून ऎक्यामधे
देवो आयु तुम्हा सुदीर्घ प्रभु तो कुर्यात् सदा मंगलम् ॥७॥
व्हावे सावध 'सावधान' असती हे शब्द हो सूचक
जाणोनी यांतील सार मिळवा लौकिक आणि सुख
बांधा कंकण ते परस्पर करां धर्मास त्या आचरा
नांदा सौख्यभरे सदैव जगती कुर्यात् सदा मंगलम् ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2012
TOP