स्त्रीगीत - मुलीचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
झोके देते तुला लाडके अंगाई गाते
छकुले ! तुजला जोजविते ॥धृ॥
प्रीतिलतेवर कलिका पहिली
रंगरुपाने सुंदर नटली
की चंद्राची कोर चिमुकली
नभांगणी खेळते ॥१॥
मातृपदाची होता प्राप्ती
स्त्रीजन्माची पटते महती
सर्व सुखाची ती परिपूर्ति
क्षणांत अनुभवते ॥२॥
तुझ्यामुळे हे शोभिवंत घर
भरले माझे चित्त-सरोवर
उरांत दाटे माया पाझर
तृप्त करीन तूं ते ॥३॥
छत्र तुजवरी स्नेहप्रीतीचे
अलंकार घालीन गुणांचे
बाळकडू पाजीन तृप्तीचे
मंगल तव चिंतिते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP