एकदा एका गाढवाला सिंहाचे कातडे सापडले. त्याने ते अंगावर पांघरले आणि तो आरामात हिंडू लागला. आसपासच्या सर्व प्राण्यांना वाटले तो सिंहच आहे म्हणून ते भीतीने पळू लागले. त्या गाढवाचा मालक जवळच उभा होता. त्याने सिंहाच्या कातड्यातून बाहेर आलेले लांब कान पाहून हे आपलेच गाढव आहे असे ओळखले आणि एका मोठ्या काठीने त्याला चांगले बडवून काढले तेव्हा आपण सिंह नसून गाढवच आहोत ह्याबद्दल त्या गाढवाची खात्री पटली.
तात्पर्य - मूर्ख माणसाने आपण हुषार आहोत असे भासविले तरी शेवटी त्याची फजिती झाल्यावाचून रहात नाही.