मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४८४१ ते ४८५०

बोधपर अभंग - ४८४१ ते ४८५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४८४१॥
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥
नाहीं सारखिया वेळां । अवघ्या पावतां अवकळा ॥२॥
लाभ अथवा हानी । थोडयामध्येंच भोवनी ॥३॥
तुका ह्मणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥४॥

॥४८४२॥
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ॥१॥
शरीर जायाचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥२॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥३॥
अंतकाळीचा सोइरा । तुका ह्मणे विठो धरा ॥४॥

॥४८४३॥
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तेंहि न समाये ॥१॥
तैसें शुद्ध करीं हित । नका चित्त बाटवूं ॥२॥
आपल्याचा कळवळा । आणिका बाळावरि नये ॥३॥
तुका ह्मणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥४॥

॥४८४४॥
कथनी पठणी करुनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥
मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥२॥
पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥३॥
मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥४॥
मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तेंचि मुखीं ॥५॥
आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥

॥४८४५॥
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥२॥
मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥३॥
तुका ह्मणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥४॥

॥४८४६॥
ऐसा कोणी नाहीं हे जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दु:खे व्याधि पीडा ॥२॥
काय पळे सखें चोरा लागें पाठी । न घलावी काठी आंड तया ॥३॥
जयाचें कारण तोचि जाणे करुं । नये कोणा वारुं आणिकासी ॥४॥
तुका ह्मणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥५॥

॥४८४७॥
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथूनि आरते उपचार ते ॥२॥
आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥३॥
तुका ह्मणे ऋण फिते एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥४॥

॥४८४८॥
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥

॥४८४९॥
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीन बुद्धि ते ॥१॥
विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहिताचें ॥२॥
भुलल्याचें अंग आपणा सारिखें । छंदाच सारिखें वर्ततसे ॥३॥
तुका म्हणे दु:ख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं सारिखें रतलिया ॥४॥

॥४८५०॥
एकाचिया घाटया टोके । एक फिके उपचार ॥१॥
ऐसी सवे गोवळिया । भाव तया पढियंता ॥२॥
एकाचें तें उच्छिष्ट खाय । एका जाय ठकवूनि ॥३॥
तुका ह्मणे बह सोपें । बहु रुपें अनंत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP