बोधपर अभंग - ५०५१ ते ५०६०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५०५१॥
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निर्दैव ॥१॥
देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥२॥
नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥३॥
साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे ॥४॥
दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥५॥
तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥६॥
॥५०५२॥
करणें तें हेंचि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥
जयामध्यें नारायण । शुद्ध पुण्य तें एक ॥२॥
शरणांगतां देव राखे । येरां वाखे विघ्नाचे ॥३॥
तुका ह्मणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥४॥
॥५०५३॥
आणीक नका करुं चेष्टा । व्हाल कष्टा परवडी ॥१॥
सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥२॥
अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥३॥
तुका ह्मणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥४॥
॥५०५४॥
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥२॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥३॥
तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला विचार त्या ॥४॥
॥५०५५॥
आपुलिया आंगें तोडी मायाजाल । ऐसें नाहीं बळ कोणापाशी ॥१॥
रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हेवाचा आणि मन ॥२॥
हर्षामर्ष जों हे नाहीं जो जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥३॥
मुक्त झालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका ह्मणे दु:खें बांधला तो ॥४॥
॥५०५६॥
सावधान ऐसें काय तें विचारा । आलेहो संसारा सकळही ॥१॥
अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥२॥
मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥३॥
तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥४॥
॥५०५७॥
प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही । एकही निदानीं न घडे त्यासी ॥१॥
दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥
तुका ह्मणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥
॥५०५८॥
पुसावें तें ठायीं आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥
येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥२॥
फळ तेंचि बीज बीज तें ची फळ । उपनांचें मूळ न पालटे ॥३॥
तुका ह्मणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥४॥
॥५०५९॥
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥
शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोष ॥२॥
पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणें ॥३॥
तुका ह्मणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥४॥
॥५०६०॥
अहंकार तो नासा भेद । जगीं निंद्य ओंवळा ॥१॥
नातळे तो धन्य यासी । झाला वंशीं दीपक ॥२॥
करवितो आत्महत्या । नेदी सत्या आतळों ॥३॥
तुका ह्मणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP