बोधपर अभंग - ५०३१ ते ५०४०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५०३१॥
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥२॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरुप । वाहतां संकल्प गोविंदाचे ॥३॥
तुका ह्मणे लाभकाळ तेंचि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥४॥
॥५०३२॥
गव्हाराचें ज्ञान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥१॥
त्यासी जरी ज्ञानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥२॥
तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥३॥
॥५०३३॥
गहूं एकजाती । परि त्या पाधाणी नासिती ॥१॥
वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥२॥
कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥३॥
तुका ह्मणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥४॥
॥५०३४॥
धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥
घ्यावें भरुनियां घर । मग नाहीं येरझार ॥२॥
धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥३॥
तुका ह्मणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥४॥
॥५०३५॥
सोसें वाढे दोष । झाला न पालटे कस ॥१॥
ऐसें बरवें वचन । करितां तें नारायण ॥२॥
असे प्रारब्ध नेमें । श्रम चि उरे श्रमें ॥३॥
सुख देते शांती । तुका ह्मणे धरितां चित्तीं ॥४॥
॥५०३६॥
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥२॥
बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥३॥
तुका ह्मणे जाणें । ऐसे भले ते शाहाणे ॥४॥
॥५०३७॥
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें ॥
द्यूतकर्म मनोभावें । सारिपाट खेळावा ॥१॥
मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम ॥
जन्मोजन्मींचा अधम । दु:ख थोर साधिलें ॥२॥
विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अति धीट ॥
तया तेचि वाट । अधोगती जावया ॥३॥
अणीक एक कोड । नरका जावयाची चाड ॥
तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥४॥
तुका ह्मणे ऐसें । मना लावी राम पिसें ॥
नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥
॥५०३८॥
अरे गिळिलें हो संसारें । कांहीं तरी राखा खरें ॥
दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड ॥
उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥२॥
केलें तें क्रियमाण । झालें तें संचित ह्मण ॥
प्रारब्ध जाण । उरवरित उरलें तें ॥३॥
चित्त खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरीं ॥
रसने अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥४॥
॥५०३९॥
लाभ झाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी ॥
मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥
घेई हरिनाम सादरें । भरा सुखाची भांडारें ॥
झालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥२॥
घेऊनियां माप हातीं । काळ मोवी दिवसरात्रीं ॥
चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥३॥
हित सावकासें । ह्मणे करीन तें पिसें ॥
हातीं काय ऐसें । तुका ह्मणे नेणसी ॥४॥
॥५०४०॥
आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥१॥
फुकाचा चाकर झालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥२॥
दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥३॥
तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP