बोधपर अभंग - ४८६१ ते ४८७०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥४८६१॥
दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥२॥
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहींसी समान भजूं नये ॥३॥
॥४८६२॥
तरिच जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥
नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥२॥
ज्याल्याचें तें फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥३॥
तुका ह्मणे भले । ज्याच्या नांवें मानवलें ॥४॥
॥४८६३॥
दिकचि या नाहीं संसारसबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥
तांतडींत करीं ह्मणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥२॥
संकल्पाच्या बीजें इंद्रियाची चाली । प्रारब्ध तें घालीं गर्भवासीं ॥३॥
तुका ह्मणे बीजें जाळूनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥४॥
॥४८६४॥
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहळा ॥१॥
सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥२॥
गात नाचत विनोदें । टाळघागर्यांच्या छंदें ॥३॥
तुका ह्मणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥४॥
॥४८६५॥
जेणें वाढे अपकीर्ति । सवार्थी तें वर्जावें ॥१॥
सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥२॥
होइजे तें शुद्ध त्यागें । वाउगें तें सारावें ॥३॥
तुका ह्मणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळीमा ॥४॥
॥४८६६॥
नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥
न संगतां पडे ताळा । रुप दर्पणीं सकळां ॥२॥
सारविलें वरी । आहाचे ते क्षणभरी ॥३॥
तुका ह्मणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥४॥
॥४८६७॥
नये स्तवूं काच होतें क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥
नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥२॥
पाराखया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंडू होतो माना ॥३॥
तुका ह्मणे तरी मिरवते परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥४॥
॥४८६८॥
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटू चित्त निषेधासीं ॥१॥
नये राहों उभें कसमळापासी । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥
तुका ह्मणे क्षमा सुखाचिये रासी । सांडोनि कां ऐसी दु:खी व्हावें ॥३॥
॥४८६९॥
जग ऐसें बहु नांवें । बहु भावे भावना ॥१॥
पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥२॥
कारियासी जे कारण । तें जतन करावें ॥३॥
तुका म्हणे संतजनीं । हेंचि मनीं धरावें ॥४॥
॥४८७०॥
निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥
पळवा परपरतें दुरी । आतां हरि येथूनि ॥२॥
धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥३॥
अबोल्यानें ठेला तुका । भेऊनि लोकां निराळा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2019
TOP