बोधपर अभंग - ५५०१ ते ५५१०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५५०१॥
स्वयें घरदार प्रपंच मांडिला । मोडुनियां दिला बाळहातीं ॥१॥
तैसें सर्वाभूतीं असावें संसारीं । प्राचीनाची दोरी साक्ष आहे ॥२॥
वाटसरु वस्ती येऊनी राहिला । प्रात:काळीं गेला उठोनियां ॥३॥
तुका ह्मणे आम्हा नाहीं प्रापंचीक । पंढरीनायक साह्य झाला ॥४॥
॥५५०२॥
झाला कासावीस बाण लागतांचि । गती पारधीची चुकेचिना ॥१॥
चुकेना ते रेखा क्रियमाण जाण । कृष्णाचिये प्राण घेत बाण ॥२॥
बाणें पश्चात्ताप अर्जुनाचे मनीं । शंखचक्रपाणी धरीन मी ॥३॥
धरुं तुका ह्मणे ऐशियांचा संग । तारुं पांडुरंग उभा असे ॥४॥
॥५५०३॥
अधिष्ठानीं जन्म जाहाला जयाचा । जाणावा दैवाचा योगभ्रष्ट ॥१॥
पूर्व जन्मीं कांहीं विक्षेपता झाली । म्हणोनी राहिली आपक्वता ॥२॥
कलियुगीं येतां विठ्ठल पाहिला । पूर्वत्व पावला गुरुद्वारें ॥३॥
तुका म्हणे झाला समाधी सुयोगीं । निजानंदरंगीं रंगलासे ॥४॥
॥५५०४॥
फिरविली पळी पायसांत पूर्ण । राहिली आपण उपवासी ॥१॥
भक्षुनियां गेले इतर सकळ । दर्वीस तें फळ काय होय ॥२॥
तयेपरी भूतां अंतर्बाह्य हरी । असोनी भिकारी न पाहती ॥३॥
तुका ह्मणे भोक्ते हरिदास होती । इतर जल्पती अभिमानें ॥४॥
॥५५०५॥
अगस्तीच्या काय तृषे । द्यावें ऐसें उदक ॥१॥
दुर्वासाची निवारी भुक । द्यावे अनेक प्रकार ॥२॥
शनीचिया वेधें पीडा । देतो जोडा कोणता ॥३॥
तुका ह्मणे हुताशन । शांति मन काशा हें ॥४॥
॥५५०६॥
अवघें साधियेलें कर्म । स्नान संध्या नित्य नेम ॥१॥
आश्रमाचे जे जे धर्म । नित्य नित्य जे उपक्रम ॥२॥
क्रिया झाली सांग । गंगोदक दिलें अर्घ्य ॥३॥
तुका ह्मणे नेम । प्राणासवें सांटीं श्रम ॥४॥
॥५५०७॥
येथें काम अनुमानाचें । नाहीं न धरा संकोच ॥१॥
संतपुजा जिवें भावें । देह गेह समर्पावे ॥२॥
जोडी सुकृत व्यापारा । पूजा पावे हरिहरां ॥३॥
संत चरणीं धरा भाव । आणीक नाहीं दुजा देव ॥४॥
नाना उपचार । सुख पावे विश्वंभर ॥५॥
तुका ह्मणे निश्चिती । संत भगवंताच्या मूर्ती ॥६॥
॥५५०८॥
शुद्ध स्वयंपाक करी । देवापायीं आवड धरी ॥
न पडे संदेह सागरीं । जाणतीं परी भक्तीसी ॥१॥
जाण तोचि एक विरळा । जाणे तोचि पराची वेळा ॥
देखेल दीनांचा कळवळा । सांगे सकळा सद्बुद्धी ॥२॥
तेंचि जाणावें सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें ॥
नामामृत बांटी फळें । जेणें विटाळें सांडिलें ॥३॥
तेच जाणे साधुविधी । सावध त्रिकाळ बुद्धि ॥
संदेह भोगाचिया संधी । धरीनें कधीम ठेवीना ॥४॥
अखंड समाधान ध्यानस्त । कदा चित्त नव्हेचि व्यस्त ॥
सम बुद्धि सदा व्यस्त । नेणें स्वस्त क्रोधासी ॥५॥
करी करवी परकार्या । अंतर शुद्धीनें सत्क्रिया ॥
विनया संतजन पाया । भूत दया सर्वासी ॥६॥
नाहीं वर्ण ज्ञानाभिमान । सम बुद्धि समसमान ॥
नेणे महत्वी जाणपण । लहानपण मिरवावें ॥७॥
करणें जीव जयासाठीं । जो नातुडे कवणे संकटीं ॥
तुका ह्मणे तरीच गोष्टी । चित्ता आटी वित्तेसी ॥८॥
॥५५०९॥
निरपेक्षतेपरतें नाहीं सुख । निरपेक्षता तोचि मोक्ष ॥
पाप पुण्यास हा साक्ष । निरापेक्ष तो एक ॥१॥
निरापेक्ष तोची ज्ञानी । निरपेक्ष सावध ध्यानी ॥
निरपेक्ष तत्पर भजनीं । या त्रिभुवनीं श्रेष्ठ तो ॥२॥
निरपेक्षा जिवीं शीव । निरपेक्षानें राहे भाव ॥
निरपेक्ष हा स्वयंमेव । आपण देव निजांगें ॥३॥
निरपेक्ष सर्वा श्रेष्ठ । निरपेक्ष तो कर्मीष्ठ ॥
निरपेक्ष धर्मनिष्ठ । देव उच्चिष्ट इच्छिती ॥४॥
निरपेक्ष ऐसें साधन । नाहीं नाहीं दुजें जाण ॥
निरपेक्ष करा हें मन । तुका चरण वंदितसे ॥५॥
॥५५१०॥
मन निवे घेतां नाम । रसनीं अमृत परम ॥
होती शकून लाभ प्रेम । बरवें धाम आनंद ॥१॥
मन रंगलें सुरंग । स्थिरावले वृत्तीवेग ॥
पुष्ट सुष्ट झालें अंग । रंगीं रंग मिनले ॥२॥
हर्षे निर्भर झालें चित्त । सदा आनंदें डुल्लत ॥
केली या पंढरीनाथें । कृपा बहुत जाणावी ॥३॥
दिसे झालेसें भोजन । येती ढेंकर आनंदानें ॥
इच्छे ठेला चिरा पडोन । धालें पण सर्वदा ॥४॥
धालेपणाचें उद्गार । मुखा येती निरंतर ॥
अंग सुखावे परिचार । हे उपचार नाठवे ॥५॥
तुका ह्मणे निज सुखा । भेटों आलें आवडे देखा ॥
निधान सांपडे मुखा । कवण लेखा त्या भाग्या ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP