मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२२१ ते ५२३०

बोधपर अभंग - ५२२१ ते ५२३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५२२१॥
करितां ही कन्यादान । कुळ गोत्र तें शोधून ॥१॥
हाचि असे वृद्धाचार । कळों यावे श्रेष्ठाधार ॥२॥
पंगतीस याती । मुळीं शोधुनी पाहाती ॥३॥
तया नाहीं चिंता मग । काय कारणाचें अंग ॥४॥
तुका ह्मणे मूळ । शोध पाहिजे तें कुळ ॥५॥

॥५२२२॥
वायां संवसार । वाड झाले लोकाचार ॥१॥
खरें लटकेंतें केलें । मायामोहें भुलविलें ॥२॥
मी हें काय जाणे ऐसें । जेणें पुढें पडे नाश ॥३॥
नव्हे शृंगार उत्तरीं । तुम्हा गौरवी कुसरी ॥४॥
केलेंसे विदेशी । भाषाहीन अनारिसी ॥५॥
समस्तासी तुका । मारी न भुलतां हाका ॥६॥

॥५२२३॥
मुख्य धर्म ब्राह्मणाचा । सदा शुची देह त्याचा ॥१॥
मुखीं उच्चारावें नाम । नये वाचा अनाश्रम ॥२॥
अग्निहोत्र्यादि याज्ञिक । रक्ष षट्‍कर्मी लोक ॥३॥
वानप्रस्थ तरी । दंड साक्षी निद्रा करी ॥४॥
स्त्रियां संयोगीं वियोग । तेव्हां कर्म घडे सांग ॥५॥
तुका म्हणे नेम । पडे चुकलिया भ्रम ॥६॥

॥५२२४॥
शेटे आणि तो चौधरी । पांडपण वाहे शिरीं ॥१॥
पाप नलगे धुंडावें । लागे तेणें तेथें जावें ॥२॥
गाई म्हशी रेडे घोडे । जे जे विकताती द्वाड ॥३॥
पारपत्य देवा गारीं । करी खिस्तीचा व्यापारी ॥४॥
तुका म्हणे जारे तेथें । पुण्य रीघ नाहीं जेथें ॥५॥

॥५२२५॥
वस्ती दिल्या चोरा । कैचा विश्रांतीसी थारा ॥१॥
पडे वासनेची धडी । वगी बंधखान जोडी ॥२॥
वैरी केला गडी । वेळ समयासी नाडी ॥३॥
विचारावा नाड । आहे ओंगळ ते खोड ॥४॥
तुका ह्मणे बेडी । विना खोटी आशा पाडी ॥५॥

॥५२२६॥
झरा आनंदाचा । झाली सुरळीत वाचा ॥१॥
झटे माझें माझें ओझें । झुगारिलें तें सहजें ॥२॥
झोडिला संसार । झाडा दिला हरीहर ॥३॥
झांकूं नका डोळे । झोला देती कळीकाळ ॥४॥
तुका म्हणे तुझा । तुम्ही आपुल्या तें बुझा ॥५॥

॥५२२७॥
आलें घरा दिसे नेत्रीं । नको श्रोत्रीं धुंडावें ॥१॥
गिरी कंदरी अघोर । नको फार शोधावें ॥२॥
नाहीं सायासाचें काम । नेघे श्रम साधन ॥३॥
तुका ह्मणे जाती वाटे । मोडू काटे नेदीतो ॥४॥

॥५२२८॥
जन्मा आले वायां जाती । ते विपत्ती भोगुनी ॥१॥
काय ओढवले नष्ट । केलें प्रारब्धें ॥२॥
खर पालाणिले भारे । मृत्यु खरें न सुटे ॥३॥
तुका ह्मणे पाठीं पेणी । सुटे गोणी सांडितां ॥४॥

॥५२२९॥
चिंता करणें श्रीमंता । नाहीं आतां कशाची ॥१॥
देव तया प्रतिपाळी । लडिवाळी म्हणोनि ॥२॥
दृढ अनुभव चित्ता । राहे होतां तें करा ॥३॥
तुका ह्मणे तोचि एक । हा तारक विठ्ठल ॥४॥

॥५२३०॥
अंगीच्या सामर्थ्ये । चाले बोले पुरुषार्थे ॥१॥
पाठी देवाचें हें बळ । मग लाभ हातीं फळ ॥२॥
देव जाहलासे साह्य । तेणें केलें सर्व होय ॥३॥
तुका ह्मणे स्वामीसत्ता । तेथें नाहीं भयचिंता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP