मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५३०१ ते ५३१०

बोधपर अभंग - ५३०१ ते ५३१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५३०१॥
धन्य धन्य तोचि प्राणी ॥ रामनाम जपे वाणी ॥१॥
तोचि एक भाग्यवंत ॥ तयापाशीं रघुनाथ ॥२॥
तेणें तारियलें कुळा । तोचि दैवानें आगळा ॥३॥
तुका ह्मणे धन्य धन्य । त्याचे भेटी थोर पुण्य ॥४॥

॥५३०२॥
वाचे जातो वक्ता । ज्याची माझे ठायीं सत्ता ॥१॥
न बोलवी अनुचित । वसे देहीं अखंडित ॥२॥
जाणे जो ठायीचें । न सांगतां अंतरींचें ॥३॥
तुका म्हणे ऐसा । तुह्मी माना भरंवसा ॥४॥

॥५३०३॥
आह्मी झालों येणे सुखी । ते या लोकीं दाविलें ॥१॥
परब्रह्मींचा हा ठेवा । नामें जिवा विश्रांती ॥२॥
नाहीं सांगावया कांहीं ॥ उरे पाही वेगळें ॥३॥
तुका ह्मणे उठाउठी । घेतों भेटी देवाची ॥४॥

॥५३०४॥
शाहाणिया पुरे । खूण एकचि उत्तरें ॥१॥
मुर्खालागीं वेळोवेळीं । वाचा शिणवी बरळी ॥२॥
नाहीं सांगावें लागत । कळे सकळ वृत्तांत ॥३॥
तुका ह्मणे खुणें । खरें अंतरींचें जाणे ॥४॥

॥५३०५॥
परिमळ उपचार । देहसार श्रृंगार ॥१॥
तैसे जाणा साधुजन । मुखीं वाण नामाचें ॥२॥
धाले जेविलिया दिसे । दास तैसे विष्णुचे ॥३॥
तुका ह्मणे वेदश्रुती । नित्य गाती पुराणें ॥४॥

॥५३०६॥
हरीभक्तीं घ्यावें नाम । देणें देवाचें हें प्रेम ॥१॥
जोडी करावी जतन । निज अविनाश धन ॥२॥
भय न धरीं मानसीं । येणें नाहीं गर्भवासीं ॥३॥
तुका ह्मणे हेचि । वृत्ति मिरासी साधूची ॥४॥

॥५३०७॥
अशा उच्चिष्ट कवळी । मत्स्य देव झाले जळीं ॥१॥
लाग बैसली पुढारां । नागविलें थोरथोरां ॥२॥
पिटी हांसोनियां करीं । हात पुसा ह्मणे टिरी ॥३॥
जाणे अंतर सबाहीं । येथें अभिमान नाहीं ॥४॥
केले तर्क हे उपाय । खोटे निवडी संदेह ॥५॥
तुका ह्मणे खरें खरें । दास ह्मणवितां बरें ॥६॥

॥५३०८॥
भक्तिभाग्य प्रेमसुख । नेणे दु:ख दुसरें ॥१॥
अनिष्ट हरीपायीं । ठेवी डोयी चरणीं ॥२॥
याजमध्यें सर्वकाळ । हें मंगळ संसारी ॥३॥
तुका ह्मणे भावबळ । नाहीं काळ चिंतनीं ॥४॥

॥५३०९॥
चुकवितें वाट । पुढें सांपडलें नीट ॥१॥
याजसाठीं गर्भवास । नेणें हरीचा हा दास ॥२॥
संचिताचा संग । नावे जाणोनियां भंग ॥३॥
तुका ह्मणे दृष्टी । नव्हे उघडितां कष्टी ॥४॥

॥५३१०॥
आडरानें भरे जन ॥ क्लेश शिण पावती ॥१॥
नीट लाउनियां मार्गी ॥ संतसंगीं सत्कर्मी ॥२॥
मूढ दोषी पापी जन ॥ संगें जाण उदार ॥३॥
तुका ह्मणे धर्मशील ॥ हे दयाळ सद्भक्त ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP