मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१११ ते ५१२०

बोधपर अभंग - ५१११ ते ५१२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१११॥
पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥
काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥२॥
वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वांचे ॥३॥
दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥४॥
नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥५॥
तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करुं ब्रह्मानंद एकसरें ॥६॥

॥५११२॥
धनवंता घरीं । करी धनचि चाकरी ॥१॥
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावेंचि घर ॥२॥
रानीं वनीं द्वीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥३॥
तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥४॥

॥५११३॥
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई विळवतें ॥१॥
काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥२॥
अहंकारास उरलें कायी । पांचाठायीं हें वाटें ॥३॥
तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥४॥

॥५११४॥
फटयाचे बडबडे चवी ना सवाद । आपुलाचि वाद आपणासी ॥१॥
कोणें या शब्दाचे मरावें घसणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥२॥
गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥३॥
तुका म्हणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥४॥

॥५११५॥
प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करुं नये ॥१॥
उभी कामधेनू मांगाचे अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥२॥
कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र ह्मणोन घेऊं नये ॥३
यातिहीन झाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥४॥
भावारुढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥५॥

॥५११६॥
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥
तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥२॥
वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥३॥
उंस बाहेरी कठिण काळा । माजि रसाचा जिव्हाळा ॥४॥
मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥५॥

॥५११७॥
झाडा वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळो वेळां ॥१॥
वल्कलें नेसुनि दुंगा गुंडाळोनी । सांडी जवळुनी देहभान ॥२॥
लोकमान वमना समान मानणें । एकांतीं राहणें विठोसाठीं ॥३॥
सहसा करुं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥४॥
ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका ह्मणे त्याचा पांग फिटे ॥५॥

॥५११८॥
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥१॥
अंतीं मरसी तें नचुके । मजही मारितोसी भुके ॥२॥
येरु ह्मणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें झाला ॥३॥
देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥४॥
येरु ह्मणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥५॥
गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥६॥

॥५११९॥
ऐसा ज्याचा अनुभव । विश्वसत्य तोचि देव ॥१॥
देव तयापासी असे । पाहवा दर्शनींच दिसे ॥२॥
काम क्रोध नसे चित्ता । भूतीं झाली हो समता ॥३॥
तुका ह्मणे भेदा भेद । गेला समुळीं विवाद ॥४॥

॥५१२०॥
ज्याचें अंत:करण शुद्ध । त्याला करणें नलगे बोध ॥१॥
नलगे साधूचा शेजार । सुटति प्रेमाचे पाझर ॥२॥
तुका ह्मणे मैलागिरी भुजंग येती अंगावरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP