बोधपर अभंग - ५१०१ ते ५११०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५१०१॥
बांधे सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणा बळें ॥१॥
भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतर्यानें भाव पालटिला ॥२॥
घरांता रिघावें दाराचिये सोयी । भिंतीसवें डोयी घेऊनि फोडी ॥३॥
तुका ह्मणे देवा गेली विसरोन । आतां वर्म कोण दावी यासी ॥४॥
॥५१०२॥
धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्व भावें ॥१॥
चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥२॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥३॥
धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्य बाळकाविण वत्सा ॥४॥
तुका ह्मणे नेम प्राणांसवें साटी । तरीच या गोष्टी विठोबाची ॥५॥
॥५१०३॥
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें ॥१॥
जया चित्तीं जैसा भाव । तयां जवळि तैसा देव ॥२॥
सकळां पढिये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥३॥
तुका ह्मणे माता । वाहे तान्हयाची चिंता ॥४॥
॥५१०४॥
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥
याचकांविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥२॥
उदक अन्न काये ह्मणे मज खा ये । भुकेला तो जाय चोजवीत ॥३॥
व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दु:खाच्या परिहारा आपुलिया ॥४॥
तुका म्हणे जया आपुलें स्वहित । करणें तोचि प्रीत धरी कथे ॥५॥
॥५१०५॥
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥
जिवासाटीं गौरव वाढे । आहाच तें नव्हे ॥२॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥३॥
तुका ह्मणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥४॥
॥५१०६॥
बरें झालीयाचे अवघे सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥
नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥
तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥
॥५१०७॥
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥
आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥२॥
आलें अंगासी तें बळिवंत गाढें । काय वेडयापुढें धर्मनीत ॥३॥
तुका ह्मणे कळों येईल तो भाव । अंगावरि घाव उमटतां ॥४॥
॥५१०८॥
जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥
तृष्णेची मजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥२॥
वैभवाचीं सुखें नांतळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥३॥
तुका ह्मणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करुंनिअसे ॥४॥
॥५१०९॥
कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥
ऐसें माता जाणे वर्म । बाळा वाढवितां धर्म ॥२॥
कामवितां लोहो कसे । तांतडीनें काम नासे ॥३॥
तुका ह्मणे खडे । देतां अक्षर तें जोडे ॥४॥
॥५११०॥
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥
वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥२॥
आपणीया पाक करी । तो इतरीं सेबिजे ॥३॥
तुका ह्मणे शूर राखे । गाढया वाखे सांगातें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP