मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१४१ ते ५१५०

बोधपर अभंग - ५१४१ ते ५१५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१४१॥
जाणावी ती कृपा हरीची जाहली । चिंतनीं लाविली मनबुद्धी ॥१॥
अनुभव होतां वासना विराली । वृत्ती मुरडली उफराटी ॥२॥
रामरुप संतसेवन आवडे । कीर्तन पवाडे हरिचे गुण ॥३॥
तुका ह्मणे हरीकृपेचीं लक्षणें । दिलीं नारायणें प्रेमळासी ॥४॥

॥५१४२॥
बळें देह मी ह्मणतां । कोटी ब्रह्महत्या माथां ॥१॥
येऊनीयां आदळती । घोर नर्क भोगविती ॥२॥
अहंकार बळावला । त्रिगुणानीं जोर केला ॥३॥
तुका ह्मणे बुडविलें । निजरुप गमाविलें ॥४॥

॥५१४३॥
पूर्ण ब्रह्म जे आहेती । सोडोनियां देह होती ॥१॥
सत्ता ज्याची तिहीं लोकीं । करी देहाची पाइकी ॥२॥
माया मृगजळ भास । हाचि धरिला विश्वास ॥३॥
तुका ह्मणे नाश झाला । आपणासीं विसरला ॥४॥

॥५१४४॥
मातापिता याचें ऋण । फिटे गयावर्जनानें ॥१॥
पोटीं पुत्र झालियानें । मुक्त बायकोपासून ॥२॥
पुत्रापासून सुटला । त्याचा विवाह जाहला ॥३॥
तुका ह्मणे आत्मऋण । न फिटे चि गुरुविण ॥४॥

॥५१४५॥
पाय पहावे ते कोठें । अनुभवाचीये पेठे ॥१॥
पाय पहावे ते मनीं । गुरु अमृत वचनीं ॥२॥
पाय पहावे ते शास्त्रीं । तंतु आहे जैसा वस्त्रीं ॥३॥
तुका ह्मणे जें जें दिसे । हरीरुपाचे प्रकाशें ॥४॥

॥५१४६॥
सर्व ह्मणणें हो पळ । सर्वरुपी हा गोपाळ ॥१॥
नाहीं दुजीयाची वार्ता । पूर्ण प्रकाश जो कर्ता ॥२॥
तो हा माझा पांडुरंग । अवतार जो नि:संग ॥३॥
तुका ह्मणे अद्वैत । आहे राम अखंडित ॥४॥

॥५१४७॥
धन्य पुत्र माय पोटीं । निपजले रत्न कोटी ॥१॥
हरीरुप अंगें झाला । ज्ञान स्वरुप शोभला ॥२॥
कोटी ब्रह्मांडांचा धनी । प्रकाशक स्वयें मानीं ॥३॥
तिळभरी अहंकार । नाहीं नये वृत्तीवर ॥४॥
तुका ह्मणे पूर्णपणें । जनीवनीं तो आपण ॥५॥

॥५१४८॥
गुरु मागतसे धन । शिष्य बोले द्टावून ॥१॥
कांहो मंत्र तुह्मी दिला । बलात्कार मज केला ॥२॥
पुरे तुझें गुरुपण । मंत्र घ्यावा परतोन ॥३॥
तुका ह्मणे दोघेजण । गेले अज्ञानें बुडोन ॥४॥

॥५१४९॥
स्वयें नाहीं जो तरला । काय तारी दुसर्‍याला ॥१॥
मायापुरी पार होणें । तोचि कासें लावूं जाणे ॥२॥
नाहीं भलत्याचें काम । कृपावंत जरी राम ॥३॥
तुका ह्मणे हरिवीण । पूर्ण कृपा करी कोण ॥४॥

॥५१५०॥
स्वयें झाला ब्रह्म अंगें जो आपण । त्यासी च हे जन अवघे देव ॥
येरांनीं सांगावी रेमठ काहाणी । देह दीनरजनीं कर्मावया ॥२॥
धालें नेणें आणिकांचीं तहान भूक । नकळतें सुख वेगळेंची ॥३॥
तुका ह्मणे येथें पाहिजे जातीचें । येर गबाळाचें काम नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP