बोधपर अभंग - ५३११ ते ५३२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५३११॥
नसे द्वेषाऐसें पाप । सत्या लोप झालिया ॥१॥
पुण्य उपकार घडे । यश जोडे पुराणीं ॥२॥
जातो पतनासी वादी । पडे बंदीं यमाच्या ॥३॥
तुका म्हणे सांभाळावें । नाहीं जिवें वेंचलें ॥४॥
॥५३१२॥
बोल बोले अबोलणा । साक्षी मना करुनी ॥१॥
नाम नित्य नेम कथा । श्री अनंता समर्पू ॥२॥
तयाविणदुजा ठाव । नेणे देव दुसरा ॥३॥
तुका आवडिते असे । ब्रह्मरस सेवनीं ॥४॥
॥५३१३॥
देतो देणें सद्गुरुचें । दु:ख दुरकरी त्याचें ॥१॥
ऐसा निश्चय चित्ताचा । देव सद्गुरुचि साचा ॥२॥
नाहीं दुसरे प्रमाण । जिवें अनुसरे प्राण ॥३॥
तुका ह्मणे इच्छादानी । गुरु दाता हा निर्वाणीं ॥४॥
॥५३१४॥
इच्छा ठेवी धनावरी । वर्ते अधर्म व्यवहारीं ॥१॥
नाना सायास करिती । धन हव्यासें जोडिती ॥२॥
जिवा न मानिती त्रास । करिती पर्वत मुंगीस ॥३॥
तुका ह्मणे चाली । क्रोधें नको घाला घाली ॥४॥
॥५३१५॥
मनीं भाव नाहीं करी चळवळ । चित्तीं सदा मळ कपटाचा ॥१॥
स्त्रियापुत्रादिक पाळी आवडीनें । जनासी निंदणें रात्रंदिन ॥२॥
सज्जन सोईरे यांचे घातावरी । निंदी अहोरात्रीं संतजना ॥३॥
दया क्षमा शांती नाहींच सर्वथा । भाष देउनि घाता करी सत्य ॥४॥
तुका ह्मणे ऐसा जावो नर्ककुंडीं । कल्पवरी धाडी यम त्यासी ॥५॥
॥५३१६॥
ज्ञानियांचे कर्म ज्ञानियांचा ठाव ज्ञानी जाणे ॥१॥
ज्ञानियांचा भाव ज्ञानियांचा देव । ज्ञानियांचा ठाव ज्ञानी जाणे ॥२॥
ज्ञानियांची कळा ज्ञानियांची लीळा । ज्ञानाचा सोहळा ज्ञानी जाणे ॥३॥
तुका ह्मणे येथें पाहिजे यातीचे । येरां गबाळांचें काम नाहीं ॥४॥
॥५३१७॥
अंतरीं प्रपंच दृढ बळावला । नाहीं आठविला पांडुरंग ॥१॥
स्वप्नामाजी नाहीं आठविलें नाम । नाहीं नित्य नेम याती धर्म ॥२॥
नाहीं कधीं संतसंग समागम । केले परिश्रम जन्मवरी ॥३॥
तुका म्हणे नाहीं कुळाचार कांहीं । पर्वकाळ तोही ठावा नाहीं ॥४॥
॥५३१८॥
जाणोनी न करी शिकवितां पाही । असोनियां नाहीं संसारासी ॥१॥
सारविले कष्ट श्रमेना अभागी । सांडुनियां वेगीं पळे दुरी ॥२॥
किती सांगों आतां वारंवार पुढां । बळें आणी पीडा दाटोनियां ॥३॥
दर्पणाचें रुप न पाहे नावेक । जया नाहीं नाक मुळींहुनी ॥४॥
तुका म्हणे पुढें वोढवली भीक । सांगतों विवेक न करितां ॥५॥
॥५३१९॥
कैसा पाहतां या काळें । मग न चलती बळें ॥१॥
ऐसें ठावें नाहीं पुढें । सोस काकुलती पुढें ॥२॥
माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं सोस भय तोडी ॥३॥
काय संचित तें करीं । नर्का जाय मेल्यावरी ॥४॥
पर उपकार । हाचि घडावा विचार ॥५॥
तुका ह्मणे काय लासी । आतां भेटों नये ऐसी ॥६॥
॥५३२०॥
विटे करीतांही पाप । दु:खरुप साधिती ॥१॥
परदारीं ठेवी चित्त । कोण हित ते ठायीं ॥२॥
नाक कान हे शेवटीं । पडे गांठी दोहींसी ॥३॥
तुका ह्मणे सांगो किती । हे फजिती दुर्दशा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP