मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४०१ ते ५४१०

बोधपर अभंग - ५४०१ ते ५४१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५४०१॥
काय एक दिवस गेलें हो वर्‍हाड । तें आलें सांकड कथेमाजि ॥१॥
क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणुक कांहीं होईल पुढें ॥२॥
कथेसी विसर दोषामुळें होय । तरुणोपाय कैंचा मग ॥३॥
काय हो सोसुनी उरलें तें मागें । घटिका एका संगें काय गेलें ॥४॥
तुका ह्मणे हेचि बोलावया चाड । उभयता नाड हित असे ॥५॥

॥५४०२॥
जयाचिये योगें उद्धार वंशाचा । तोचि हो दैवाच इह लोकीं ॥१॥
आनंद वडिलांचे न माये अंतरीं । येऊनी संसारीं धन्य झालों ॥२॥
आपण तरोनि वंश उद्धरिला । उपेगासी आला जगाचिया ॥३॥
तुका ह्मणे दोष तयाचे संगती । लयातें पावती तात्काळचि ॥४॥

॥५४०३॥
नाश झाला आयुष्याचा । प्राणी पाहुणा यमाचा ॥१॥
पात्र पाहोनी निश्चित । तैसाचि दंड करीत ॥२॥
ऐसें दु:ख भोगी नाना । कोणी तया सोडविना ॥३॥
तुका प्रार्थी वारंवार । नको देवा हा जंजार ॥४॥

॥५४०४॥
कथाडयासी कैंचा भाव । पुजार्‍यासी कैंचा देव ॥१॥
हे तो पोटाचे विकारी । ब्रह्म लावी कांद्याबरी ॥२॥
पुराणिका कैंचे वित्त । पंडिता कैची नीत ॥३॥
तीर्थवाशा कैंचें व्रत । क्षेत्रवाशा कैं दैवत ॥४॥
तुका ह्मणे कासारीं । प्रतिमा मांडिल्या बाजारीं ॥५॥

॥५४०५॥
झालें फळ तेव्हां राहिलें पिकोनाजरी तें जतन होय देंठी ॥१॥
नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥२॥
चालिला तो पंथ पावविल ठाया । जरी आड तया नये कांहीं ॥३॥
तुका ह्मणे मधीं पडती आघात । तेणें होय घात हानी लाभ ॥४॥

॥५४०६॥
असावा तो पुत्र एक हरिदास । जेंवि देवकीस कृष्णमूर्ती ॥१॥
काय शत मुर्ख गांधारीचे पोटीं । केला जगजेठी शत्रु पूर्ण ॥२॥
हरीसी विन्मुख जळो ते संतती । पितरा घालिती अध:पाता ॥३॥
तुका ह्मणे ज्याचा वंश तो पवित्र । तेथेंचि सुपुत्र गुरुभक्त ॥४॥

॥५४०७॥
प्रेमाविण जें जें केलें । निरर्थक वांयां गेलें ॥१॥
मुखें करितो कीर्तन । मनीं विषयाचें ध्यान ॥२॥
केव्हां सरेल हे कथा । चित्त ठेविलें मन्मथा ॥३॥
ऐसें श्रवण कीर्तन । गेलें ओहळीं वाहोन ॥४॥
तुका ह्मणे पांडुरंग । जाणतसे अंतरंग ॥५॥

॥५४०८॥
थोडकेंचि खरें बरें । मोठा कासया डोंगर ॥१॥
अमृताचा एक बिंदु । क्षार कासया तो सिंधु ॥२॥
जंव कस्तुरी सुवास । मोठा नलगे कापूस ॥३॥
राम नाम एकवार । मायानदी करी पार ॥४॥
तुका ह्मणे गजेंद्रानें । गेला नामें उद्धरुन ॥५॥

॥५४०९॥
भूतां अन्न पशू तॄण । सर्पमात्रीं हर पवन ॥१॥
होम द्रव्य हुताशन । जळचरां जलपान ॥२॥
जें जें युक्त जयापरी । निर्मीतसे माझा हरी ॥३॥
भक्तां प्रेमळा जीवन । तुका ह्मणे नारायण ॥४॥

॥५४१०॥
जन्मुनियां देहभावासी जाळावें । तरी ह्मणवावें हरिदास ॥१॥
मीपण अंतरीं वासना शिदोरी । बांधिली जिव्हारीं बळकट ॥२॥
तेणें रंगवुनी भगवें कां केलें । ढोंगावया गेलें हरिविणें ॥३॥
तुका ह्मणे सोंग आणिलें नटानें । राजा तो होऊन भीक मागे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP