बोधपर अभंग - ५४११ ते ५४२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५४११॥
होती सोयरे धायरे । संपत्तीचिये आधारें ॥१॥
दैवें गेलें तेंचि धन । न पुसा हो पिसूण ॥२॥
हेळसिती नरनारी । मेला जळो हा भिकारी ॥३॥
भाजी न मिळे खायासी । दीन मरे उपवासी ॥४॥
तुका ह्मणे हरिविण । नरा नाहीं धनमान ॥५॥
॥५४१२॥
हरी करितां सोयरा । सर्व लाभ येती घरा ॥१॥
हरी पायीं सिद्धी सिद्धि । दासी वोळंगती निधी ॥२॥
हरीपाय आयतन । चौदा लोक त्रिभुवन ॥३॥
हरी मंगळा मंगळ । हरी माझा हा निर्मळ ॥४॥
तुका ह्मणे पूर्व सार । वेद जाणताती हार ॥५॥
॥५४१३॥
काळावरी हरीसत्ता । नामरुपादि विधाता ॥१॥
मायाविपीनदहन । सत्ता एक करी जाण ॥२॥
सत्ता हालवी ब्रह्मांड । सत्ता हरीची प्रचंड ॥३॥
तुका ह्मणे जाणे सत्ता । तोचि देवा आवडता ॥४॥
॥५४१४॥
जन्मांतर हें बलिष्ट । भोगवीत सुष्ट दुष्ट ॥१॥
जन्मांतर नेउनियां । दाखवीत हरीपायां ॥२॥
जन्मांतर गर्भवासी । भोगवीत नाना कुसी ॥३॥
जन्मांतर हे सोडीना । प्राणीमात्र त्रिभुवना ॥४॥
तुका ह्मणे जन्मांतर । माझें आहे रघुवीर ॥५॥
॥५४१५॥
वेदशास्त्रें देवा गाती । तेथें पंडित भुलती ॥१॥
कर्म धर्म हेंचि थोर । गुरु देव नको हार ॥२॥
ऐसे नाडलें बहुत । नकळेचि आत्महित ॥३॥
कर्म धर्म हे देहींचे । हे तों असत्य मुळींचे ॥४॥
तुका ह्मणे खरें घ्यावें । तेव्हां लटिकें सांगावें ॥५॥
॥५४१६॥
खरें नाहीं हाता आलें । टाकूं नये खोटें भलें ॥१॥
तया कैंचा रघुपती । आचरती पापमती ॥२॥
गुरुअंजनावांचून । नाहीं प्राप्त नारायण ॥३॥
तुका ह्मणे दुधपाणी । प्राशी हंस निवडोनी ॥४॥
॥५४१७॥
वर्णाश्रम धर्म नित्य अनुष्ठान । विषय बुद्धीनें जाय वायां ॥१॥
भागवत धर्म विष्णुपरायण । विषय० ॥२॥
अहिंसा लक्षण अक्रोध वचन । विषय० ॥३॥
निस्पृह राहणें परिग्रह नेणें । विषय० ॥४॥
हरीचें कीर्तन सप्रेमें करुन । विषय० ॥५॥
संताचे सेवनें न शिणेचि मन । विषय० ॥६॥
तुका ह्मणे तुह्मा सांगतों मी खूण । निर्विषय मन करा तुह्मी ॥७॥
॥५४१८॥
डफगानें गातां काय सुख आहे । ऐकतां तें पाहे महा पाप ॥१॥
गीता भागवत आणि नारायण । अठराही पुराणें ऐकेना कां ॥२॥
नराचें सोंग नर जे पाहति । उभयतां जाती नर्कामध्यें ॥३॥
ऐशिया शब्दांचा वीट मानुं नका । विनवितसे तुका सकळांसी ॥४॥
॥५४१९॥
राधा होऊनियां नाचे जो पोगडा । तो होय हिजडा जन्मोजन्मीं ॥१॥
तयाचिया मागें डफ वाजविती । तेही नर्का जाती शत जन्मीं ॥२॥
तयाचा तमाशा प्रीतींने पाहती । तेही नर्का जाती शत जन्मीं ॥३॥
तुका ह्मणे हें वचन मानी जो असत्य । तोही नरका जात रवरवासी ॥४॥
॥५४२०॥
हरिकृपा हेंचि अनंत कल्याण । दाखवी चरण दयाळू जो ॥१॥
नंदयशोदेच्या पुण्या नाहीं पार । झाला रमावर बाळ त्यांचा ॥२॥
पांडवांचे अश्व धुतले गोपाळें । संकटीं स्नेहाळें रक्षियेलें ॥३॥
तुका ह्मणे मुख्य कृपा देवाजीची । नाहीं इतरांची सत्ता तेथें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP