मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५२९१ ते ५३००

बोधपर अभंग - ५२९१ ते ५३००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५२९१॥
शुद्ध दिलें नवनीत । संचित तें भोगीत ॥१॥
आतां पुढें भाव सार । पहा थार जिवना ॥२॥
पडे पारखीया हातीं । चांचपती आगळी ॥३॥
तुका ह्मणे सेवन ही घडे । त्यासी जोडी लाभ हा ॥४॥

॥५२९२॥
नांदे भुताचिये जिवीं । गोसांवीच सकळ ॥१॥
क्षण क्षणा जागा ठायीं । नाहीं कांहीं विश्वास ॥२॥
दाउनियां सोंग दुजें । वसे बीज अंतरीं ॥३॥
तुका ह्मणे धर्म । धरी वर्म चिंतन ॥४॥

॥५२९३॥
नर उपजोनी मरे । परी वाटे हेंचि बरें ॥१॥
नाहीं आवडीसी पार । झाले न म्हणावे फार ॥२॥
अमृताची खाणी । नव्हे उघडली धणी ॥३॥
तुका ह्मणे पचे । मुखा विठ्ठल साचें ॥४॥

॥५२९४॥
माझा देह वित्त घर । नव्हे खरें जो मानी ॥१॥
माझी प्रिया पुत्र पौत्र । कुळगोत्र सारिखें ॥२॥
जनीं राहोनी निराळा । अग्नि विटाळा नेणे ॥३॥
तुका ह्मणे त्याची कीर्ति । दया वसे सर्वा भूतीं ॥४॥

॥५२९५॥
ज्याचें निर्मळ अंतर । तेथें राहे विश्वंभर ॥१॥
जया नाहीं जोडा दुजा । तेथें राहे स्वामी माझा ॥२॥
निर्मत्सर अंतरींचा । चतुर्भुज सदा वाचा ॥३॥
तुका ह्मणे ऐसे रिती । भगवतीं ते सरती ॥४॥

॥५२९६॥
आपुलिया पोटासाठीं । करीतो काचिया गोष्टी ॥१॥
जेणें घातलें संसारीं । तोचि विसरला हरी ॥२॥
कोठील मी कोण । ज्याला न कळती गुण ॥३॥
पोटा घातलिया अन्न । ह्मणे पतितपावन ॥४॥
तुका ह्मणे नरस्तुती । करी भाट त्रिजगतीं ॥५॥

॥५२९७॥
समचरणाची शोभा । तो हा रुक्मिणीवल्लभा ॥१॥
वेद शास्त्राचें माहेर । केला दासां उपकार ॥२॥
नामापाशीं वसे मुक्ति । पहा हृदयीं प्रचिती ॥३॥
तुका म्हणे ज्याची । कळा सकळ अंगींची ॥४॥

॥५२९८॥
मज पुसों येती । देव दावा मजप्रती ॥१॥
हेंचि वाटतें नवल । काय करावे ते बोल ॥२॥
दिलें हातीं सांडी । नेघे करविलें गोडी ॥३॥
सांगितली एकादशी । नाम गावें अहर्निशी ॥४॥
तुका म्हणे या निश्चयें । त्याचें कार्य सिद्धी जाय ॥५॥

॥५२९९॥
चरणींच्या गंगा । तारुं प्रगटलें जगा ॥१॥
ब्रह्माचे पूजनीं । ब्रह्मकटाहाचें पाणी ॥२॥
झालें तिसी नाम देख । तिहीं लोकांसी तारक ॥३॥
तुका ह्मणे भागिरथी । गंगातिरीं भोगावती ॥४॥

॥५३००॥
काय इंद्रियासी नेम । नाहीं मुखीं रामनाम ॥१॥
अन्नामाजी बोळे माशी ॥ सुख कैंचें भोजनासी ॥२॥
ऐसें कीर्तन करावें ॥ जीव वेंचुनीयां भावें ॥३॥
देहीं नाहीं देहभान ॥ अंगीं सगुणाचें ध्यान ॥४॥
तुका ह्मणे साधुसंतां ॥ धन्य होणें हें जेवितां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP