मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४९२१ ते ४९३०

बोधपर अभंग - ४९२१ ते ४९३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४९२१॥
करुनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥
तरी च हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनियां ॥२॥
तेथें सरे शुद्ध साचे । अंतरीचें बीज तें ॥३॥
तुका ह्मणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥४॥

॥४९२२॥
वाट दावी त्याचे गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥
ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा ॥२॥
विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवें नव्हे नास ॥३॥
तुका ह्मणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥४॥

॥४९२३॥
यासी कोणी ह्मणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥१॥
आड वाटें जातां लावी नीट सोई । धर्मनीत तेही ऐसी आहे ॥२॥
नाइकतां सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य ऐसें फार ॥३॥
जन्म व्याधि फार चुकतील दु:खें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥४॥

॥४९२४॥
निवडे जेवण सेवटीच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥२॥
संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबना व्यंग पडिलिया ॥३॥
तुका ह्मणे वर्म नेणतां जो रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥४॥

॥४९२५॥
लावुनियां गोठी । चुकवूम आदरिली दिठी ॥
देउनियां मिठी । पळे महिमा थुलिया ॥१॥
पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड ॥
लावूनी चरफड । हात गोऊनि पळावें ॥२॥
आधीं काकुलती । मोहो घालावा पुढती ॥
तोंडीं पडे माती । फिरता मागे कैचा तो ॥३॥
तुका ह्मणे देवा । यासी रडवी याचा हेवा ॥
भावें कां हें सेवा । सुखें तुह्मा नार्पिती ॥४॥

॥४९२६॥
देह बुद्धि वसे जयाचिये अंगीं । पूज्यता ते जगीं सुख मानी ॥१॥
थोर असे दगा झाला त्यासी हांटीं । सोडोनिया गांठीं चोरीं नेली ॥२॥
गाठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥३॥
पुढिल्या उदिमा झालेंसें खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥४॥
तुका ह्मणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥५॥

॥४९२७॥
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥
ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥२॥
डांकाचे संगती सोनें हिन झालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥३॥
विषानें पक्वान्नें गोड कडू झालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥४॥
भावें तुका ह्मणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥५॥

॥४९२८॥
न करावी चिंता । भय न धरावें सर्वथा ॥१॥
दासां साहे नारायण । होय रक्षिता आपण ॥२॥
नलगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥३॥
न धरावी शंका । नये बोलों ह्मणे तुका ॥४॥

॥४९२९॥
संतसंगती न करावा वास । एखादे गुण दोष अंगीं येती ॥१॥
मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
तुका ह्मणे नमस्कारावें दुरुन । अंतरीं धरुन राहे रुप ॥३॥

॥४९३०॥
धोंडयासवें आदळितां फुटे डोकें । तो तों त्याच्या दु:खे घामेजेना ॥१॥
इंगळासी सन्निधान अतित्याई । क्षेम देतां कायी सुख वाटे ॥२॥
तुका म्हणे आम्हांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP